गर्भिणीतील नैराश्य

Total Views |
नुकताच ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा झाला. दरवर्षी जागतिक आरोग्य संस्थेद्वारे (WHO ) एक विषय (थीम) निवडून त्याची जनजागृती व्यापक पातळीवर केली जाते. तसेच यावर्षीची थीमआहे, ‘Depression let's talk!’ डिप्रेशन अर्थात नैराश्य हा शारीरिक आजार नसून मानसिक वैषम्य आहे. ते कुणालाही येऊ शकतं, होऊ शकतं. आजच्या लेखात ‘गर्भिणी अवस्थेतील नैराश्य आणि प्रसूतेतील नैराश्य’ हा विषय मांडला आहे.
 

 
गर्भिणी नैराश्य म्हणजे Antenatal Depression. गर्भिणी अवस्थेत स्त्रीमध्ये विविध बदल घडून येतात. शारीरिक, मानसिक, वैचारिक, भावनिक या सर्वच स्तरांवर तिच्यात बदल होत असतात. एका बाजूला नवीन अपत्त्याचा आनंद आणि आतुरता असते, पण बर्‍याचदा हे नावीन्य सर्वतोपरी अनोळखी असते. या ‘Unknown’ची भीती वाटू लागते. गर्भिणीला आधार देणारे, समजून घेणारे घरदार असल्यास तिचा हा प्रवास सुखकर होतो. पण, काही वेळेस आसपासचे वातावरण जरी सकारात्मक आणि आनंदी असले, तरीसुद्धा मनातील घालमेल, शंका-कुशंका वाढत गेल्यास गर्भिणी नैराश्य उत्पन्न होऊ शकते. काही कारणे ढोबळमानाने गर्भिणी नैराश्यात आढळून येतात ती म्हणजे नवरा-बायकोमधल्या नात्यात अवास्तव ताण, समस्या. उदा : नवर्‍याचे व्यसन, घरातील आर्थिक समस्या, स्वभावातील दोष इ. गर्भिणी अवस्थेत स्त्रिया अधिक नाजूक होतात, अधिक भावनिक होतात, अशा वेळेस छोट्यातील छोटी गोष्ट भिंगाखाली ठेवून बघितली जाते आणि त्यावर प्रतिक्रिया दिली जाते.
 
त्या स्त्रीमध्ये गर्भिणीपूर्वी जर नैराश्याचा इतिहास असल्यास ती गर्भिणी अवस्थेतही पुन: नैराश्येत जायची शक्यता अधिक असते. तसेच घरातून जसे अनुवंशिकरित्या (आई/वडील इ. जर नैराश्येचे रुग्ण असतील) नैराश्य आढळले, तर ती गर्भिणीही नैराश्याची लक्षणे दाखवू शकते.
 
काही वेळेस पूर्वी गर्भपात/गर्भस्राव झाला असल्यास ती भीती, काळजी मनावर अधिक ताण टाकून नैराश्य येऊ शकते. त्याचप्रमाणे गर्भधारणा होण्यासाठी खूप कालावधी लागला असेल, खूप चिकित्सा पद्धती व प्रणाली अवलंबिल्या गेल्या असतील तर त्याचेही दडपण गर्भिणी अवस्थेत जाणवू शकते.
 
तणावयुक्त जीवनशैली
 
अनेक गोष्टी करणे, त्यात निपुणता आणि यश मिळविणे आणि यासाठी लागतील तितके कष्ट घेण्याची ताकद-हिंमत असणे हे जरी चांगले असले, तरी गर्भिणी अवस्थेत हे करता करता ताण जाणवू शकतो, नैराश्य येऊ शकते. पूर्वीच्या प्रसूते वेळेस लिंग गर्भधारणा असतेवेळी काही कॉम्प्लीकेशन्स जाणवली तर त्याची स्मृती/स्मरण करून गर्भिणी हायपर होऊ शकते किंवा नैराश्यात जाऊ शकते. जीवनात अचानक खूप काही घडते, बदलते, तर गर्भिणीला असेही वाटू शकते की, आपला कशावरच ताबा नाही, आपण हताश आहोत. त्यामुळेदेखील नैराश्य येऊ शकते.
 
