दागिन्यांनी घडविले...

    28-Mar-2017   
Total Views |

 
 
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाने नोकरी करूनच आपला उदरनिर्वाह करावा, ही मानसिकता आपणच निर्माण केली आहे. वर्षांनुवर्षे चालत आलेल्या या परंपरेला बाजूला सारून एखादा छोटा-मोठा व्यवसाय करून आपली स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करण्यासाठी सहसा पुढाकार घेतला जात नाही आणि म्हणूनच ‘व्यवसाय करणे हे आपल्याला जमणार नाही बुवा,’ असे म्हणत आपण माघार घेतो. पण चिकाटी, मेहनत आणि सद्यपरिस्थितीशी जुळवून घेतले, तर व्यवसायामध्येच उंच झेप घेता येते, हे दागिने घडविण्याचा व्यवसाय करणार्‍या ठाण्याच्या जयश्री रामाणे यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
 
जयश्री रामाणे यांचे बालपण भायखळ्यामध्ये गेले. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या जयश्री यांचे कुटुंब व्यवसायापासून चार हात लांबच होते. मध्यमवर्गीय मराठी माणसाने सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोकरी करून घर चालावावे, असेच त्यांच्या घरचे वातावरण. आणि त्यात मुलींनी नर्स किंवा शिक्षिकेची नोकरी करावी, असे समीकरणच त्यांच्या घरच्यांनी बनवले होते. त्यातच आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे वन रुमकिचनमध्ये राहताना त्यांच्या वडिलांचे आयुष्य शेवटपर्यंत घराचे हफ्ते फेडण्यामध्ये गेले. जयश्री यांनी बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले. पण नर्स आणि शिक्षिका यापलीकडे जाऊन काही तरी वेगळे करण्याचा जयश्रींचा मानस होता. त्यातच दागिने घडविण्याची कला त्यांना शांत बसू देत नव्हती. कोणतेही रीतसर प्रशिक्षण घेतले नसतानाही दागिने बनविण्याची उपजत कला त्यांच्यामध्ये होती. शिक्षण संपल्यानंतर डीटीपी ऑपरेटर म्हणून त्यांनी नोकरी केली. नोकरी लागल्यानंतर लगेचच दोनाचे चार हात करण्याची चर्चा होऊ लागली आणि १९९८ मध्ये जयश्री यांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर एक-दोन वर्षांमध्ये पाळणा हलला पाहिजे, ही त्यांच्या घरामध्ये चालत आलेली परंपरा त्यांना पाळावी लागली. त्यातच लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनंतर त्यांच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे घराचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले. जयश्री यांच्या सासूबाई भाजीविक्रीचा व्यवसाय करत होत्या; परंतु त्यातून कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यामुळे दिवस गेल्यानंतर नोकरी सोडावी लागली. याच काळात जयश्री यांना कन्यारत्न झाले. त्यामुळे जबाबदारीमध्ये अजूनच भर पडली. पण आयुष्याच्या याच टप्प्यावर आर्थिक संकटं मात्र काही त्यांची पाठ सोडत नव्हती. जयश्री यांनी नोकरी केली खरी; परंतु त्याचा आर्थिक मोबदला त्यांना काही वेळेवर मिळत नव्हता, तर काही वेळेस तोही मिळाला नाही. त्यातच त्यांच्या मुलीचे पाळणाघरामध्ये मन रमले नाही. त्यामुळे त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले. घरच्या जबाबदार्‍या, मुलीचे संगोपन करत चार पैसे कसे मिळविता येतील, असा एकच प्रश्न त्यांना सतावत होता. अशातच त्यांच्या परिचयातील एका महिलेने दागिने घरी जाऊन विकण्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जयश्री यांचा ढासळलेला आत्मविश्वास पुन्हा जरासा वाढला. कारण दागिने त्यांचा तसा जिव्हाळ्याचा विषय होता. दागिन्यांची विक्री करण्यासाठी समोरच्या ग्राहकांशी कसा संवाद साधायचा, आपण विकत असलेल्या दागिन्यांची सविस्तर माहिती कशाप्रकारे द्यायची, याचे कौशल्य त्यांना अवगत होते. त्यामुळे जास्त विचार न करता त्यांनी या व्यवसायामध्ये उडी घेण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच त्यांचा दुसर्‍या टप्प्यातील संघर्ष प्रवास सुरू झाला. जयश्री यांनी २००० सालापासून दागिने बनविण्याच्या कामाचा श्रीगणेशा केला. नवीन डिझाईन तयार करण्याकडे त्यांचा विशेष कल होता. लहान मुलींपासून ते अगदी वयाची साठी ओलांडलेल्या महिलांना डोळयांसमोर ठेवून त्या दागिने घडवू लागल्या. प्रत्येक वेळेस नवनवीन कलाकृती घडविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ठाण्याच्या समर्थ भांडार परिसरातील फूटपाथवर त्यांनी आपले टेबल टाकले आणि दागिने विकायला सुरुवात केली. अल्पावधीतच जयश्रीताईंचे दागिने हे स्थानिक महिलांच्या चर्चेचा विषय ठरले. सकाळी कौटुंबिक जबाबदार्‍या, मुलीचे संगोपन, दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत दागिने विकणे आणि पुन्हा रात्री ३ वाजेपर्यंत जागे राहून दागिने बनविणे, असा त्यांचा दिनक्रमसुरू होता. यावेळेत भरपूर कष्ट, मेहनत त्यांनी केली; परंतु दुसर्‍या दिवशी नवा दागिना घडविल्यानंतर महिलांकडून होणार्‍या कौतुकामुळे त्या सुखावत असत आणि त्यातून त्यांना अजून प्रोत्साहन मिळत गेले, पण संघर्ष आणि संकटे मात्र त्यांची पाठ सोडत नव्हती. ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र जयश्रीताईंच्या व्यवसायात अडथळा आणू लागला. अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनी कित्येकदा त्यांनी बनविलेले दागिने रस्त्यावर फेकून दिले. पण तरीही डोळे पुसत त्या पुन्हा धीराने उभ्या राहत होत्या. यामध्ये अनेकदा त्यांचे नुकसानदेखील झाले; परंतु त्यांनी ते सर्व सहन केले. या काळात त्यांना खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. रस्त्याच्या कडेला बसून असे व्यवसाय करणारी महिला ही वेगळीच असते, असे काही शाब्दिक टोमणे त्यांच्या कानावर यायचे. पुरुषांच्या तसल्या नजरा, महिलांचे टोमणे त्यांना ऐकून घ्यावे लागत होते. पण जयश्रीताईंची इच्छाशक्ती दांडगी होती. आपल्याला काय करायचे आहे, हे त्यांना पक्के माहीत होते. मग ‘मी जगाचा विचार का बरं करायचा,’ असा विचार करत त्यांनी स्वतःला कामामध्ये वाहून घेतले. जवळपास पाच ते सहा वर्षे फुटपाथवर दागिने विकण्याचा व्यवसाय त्यांनी केला. आता ग्राहकांचा वाढलेला प्रतिसाद पाहून त्यांना हा व्यवसाय मोठा करण्याची गरज भासू लागली. मग त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन नौपाड्यामध्ये एक दुकान भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांच्या मनावर खूपच दडपण आले होते. कारण आर्थिक गणित कसे जुळवायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातच त्यांना कर्ज देण्यासाठी अनेकांनी हात आखडते घेतले. कुटुंबातील सदस्यांनी आर्थिक बाजू सक्षमनसल्याने कर्ज देण्यास नकारात्मकता दर्शविली. पण ते त्यांच्या ठिकाणी बरोबर होते. तरीही सर्वांमध्ये जयश्रींताईंनी ठामनिश्चिय केला होता. पैशांची सोय करण्यासाठी त्यांनी स्वतःचे दागिने विकले आणि नौपाड्यामध्ये एक दुकान भाड्याने घेतले. सुरुवातीला कमी मालामध्ये हा व्यवसाय करावा लागला, पण जयश्री आणि त्यांचे दागिने हे इकडच्या महिलांच्या परिचयाचे झाल्याने त्यांच्या दागिन्यांची मागणी वाढतच गेली. त्यामुळे मागणी, पुरवठा आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ जमल्याने त्यांच्या व्यवसायाला गती प्राप्त झाली. आपला व्यवसाय स्थिरावल्याचे लक्षात आल्यानंतर जयश्रीताईंनी जांभळी नाक्यावर स्वतःचे तीन मजली सराफा दुकान बांधण्याचा निर्णय घेतला. पुन्हा चिकाटीने त्या कामाला लागल्या, पण या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. सरकारी विभागपासून ते पोलिसांची परवानगी घेण्याची प्रक्रिया खूपच किचकट होती. काही ठिकाणी केवळ आपले कामपूर्ण करण्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागले आणि ही बाब त्यांना अजूनही खटकते.
 
