shop for change कालच घरच्यांसाठी तांदूळ विकत घेतले. तांदूळ विकत घेतले, ही काय सांगायची गोष्ट आहे? हो! आहेच ते तसे. कारण हे तांदूळ सोमनाथ चोरे यांच्या शेतातले आहेत आणि सोमनाथ चोरे यांचे शेत बारीपाड्यात आहे.
सुमारे १९९०च्या काळात बारीपाडा हे दुष्काळग्रस्त, अन्न, पाणी, वैरण, सरपण अशा मूलभूत गोष्टींची वणवण असलेले खेडे होते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली, सभोवतालचे डोंगर उघडे-बोडके, मातीची धूप झालेली, जमिनीतील पाणी आटलेले, मातीचा कस गेलेला, पावसाच्या पाण्यावर जे काही पिकतं ते नशीब मानून चालायचं. अशा अवघड वेळी चैतराम पवारांनी गावाची धुरा स्वत:च्या हातात घेतली. सोपं नव्हतं ते. सगळ्यात पहिले जंगलतोड थांबवली. जंगल संरक्षक समिती स्थापन केली. ४५० एकर जमिनीवरच उरलं-सुरलं जंगल सुरक्षित केलं. वनाचे रक्षण करणार्यांना बक्षीस आणि नाश करणार्यांना शिक्षा ठरवली. १९९८ पर्यंत जंगलं दाट होऊ लागली, पाण्याची पातळी वाढू लागली, बंधार्यात पाणी दिसू लागलं, हळूहळू सुजलाम-सुफलामची चाहूल लागली. ’जनसेवा’ कडून शेतकर्यांना पीक घेण्याचे प्रशिक्षण मिळू लागले. आज आम्ही बारीपाड्याचा तांदूळ खातोय. पुढल्या वर्षी इथल्या रसाळ स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेऊ.

अण्णा हजारेंचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहेच. १९७०च्या दशकात सैन्यातून निवृत्त होऊन ते रखरखीत राळेगणसिद्धीत आले. अहमदनगर जिल्हा कायम दुष्काळ पीडित. त्यात राळेगणातल्या मातीची धूप झालेली, पाण्याचे स्त्रोत वाळलेले, कोरडेपणाचा कळस गाठलेला, लोकांमध्ये पराकोटीचे नैराश्य होते. मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले, राहिलेली माणसे दारूच्या व्यसनात अडकलेली. अशा दुरवस्थेत काहीतरी बदल घडवता येईल, हे सांगणेदेखील धाडसाचे होते. याला मोठी चिकाटीच नव्हे, तर हिंमत लागते. सुरुवातीला जे काही पावसाचे पाणी वाहून नेणारे ओढे-नाले होते, त्यांना अडविण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. पावसाचे जेवढे पाणी पडेल त्यांचा थेंब न् थेंब मातीत जिरवायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. गावकर्यांचा सहभाग वाढू लागला. शेतात पिकांचं नियोजन होऊ लागलं. बघता बघता गावाची दशा सुधारली आणि राळेगणसिद्धी देशापुढे एक ’आदर्श गाव’ म्हणून उभं राहिलं. ’जलयुक्त शिवार’ ही महाराष्ट्र सरकारची एक अत्यंत यशस्वी योजना आहे. यामुळे अनेक खेड्यांना पाणी उपलब्ध झाले. पण, देशभरात बारीपाड्यासारखी काही उदाहरणं आहेत जिथे लोकांनी पाण्यासाठी सरकारची वाट न बघता स्वत:च्या जिद्दीने आत्मनिर्भरता कमावली.

१९७९ सालची गोष्ट. देशात भयंकर दुष्काळ पडला. शेती पिकली नाही, लोकांचे हाल झाले. हिमालयातल्या शिवालिकच्या डोंगरातल्या सुखोमजरी गावातही तीच व्यथा होती. पण इथेही आशेचा एक किरण होता. पी. आर. मिश्रा नावाचे एक मृदासंवर्धक गेले काही वर्ष इथल्या पाणलोट क्षेत्रात चरणं बंद करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी गावातल्या लोकांची मदत घेऊन एक मातीचा बंधारा घातला होता, यात हंगामी-पावसाळी ओढा पाणी आणत असे. या बंधार्यातलंच पाणी शेतकर्यांना शेतीसाठी वापरता यावं, अशी लोकांची मागणी होती. परवानगी देण्यापूर्वी मिश्रांना लोकांकडून अशी कबुली हवी होती की, त्यांची गुरं पाणलोट क्षेत्रात चरणार नाही. कारण ती चरायला लागली की, बंधार्यात परत गाळ जमा होईल. यातून ग्रामपातळीवर पाणी संवर्धनाची सुरुवात झाली. याचे यश बघून ग्रामस्थांनी आणखी काही ओढ्यांवर बांध घातले. आता ते वर्षातून तीन पिकं घेतात. एकेकाळी अन्नधान्यासाठी बाहेरच्या जगावर अवलंबून राहणारे गाव आता बाहेर अन्न विकू लागले आहे. शेतीच नव्हे, तर गवताचा भागही वाढला, वृक्षसंवर्धन झाले. इथले लोक आता दुग्ध-व्यवसाय करून केवढे तरी दूध बाहेर विकतात.

तरुण भारत संघ, डॉ. राजेंद्र सिंहजी हे देखील या श्रृंखलेतलेच. राजस्थानच्या अल्वारचीही अशीच कहाणी. राजेंद्र सिंहांनी लोकांना स्वत:चे भवितव्य स्वत:च्या हातात घेण्याचा मार्ग दाखवला, नव्हे मार्ग दाखविण्यासाठी ते झटले. पारंपरिक जोहड परत बांधण्याचा मार्ग हाच आपल्याला शाश्वत जल देईल, हे पटवले. हजारो जोहड बांधून त्यात पाणी जिरवण्याचे कार्य झाले. ऐन दुष्काळात जिथे कुठे जोहड होते, पाणी संचयनाच्या पारंपरिक पद्धती होत्या, तिथे पाणी उपलब्ध होतं. राजेंद्र सिंहजींनी राजस्थानच्या रूक्ष वाळवंटातही पाणी संचयनाने जेथे फक्त ३०० मिमी पाऊस पडतो तिथेदेखील सुबत्ता येऊ शकते, हे सिद्ध केलं. आज त्यांच्या कामाने प्रेरित झालेले अनेक लोक हेच कार्य पुढे नेत आहेत.
भारतात मोठे धरणं बांधूनही लोकजागृतीने झालेल्या जलसंवर्धनाचे महत्त्व तेवढेच महत्त्वाचे ठरले आहे. कदाचित पाण्यासाठी स्वयंनिर्भर होण्यासाठी हे स्थानिक स्तरावरचे प्रयत्न जास्त उपयुक्त ठरतील.
-अंजना देवस्थळे