लहान वयात लग्न होऊन सासरी आल्यावर तिकडल्या रितीरिवाजाप्रमाणे वागणे, सगळ्यांना समजून-सांभाळून घेणे आणि आदर्श सून/बायको/वहिनी इ. साठी झटणे हे सर्व करत असताना जर गर्भधारणा झाली, तर ती भांबावून जाण्याची शक्यता अधिक असते. त्याचे परिवर्तन नैराश्यात होऊ शकते. या सर्व कारणांमुळे वर-वर वाटणार्‍या गोष्टीही खूप गंभीर स्वरूप धारण करु शकतात. गर्भिणीमध्ये नैराश्याची आढळणारी काही लक्षणे खालीलप्रमाणे- सतत दुःखी राहणे, कितीही आनंददायी, उल्हासित वातावरण असले तरी ती तात्पुरती त्यात रममाण होते आणि पुन: आपल्या कोशात जाते. दु:खी, खिन्न राहणे, कुणाशी अधिक न मिसळणे, एकएकटे राहणे असे होऊ लागते.
 
आहारात आणि झोपेत अनियमितता
 
काही वेळेस सततच्या ताणाने शांत झोप लागत नाही. थोडेही काही वाटले-बोलले तरी लगेच जाग येते आणि याच्या विपरीत सतत झोपून राहणे, कशातही रममाण न होता पडून राहणे, दिवसाही अंध:कार करून पडून राहणे, न कोणाशी बोलणे न कुठे जाणे. असेच आहाराविषयीही होऊ शकते. काही वेळेस खाल्ल्याने तात्पुरते बरे वाटते म्हणून वारंवार चर्वण करत राहणे, खात राहणे असे होते. काही गर्भिणींमध्ये या विपरीत अजिबातच कशाचीही शुद्ध न राहिल्याने भान हरपल्यासारखे झाल्यामुळे अन्नाचीही गरज भासत नाही, कळत नाही. काय खाल्ले, किती व कधी खाल्ले याकडेही काही लक्ष राहत नाही. गर्भिणी अवस्था ही नवोत्पत्तीचा काळ, सकारात्मक काळ असतो. तो असा वाया जाणे हे त्या गर्भाच्या स्वास्थ्यासाठीही हितावह नाही.
 
कशातच रस न वाटणे, रममाण न होणे
 
कुठल्याही सणासमारंभाला न जाणे, गेल्यास एका कोपर्‍यात खिन्न मनाने बसून राहणे, घरी पाहुणे आल्यास त्यांच्याशीही अल्प (थोडे) बोलणे म्हणजे इतरांशी संपर्क तोडून आपल्याच तमोमय वातावरणात राहणे. पूर्वीच्या आवडीनिवडी, छंद यातही रस न राहणे, जसे इंद्रधनुष्यातीलही रंग पांढरेफटक  व्हावेत, अशी स्थिती भासणे (पांढरेफटक किंवा काळेभोर)
 

 
अनुत्साह, बलहानी
 
नीट विश्रांती आणि आहारसेवन न झाल्यास ताकदही कमी होते. थकवा जाणवतो. आत्मविश्वास, उत्साह कमी होतो. कुठल्याही क्रियेत लक्ष लागत नाही. मन एकाग्र होत नाही. स्वतःबद्दल कीव येते, राग येतो, अपराधी वाटू लागते आणि आपण कशातच चांगले नाही, ही भावना मनात घर करू लागते. नैराश्याची परिसीमा म्हणजे आत्महत्येचा प्रयत्नही केला जाणे (एकदा नव्हे वारंवार प्रयत्न केले जातात) तसेच व्यसनाधीनताही उत्पन्न होऊ शकते. पोषक आहार आणि विश्रांती नसल्यामुळे प्रसूती ही सातव्या महिन्यात किंवा प्रीटर्म होण्याची शक्यता वाढते. तसेच जन्माला येणारे बाळ हे रोगट आणि कमी वजनाचे असण्याची शक्यता अधिक असते.
 
