उद्योजक गृहलक्ष्मी

Total Views |
 

 
 
सफाळ्यापासून काही किलोमीटर अंतरावर वसलेलं एडवण हे गाव. खरं तर मुंबईपासून दूर असलं तरी पर्यटनाच्या दृष्टीने काहींच्या कदाचित परिचयाचं. पण आज या गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली ती या गावातील एका कर्तबगार लघुउद्योजिकीने. एक सामान्य गृहिणी ते यशस्वी उद्योजिका असा अस्मिता चौधरी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या ‘लक्ष्मी मसाले’ आणि ‘सहेली’ उत्पादनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. उद्योगजगतातील अशा या महिलांच्या अस्मितेची शान उंचावणार्‍या उद्योजिकेच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा...
 
आज महिलांनी पादाक्रांत केले नाही, असं क्षेत्र शोधूनही सापडणार नाही. त्यातही महिला उद्योजिकांनी वेळोवेळी त्यांच्या कामगिरीतून ‘हमकिसीसे कमनही’चा ही उक्ती सिद्ध करत समाजात सन्मानाचे स्थान प्रस्थापित केले आहे. मग ती महिला एक मोठी उद्योजिका असो किंवा लघुउद्योजिका.
 
एडवण... पालघरमधील सफाळ्याजवळील निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव. शहरापासून दूर असा शांत समुद्रकिनारा आणि देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची लागलेली रीघ... इथल्या स्थानिकांनाही कामासाठी बराच पल्ला गाठून जवळील वसई-विरार आणि मग मुंबई गाठावी लागते. अशा या छोट्याशा गावातील महिलांसाठी रोजगाराच्या संधींची कवाडं खुली करणार्‍या आणि मसाल्यांच्या क्षेत्रात नावारूपाला आलेलं नाव म्हणजे अस्मिता चौधरी.
 
लहानपणापासूनच अस्मिता यांना वडील आत्मारामपाटील यांच्याकडून व्यवसायाचं बाळकडू मिळालं. त्यांचे सासरे सखारामचौधरी हेदेखील व्यवसाय क्षेत्रातीलच असल्यामुळे त्यांची व्यवसायाची परंपरा लग्नानंतरही कायमराहिली. त्यामुळे शिक्षणानंतरही त्यांनी व त्यांचे पती अरविंद चौधरी यांनी नोकरीचा मार्ग न स्वीकारता व्यवसायात उडी घेतली. सासर्‍यांनी सुरू केलेल्या आदर्श भात गिरणीपासून चौधरी दाम्पत्याने व्यवसायाचा शुभारंभ केला. पुढे साध्या चक्कीद्वारे मसाले दळून देण्यासही त्यांनी सुरुवात केली. यावेळी त्यांना पतीबरोबरच त्यांचे दोन्ही दीर अशोक आणि मधुसूदन यांचीदेखील मोलाची साथ लाभल्याचे अस्मिता चौधरी आवर्जून सांगतात.
 
अगदी सुरुवातीला केवळ मसाले दळून देणार्‍या चौधरी नंतर मागणीनुसार मसाले तयार करुन विकू लागल्या. या व्यवसायाच्या प्रारंभी आसपास आणि घाऊक दराने उपयुक्त साधन-सामग्री मिळविणे त्यांच्यासाठी निश्चितच आव्हानात्मक होते. कारण, एडवण हा ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी हवा तसा माल मिळणंही अशक्य. तेव्हा अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्राहकांना त्यांच्या मागणीनुरुप, उत्तमदर्जा व परवडणारी किंमत राखून मसाले विकण्याचं आव्हान चौधरी दामप्त्याने केवळ स्वीकारलचं नाही, तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर साकारही करुन दाखवलं. ऊन-पावसाची काडीमात्र चिंता न करता वाशी मार्केटमध्ये जाऊन मसाल्यांसाठी उत्तमदर्जाचा कच्चा माल निवडून ते एडवणपर्यंत आणायचे. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार आणि परवडणार्‍या दरात मसाले ग्राहकांना विकण्याचे कसब त्यांनी लवकरच आत्मसात केले आणि ग्राहकांनी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे चौधरींच्या व्यवसायाने अल्पावधीतच प्रगतीचे यशोशिखर गाठले.

 
आजघडीला चौधरींच्या या व्यवसायात २० ते २५ वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करण्यात येतात. तसेच सध्या चौधरी दाम्पत्याने मसाल्यांव्यतिरिक्त मधुमेहासारख्या आजारावरही गुणकारी अशी औषधे तयार करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या एकूणच व्यवसायाला केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि अन्न व औषध विभागाकडून मान्यताही मिळाली आहे.
 