‘जयश्री कलेक्शन’मध्ये मॅट, हाय गोल्डचे दागिने, बकुळी हार, तसेच बुगड्यांचे १०० प्रकार, नथीमध्ये १५ प्रकार, शिंदेशाही तोडा, पोहे हार असे नानाविध दागिन्यांचे प्रकार पाहायला मिळतात. दागिने घडविण्यासाठी त्या मालाड येथून माल आणतात. तसेच ऐरोलीमध्ये त्यांचा दागिने घडविण्याचा एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये काही महिला कामकरतात. जयश्री यांनी त्यांना दागिने घडविण्याचे प्रशिक्षण दिले आहे, तसेच ठाण्यातील नौपाडा, जांभळी नाक्यामध्ये असलेल्या दुकानांमध्ये जवळपास ६० कर्मचारी कामकरत आहेत. तसेच या महिला कर्मचार्‍यांना आठ दिवसांनंतर जयश्रीताई मार्गदर्शन करतात. महिला ग्राहकांशी कसा संवाद साधायचा, सर्व दागिन्यांची नावे, दागिन्यांसाठी कोणते मटेरियल वापरण्यात आले आहे, एखाद्या दागिन्याची कशाप्रकारे ऍलर्जी होऊ शकते, याबाबत त्या कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करतात. तसेच अनेक हौशी महिलांना या व्यवसायात आणण्यासाठी त्या मदत करतात. आज जयश्रीताईंचे दागिने हे केवळ ठाण्यापुरतचे मर्यादित न राहाता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. ‘‘आयुष्याच्या प्रवासामध्ये संकटे ही आलीच पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्यामध्ये असणारी ताकद कळत नाही. आज माझ्या आयुष्यात जी काही संकटे, अडीअडचणी आल्या, त्यामुळेच मी आज या टप्प्यावर उभी आहे, पण आजही व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व आहे.’’ त्यामुळे या व्यवसायात स्त्रियांचा प्रवास हा खूप त्रासदायक असल्याची खंत जयश्रीताई व्यक्त करतात.
 
- सोनाली रासकर

सोनाली रासकर

समाजशास्त्र, इतिहास घेऊन बी.ए. पत्रकारिता व मास कम्युनिकेशनमध्ये डिप्लोमा केला आहे. फिचर स्टोरी, तसेच  सामाजिक विषयावरील लिखाणाची आवड, गुन्हेगारीशी संबंधित मालिका बघण्यामध्ये रस. सध्या दै. ’मुंबई तरूणभारत’मध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत.

404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121