नावा प्रमाणेच हा लघुपटही खूप स्पेशल आहे. अनेकदा अनेकांसोबत असं होतं, की एखाद्यासाठी आपण खूप काहीतरी चांगलं करतो, छान करतो, पण त्या व्यक्तिचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याने आपल्याला चांगलं म्हणावं अशी नकळत अपेक्षा असते. संपूर्ण जग आपली प्रशंसा करत असताना रितं रितं वाटतं कारण त्या व्यक्तीनं प्रशंसा केलेली नसते.. आणि मुलींसोबत हे प्रमाण जरा अधिकच आहे. असंच काहीसं दाखवण्यात आलं आहे, या लघुपटात. मॅजिक अवर क्रिएशन्स आणि वीर क्रिएशन्स निर्मित तसेच शिवदर्शन साबळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि मन्वा नाईक आणि अभिजीत साटम यांनी अभिनय केलेला हा एक उत्तम लघुपट आहे.
भावनिक गरजेवर अत्यंत सोप्या भाषेत भाष्य करणारा हा लघुपट आहे. कधी कधी भावना मनात ठेवणं योग्य नसतं. मनात जे काही आहे ते बोलून व्यक्त केलं पाहीजे, त्यामुळे कदाचित आपल्या माणसाच्या चेहऱ्यावर येणारा आनंद आपल्यालाही आनंद देवून जाईल. असा मोलाचा संदेश देणारा हा लघुपट आहे.
अत्यंत उत्तम स्वयंपाक करणारी नंदिनी, तिच्या नवऱ्याला आवडतं म्हणून रोज एक स्पेशल डिश करते, मात्र त्याच्याकडून तिला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. एक गृहिणी म्हटल्यावर तिला गृहीतही धरल्या जातं.. पण यावर उत्तर म्हणून ती काय करते? चला तर बघूया ही स्पेशल डिश..