संघाचा वेगळा ‘गोवा प्रांत’ म्हणून घोषित करणार्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी तो विसर्जित केल्याची घोषणा केली आहे. ‘‘भाजपला धडा शिकवणे हे आमचे काम होते, आता ते पूर्ण झाले आहे’’ असेही त्यांनी घोषणा करताना म्हटले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा त्यांचा आशावाद किती खरा ठरतो ते उद्या कळेलच, परंतु हे सर्व करीत असताना ‘संघ म्हणजे काय’ याचा त्यांनी कसा विचार केला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दीर्घकाळ चालणार्या कोणत्याही सामाजिक वा राजकीय संस्थेच्या किंवा चळवळीच्या मागे ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रेरणा असतात. त्याशिवाय ती संस्था किंवा चळवळ चालू शकत नाही, परिवर्तन करण्याची गोष्ट तर दूरच. वास्तविक पाहता ’कम्युनिझम’ ही युरोपियन प्रबोधन काळातून निर्माण झालेली विचारधारा आहे. परंतु, ती भारतीय समाजात समजण्याकरता श्रीपाद अमृत डांगे यांच्यापासून डॉ. शरद पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी तिला भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या संस्कृतिक प्रवाहाचे तीन प्रमुख प्रवाह पडतात. या प्रवाहांची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये आहेत व त्यांनी भारताचे सांस्कृतिक विश्व घडविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वैदिक परंपरेने भारतात अखिल भारतीय सामाजिक ढाचा तयार केला आहे. या ढाच्यामुळे भारताचे अखिल भारतीय स्वरूप वर्षानुवर्षे आक्रमणानंतरही टिकून राहिले आहे. परंतु, समाज टिकवण्यासाठी केवळ सामाजिक ढाचा पुरेसा नसतो. त्यांना मूल्यात्मक आयामाची जोड देण्याची आवश्यकता असते. ते काम जैन, बौद्ध या अवैदिक परंपरांनी केले आहे. या दोन्ही प्रवाहांना जोडणारा भक्तिपरंपरेचा सांस्कृतिक प्रवाह मध्ययुगात उत्पन्न झाला आणि त्यांनी सर्वसामान्य हिंदू समाजाचे भावजीवन समृद्ध केले. भारतातील सुप्तावस्थेत असलेल्या एकात्मतेचा प्रत्यय म्हणजे भारताच्या विविध प्रांतात आणि भाषांत साधारणत: एकाच काळात भक्तिसंप्रदायांचा उगम. एकाच वेळी हा उदय कसा झाला याचा अजूनही पुरेसा समाजशास्त्रीय अभ्यास झालेला नाही. तसा करण्याची हिंदू समाजातील पारंपरिक विद्वानांची अशा अभ्यासाची मानसिकता नाही आणि विद्यापीठीय विद्वानांवर युरोपीय समाजशास्त्राचा पगडा असल्यामुळे ते भारतीय दृष्टिकोनातून याचा अभ्यास करीत नाहीत.
भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महानायकांच्या विचारांवर आणि कार्यावर या तीन प्रवाहांचा पडलेला प्रभाव स्पष्टपणे दिसतो. लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे खर्या अर्थाने पहिले लोकनायक म्हणावे लागतील. देशातील सर्व प्रमुख प्रांतात त्यांना लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यांची निर्भयता, स्वातंत्र्याकांक्षा आणि निष्काम कर्मयोगप्रणीत परिश्रमशीलता यांचा प्रभाव समाजमनावर पडला आणि स्वातंत्र्याचा लढा हा खर्या अर्थाने लोकलढा बनला. लोकमान्य टिळकांनी जागृत केलेल्या लोकशक्तीला महात्मा गांधींनी सर्जनशील आशय दिला. त्यातून देशभरात विविध सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. महात्मा गांधींची कार्यपद्धती ही भक्ती संप्रदायाला अनुरूप असल्याने त्यांना देशभरातील सामान्य लोकांशी सहज संवाद साधता आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे स्वतंत्र भारतात सामाजिक समतेची हमी दिली, परंतु तेवढीच हमी त्यांना पुरेशी वाटली नाही. घटनेद्वारे निर्माण झालेला कायदा कृती नियंत्रित करतो, परंतु मनाला नियंत्रित करण्यासाठी धर्म लागतो, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. म्हणजेच त्यांनी अवैदिक परंपरेशी परिवर्तनाचा आपला लढा जोडून दिला.

