आज जागतिक महिला दिनानिमित्त लेख लिहिताना आनंद व्यक्त करावा की, खंत अशी मनस्थिती झाली आहे. कारण एकीकडे अनेक क्षेत्रांमध्ये नावलौकिक, केलेल्या कामांची दखल घेऊन समाज तिचे गोडवे गात आहे. स्त्री हे एक स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व असून तिच्या विचारांना आदर दिला जात आहे, तर दुसरीकडे तिच्यावर होणारे बलात्कार, अत्याचार, फसवणूक, गर्भात तिला मारून टाकण्याचा खेळला जाणारा क्रूर डाव अशा विविध घटना डोळ्यांसमोर आल्या की मन सुन्न होते.
आजच्या २१ व्या शतकात स्त्री-पुरुष समानतेची शिदोरी घेऊन आपण समाजामध्ये वावरत आहोत. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना प्रत्येक गोष्टींमध्ये समान हक्क, समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बदलत्या काळानुसार आपली विचारसरणी बदलून तिला आदरपूर्वक न्याय दिला जात आहे. तिच्याकडे केवळ एक उपभोगाची वस्तू म्हणून न पाहाता तिच्या कलागुणांना वाव देऊन तिला स्वावलंबी बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पण याच समाजामध्ये आजही महिलांचा विचार एका चौकटीमध्ये राहून केला जातो व तिला दुय्यम वागणूक, तिचा मानसिक छळ केला जात आहे. रूढी, परंपरेच्या नावाखाली तिचा हवा तसा वापर करून घेणार्या एका विशिष्ट वर्गाला काय बरे म्हणायचं हेचं नेमकं उमगत नाही...
आज एकविसाव्या शतकात आपण महिलांनी बरीच मजल मारली आहे. आज प्रत्रेक क्षेत्रात ती पार रोवून खंबीरपणे उभी आहे आणि हे कौतुकास्पद आहे. आज या स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे, परंतु 'जागतिक महिला दिन' साजरा करण्यामागे एक इतिहास दडलेला आहे. तोही जाणून घेणे गरजेचे आहे. एका जर्मन महिलेला महिलांच्या कष्टाची जाणीव झाली आणि ती जगासमोर यावी यासाठी तिने प्रयत्न केले. असंख्य कामगार महिलांनी तिला उत्तम साथ दिली. २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभरातील जवळजवळ सर्व महिलावर्गाला मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्र होते. या स्त्री-पुरुष विषमतेसाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्त्रिया प्रयत्नशील होऊ लागल्या होत्या. यासाठी १९०७ मध्ये स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशर तडफदार कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे, अशी जोरदार घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये स्त्री कामगारांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या. या अमेरिकेतील महिलांच्या व्यापक कृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्कमधील कोपनहेगन या शहरात दुसर्या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेत मांडला. तो दिवस होता ८ मार्च १९१०. आणि म्हणूनच अमेरिकन स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
आज स्त्रीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव कोरले आहे, आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. पूर्वी चूल आणि मूल हे तिचे जग होते. काळानुसार भोवतालची परिस्थिती बदलत गेली आणि आपल्या दैनंदिन जबाबदार्या यशस्वीरित्या पार पाडत तिने शिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. शिक्षणाचे बळ मिळाल्यानंतर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावत तिने बाहेरच्या जगात प्रवेश करून नोकरी करण्याचा मार्ग स्वीकारला. नोकरीच्या ठिकाणी स्वबळावर तिथेही आपल्या कामाची छबी निर्माण केली. हे सगळं वाचल्यावर वरवर सगळं चांगलं दिसत असलं तरी तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता आणि आजही नाही. या सर्व प्रवासामध्ये तिला अनेक धक्के, यातना, त्रास सहन करावा लागला. आजची स्त्री या जबाबदार्या सांभाळूनदेखील आर्थिक क्षेत्रात खंबीरपणे उभी आहे, पण खरंच ती स्वतंत्र आहे का? असा प्रश्न न राहून पडतो. आज पुरुषांच्या तशा नजरा अजूनही महिलांचा आत्मविश्वास खच्ची करत आहेत. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकांमध्ये वावरणार्या तरुणी, महिला खरंच सुरक्षित आहेत का? ही परिस्थिती खेड्यापाड्यापासून मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. आज मुलगी झाल्यावर घरी लक्ष्मी आली, पणती आली, अशा उपमा दिल्या जातात. मुलगी झाली की गावामध्ये साखर वाटली जाते, नात झाली म्हणून एक सासू सुनेला एक महागडी भेटवस्तू देते. हे सगळं वाचल्यावर 'देश बदल रहा है' याचा अनुभव येतो. परंतु याच देशामध्ये गर्भनिदान चाचणी करून मुलाच्या अपेक्षेने मुलीचा जन्म होऊ न देण्याचा बुरसट विचारही काही मंडळी करत असतात. मग या बदलत्या काळाच्या प्रवाहामध्ये अशी मंडळी कशी येणार? त्यांची विचार करण्याची पद्धत कधी बदलणार? आज कित्येक गावांमध्ये, इतकेच काय शहरांमध्येही उमलती कळी फुलण्याआधीच तिला मारून टाकले जाते. रस्त्याच्या कडेला, कचराकुंडी, रेल्वे रुळांवर कित्येक स्त्री अर्भकं जीवानीशी मुकतात. असे विदारक चित्र डोळ्यासमोर आले की नकळतपणे प्रगतीचे चार पावले मागे गेल्यासारखे होते.