चौधरी कुटुंबीयांच्या या मसाल्यांच्या व्यवसायामुळे गावातील अनेक महिलांना आणि काही बेरोजगार पुरुषांनादेखील रोजगार मिळाला आहे. १० ते १२ महिला सध्या या लघुउद्योगात सक्रियपणे कार्यरत आहेत, तर बरेचदा मालाची मागणी वाढल्यास हंगामी तत्त्वावरदेखील अनेक कामगार मंडळींना कामावर रूजू केले जाते. शाकाहारी आणि मांसाहारी लोणची बनविण्यासाठी लागणारे साहित्यदेखील चौधरी कुटुंब गावकर्‍यांकडून खरेदी करत असल्यामुळे गावातील छोटे शेतकरी आणि कोळी बांधवांनाचादेखील रोजीरोटीचा प्रश्न मिटला. त्यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त गावकर्‍यांचा आणि त्यांच्याकडे कामकरणार्‍या कामगार वर्गाचाही त्यांच्या यशात मोलाचा वाटा असल्याचे त्या सांगायला विसरत नाहीत. ग्राहकांच्या आवडीनिवडीची आणि त्यांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता मसाल्यांची काळजीपूर्वक निर्मिती करण्यात येते. चौधरी यांच्या व्यवसायाची व्याप्तीदेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक कॅटरर्सकडूनही त्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘लक्ष्मी मसाल्या’च्या यशस्वितेवर समाधान न मानता, अस्मिता चौधरी यांनी ‘सहेली’ उत्पादने या व्यवसायाचीही सुरूवात केली. यामध्ये घरघुती लोणची, चटण्या, शांपू आणि बचत गटांची मदत घेऊन तयार केलेले पापड या सर्वांचा समावेश आहे.

 
व्यवसायाची वाढती व्याप्ती आणि कुटुंबाचा ताळमेळ अस्मिता चौधरी उत्तमरित्या सांभाळतात, इतकेच नाही तर त्यांनी गावचे जबाबदारीचे सरपंचपद देखील भूषविले आहे. एक उद्योजिका ते एक आई, पत्नी, सून अशा सर्वच जबाबदार्‍या त्यांनी स्वखुशीने स्वीकारल्या. घर आणि व्यवसायाव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही अस्मिता चौधरींचा पुढाकार असतो. महिलांनी व्यवसाय कसा करावा आणि त्या दृष्टीने महिलांची पावले उद्योगजगताकडे वळवण्यासाठी त्या अनेकविध उपक्रमांचे, कार्यक्रमांचेही आयोजन करतात. महिला दिनानिमित्तही विविध उपक्रमही राबविले जातात. ज्या महिलांकडे कौशल्य आणि मेहनत करण्याची तयारी आहे, अशा महिलांनी ‘एपीएल’ आणि ‘बीपीएल’सारख्या सुविधांची वाट न पाहता पुढे जाण्याचे प्रयत्न करावे. अशा परिस्थितीत योग्य ते प्रशिक्षण घेऊन सवलतीच्या दरात कर्जे घेऊन आपले व्यवसाय सुरू करावेत, असेही त्या आवर्जून सुचवितात. ज्यांना खरोखरच व्यवसायाची आवड आहे, अशा महिलांना राज्य सरकारनेदेखील मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी मनमोकळेपणाने बोलून दाखविली. ‘‘ज्या महिलांकडे जिद्द आहे, ज्यांची मेहनतीची तयारी आहे, त्यांनी नक्कीच उद्योगधंद्यांत उतरावं. आपलं कौशल्य दाखवावं. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश नक्कीच मिळणार. सुरुवातीला काही समस्या उद्भवल्या तरी डगमगून न जाता स्वत:वर विश्वास ठेवून कामकरत राहिलं पाहिजे. त्यानंतर मिळणारं मेहनतीचं फळ हे नक्कीच गोड असतं,’’ असा अनुभवाचा सल्ला त्या भावी महिला उद्योगिनींना देतात. चौधरी कुटुंबाच्या सहभाग आणि सहकार्यामुळे अस्मिताताईंना व्यवसायाकडे पूर्ण लक्ष केंद्रीत करता आलं. त्यांच्या मुलींनाही साहजिकच आईचा अभिमान वाटतो. ‘‘मोठी जबाबदारी सांभाळताना आईने आम्हा बहिणींनाही खूप वेळ दिला. व्यवसायामुळे ती आईच्या जबाबदारीमधून दूर न जाता तिने दोन्हींचा ताळमेळ खूप उत्तमरित्या साधला. आम्हाला गरज असताना तिने कायमच आम्हाला प्राधान्य दिलं. एवढंच नाही तर आम्हाला उच्च शिक्षणाबरोबच व्यवसायाचं शिक्षणही तिने उत्तमरित्या दिलं. आज आई आणि वडिलांमुळेच आम्हीही यशस्वी झालो आहोत,’’ असे त्यांच्या मुली आनंदाने सांगतात. सामाजिक जबाबदारीचीही जाणीव त्यांच्याचमुळे झाल्याचे त्या सांगायला विसरत नाहीत.

 
तेव्हा, अस्मिता चौधरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील महिलांनीही संकटांवर मात करुन उद्योग क्षेत्रात धाडसाने पाऊल टाकायला हवे. असे झाल्यास गावागावांत खर्‍या अर्थाने विकासाची गंगा सुखसमृद्धीची पखरण करेल.
 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.