डॉ. हेडगेवारांनी संघ निर्माण करत असताना यापैकी कोणत्याही एका विशिष्ट परंपरेशी निगडित अशी कार्यपद्धती स्वीकारली नाही. याउलट त्यांनी ब्रिटिश लष्करी संस्कृतीच्या धर्तीवर कार्यपद्धतीचा अंगीकार केला. हिंदूंच्या सामाजिक जीवनात हा नवा क्रांतिकारक प्रयोग होता. याचे कारण त्यांना हिंदू समाजात मानसिक क्रांती घडवायची होती. वैदिक परंपरेतील वर्णीय व जातीवर आधारित सामाजिक भेदभाव त्यांना दूर ठेवायचे होते. अवैदिक परंपरेतील धर्म संस्थापकांच्या नावाने संप्रदाय निर्माण झाले, तसा त्यांना स्वत:च्या नावे हिंदू समाजात नवा संप्रदाय निर्माण करायचा नव्हता. याउलट सर्व समाज संघटित करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. भक्तिसंप्रदायात ईश्वरभक्तीच्या प्रभावामुळे ऐहिक जीवन नश्वर व तुच्छ मानण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली होती, ती डॉक्टरांना टाळायची होती. त्यांना ऐहिकदृष्ट्या यशस्वी, संपन्न व सबळ हिंदू समाज निर्माण करायचा होता.
असे असले, तरी डॉक्टरांनी हिंदू समाजाच्या परंपरेपासून फारकत घेतली असे नाही. वैदिक परंपरेतील अखिल भारतीय सामाजिक व सांस्कृतिक ढाचा निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी अंगीकारले, त्याचबरोबर अवैदिक परंपरेतील जातनिरपेक्ष संस्काराच्या व्यवहाराचा त्यांनी स्वीकार केला. भक्तिसंप्रदायातील ईश्वरभक्तीला राष्ट्रभक्तीचे स्वरूप दिले. हे तिन्ही प्रवाह त्यांनी वेगळ्या आधुनिक स्वरूपात संघाच्या कार्यपद्धतीत विकसित केले.
संघ बाह्यत: लष्करी ढाच्याची व एकचालकानुवर्तित्व मानणारी संघटना वाटत असली, तरी संघाचा अंतरात्मा तसा नाही. गेल्या नव्वद वर्षांच्या परंपरेत संघाने सामूहिक भावविश्व निर्माण केले आहे. हेच भावविश्व आज समाजाच्या विभिन्न क्षेत्रांत प्रवाहित झाले असून त्याने स्वत:चा असा वैशिष्ट्यपूर्ण परिवर्तनाचा प्रवाह निर्माण केला आहे. या प्रवाहाला स्वत:चे वैशिष्ट्य आहे आणि मूल्यांची चौकटही आहे. भाजपचे राजकीय यश प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे आणि मोजता येण्याच्या क्षमतेमुळे लोकांसमोर येते. परंतु, आज लाखोंच्या संख्येत देशाच्या विविध भागांत आणि विविध सामाजिक क्षेत्रांत संघप्रेरणेतील व्यक्तींनी आणि संस्थांनी आपापला प्रभाव निर्माण केला आहे. ही परिवर्तनाची प्रक्रिया कोणा एका व्यक्तीवर किंवा संस्थेवर अवलंबून राहिली नसून तिने स्वत:चे असे विराट स्वरूप धारण केले आहे. यातून निर्माण होणारी सामूहिक मानसिकता ही या प्रवाहांची अंतःप्रेरणा आहे. अशा सामूहिक परंपरेलाही एक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. गेली काही शतके निश्चित तिथीला पंढरपूरला जाणारी वारी निघत राहते. या वारीला येण्याचे कोणी निमंत्रण देत नाही. ती नियंत्रित करणारी कोणतीही एक व्यक्ती नसते. अनेक गावात तिचे मुक्काम असतात, तिथे वारकर्यांची व्यवस्था होते. वारीचा हा जनप्रवाह वर्षानुवर्षे त्याच तिथीला त्याच मार्गावरून तशाच प्रकारे चालत राहतो. स्वत:ला त्या सामूहिक मानसिकतेत समर्पित करता आले, तरच त्या वारीमध्ये चालण्याचे बळ पायात येते. संघाच्या नव्वद वर्षांच्या कालखंडात अशीच अदृश्य सामुदायिक मानसिकता तयार झाली आहे. तीच संघप्रणीत राष्ट्रकार्याच्या वारीची प्रेरणा आहे. वारीमध्ये ‘माझीच विठ्ठलावर अधिक भक्ती आहे’ असा अहंकार असणारी व्यक्ती किंवा गट, मानसिकदृष्ट्या त्या वारीचा भाग बनू शकत नाहीत. अहंकाराचे विसर्जन हे वारीमध्ये चालण्याची पूर्वअट असते.
-दिलीप करंबेळकर