आज अनेक महिला या स्वावलंबी झाल्या आहेत खर्या, परंतु केवळ नावापुरत्याच. कारण त्यांनी कमावलेले चार पैसे खर्च करण्याची साधी परवानगीदेखील दिली जात नाही. घरातले काही महत्त्वाचे निर्णर घेताना त्या गृहलक्ष्मीचे मत विचारात घेतले जात नाही. तिला फक्त निर्णय सांगितले जातात. आज कमी शिक्षण झालेल्या अनेक महिला, तरुणी छोटे-मोठे काम करून घर चालवण्यासाठी मदत करत आहेत, परंतु तिथे तिला म्हणावा तसा आदर केला जात नाही. कारण नोकरी ही केवळ पैसे कमविण्यासाठी करायची असते, असा समज आपल्याकडे आहे. नोकरी केल्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत, आपण स्वतःची एक प्रतिमा तयार केली आहे, याच गोष्टी विचारात घेतल्या जात नाही. आज कामाच्या ठिकाणीदेखील आपल्या गुणांच्या जोरावर महिला कर्मचार्याला नवीन पद, प्रमोशन मिळाले की पुरुषाची मने दुखवतात. मग तिच्या कामामध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो. आता या सर्वांमध्ये केवळ पुरुषच महिलांवर अन्याय करतो, असे नाही. एक महिला दुसर्या महिलेच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस केवळ या सर्वांसाठी पुरुषांना दोष देऊन फायदा नाही, ही बाजूदेखील तितकीच खरी आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आज महिलांचा आदर, सत्कार केला जाईल. शहराच्या कानाकोपर्यामध्ये महिला दिनाचे विविध कार्यक्रम घेतले जातील, परंतु महिलांच्या कर्तृत्वाची दखल केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी स्मरणात ठेवली पाहिजे. मी एक महिला आहे, मी एक स्त्री आहे, असे विधान जेव्हा अभिमानाने व आनंदाने प्रत्येक स्त्री करू शकेल तेव्हाच महिला दिन खर्या अर्थाने साजरा होईल. कारण, तेव्हाच महिलांमध्ये एक शक्ती, आत्मविश्वास आलेला असेल. स्त्री ही एका क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते, या वचनाप्रमाणे ही माता आपल्रा स्त्रीशक्तीचा वारसा येणार्या पुढील पिढ्यांना देत राहिल. स्त्री-पुरुष या भेदापेक्षा आपण सर्वजण माणूस आहोत हे विसरून चालणार नाही. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे या एवढ्याशा हट्टाने पेटलेले आज आपणाकडे बोटांवर मोजण्या इतकेच आहेत आणि खरेतर आज त्याचीच नितांत गरज आहे आणि हा माणूस फक्त स्त्रीच निर्माण करू शकते. म्हणूनच जी स्त्री सर्वसामान्य असून प्रचंड अडचणींना धैर्याने तोंड देते, जिच्याकडे स्वत:ला समर्पित करण्याची अमर्याद शक्ती असते, इतरांना जगवायला, टिकून राहायला जी धीर देते, अशा स्त्रियांना आपण त्यांच्या कामाची पोचपावती दिलीच पाहिजे.
-सोनाली रासकर