गर्भावर गर्भिणीच्या नैराश्याचे खालीलप्रमाणे परिणाम बघायला मिळतात. गर्भाला पुरेसे पोषण न मिळाल्याने, गर्भाची संपूर्ण वाढ होत नाही. वाढ खुंटलेली होऊ शकते. तसेच गर्भाचे वजनही कमी असू शकते. गर्भाच्या भावनिक, वैचारिक स्तरावरही याचा परिणाम होताना आढळून येतो. बुद्धिमत्ता ही गर्भिणी नैराश्यामुळे खुंटलेली असू शकते. गर्भाचे वजन कमी असल्यास, ते मोठे झाल्यावरही सतत आजारी पडणारे घेऊ शकते. त्यांची प्रतिकारक्षमताही कमी असण्याची शक्यता असते.
 
ही मुले मोठी होताना कमी सक्रिय(Active) असतात. त्यांचा Attention Spanही कमी असतो. चंचलता अधिक असते. ती लगेच चिडतात. यांच्यातही पुढे जाऊन नैराश्याची लक्षणे उत्पन्न होण्याची शक्यता अधिक असते. ही मुले व्यसनाधीन होण्याची शक्यताही बळावते. नैराश्य हा केवळ मानसिक आजार असला तरी त्याचे पडसाद शारीरिक अवयवांवर होताना तर आढळतातच, त्याचबरोबर गर्भिणीमध्ये त्या गर्भावरही परिणाम होतो, जे काही अंशी त्याच्या संपूर्ण जीवनभर राहतात. त्यामुळे याची चिकित्सा अत्यंत महत्त्वाची आहे.
 
यात औषधी चिकित्सेपेक्षा आयुर्वेदातील सत्वविजय चिकित्सा अधिक प्रभावी पडते. विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील रज आणि तमोगुण कमी होतात आणि सात्विक गुणवर्धन करता येते.
 
भरपूर विश्रांती, उत्तम आहार आणि व्यायाम या सर्व गोष्टींमुळे शरीरातील सकारात्मक स्राव वाढतात.(जसे Serotonin) आणि नैराश्याचे प्रमाण नियंत्रणात येते. नैराश्यावर मात करण्यासाठी ओमकार साधनेचा खूप चांगला उपयोग होतो. शरीरात सकारात्मक संवेदना उत्पन्न झाल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. प्रसन्न वातावरण, साथीदाराची साथ, घरातील अन्य व्यक्तींचा पाठिंबा आणि संवाद यांचे महत्त्व अधिक आहे. पुढील लेखात चिकित्सेची अधिक विस्ताराने माहिती करुन घेऊया.
 
(क्रमशः)
 
- वैद्य कीर्ती देव

वैद्य कीर्ती देव

वैद्य सौ.कीर्ती देव, एम्.डी. (आयुर्वेद, मुंबई), आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजिस्ट. आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सेचा २५ वर्षांचा अनुभव. आयुर्वेदातील त्वचा व केशविकारांवरत उपचार तसेच सौंदर्य शास्त्र यांचा सखोल अभ्यास करून “आयुर्वेदिक कॅास्मेटॅालॅाजी” ही संकल्पना विकसित केली. गेली पंधरा वर्ष त्वचा व केश विकारांवर संपूर्णपणे आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करीत आहेत.
आयुर्वेद व सौंदर्य शास्त्राच्या प्रसारार्थ राष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध व लेख प्रसिध्द. 
अग्रलेख
जरुर वाचा
५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात  घरवापसी

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121