प्रत्येकाला कोणती ना कोणती कला अवगत असते. मात्र ती कला प्रत्यक्षात सर्वांपुढे सादर करण्याचं माध्यमप्रत्येकाला मिळतंच असं नाही. पण तरीही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती कला सर्वांसमोर आणण्याचंही धाडस करणारे हरहुन्नरी कलाकारही विरळाच. आपल्या कलेलाच आपली ढाल बनवून मूर्तिकारांच्या क्षेत्रात नावारूपाला आलेले मूर्तिकार म्हणजे केतन राणा. त्यांचाच जीवनप्रवास उलगडण्याचा हा प्रयत्न...
केतन राणा हे नाव केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर गुजरातच्या मूर्तिकारांमध्येही सुपरिचित. त्यांनी घडवलेल्या सुबक मूर्त्यांचे महाराष्ट्राबाहेरही हजारो प्रशंसक. पण केतन राणा यांचा आजवरचा प्रवासही मूर्ती घडविण्यासारखाच बारकाईने, अखंड मेहनतीने कोरलेला. केतन राणा यांचं बालपण डहाणूतलं. मात्र, वडिलांच्या सरकारी नोकरीने त्यांचं बालपणही धुळे, जळगाव असं काहीसं फिरतीवरचं राहिलं. त्यांच्या वडिलांना सरकारी नोकरी मिळण्यापूर्वी घरची परिस्थिती अत्यंत बिकट आणि हलाखीची होती. त्यामुळे लहानपणापासूनच कौटुंबिक परिस्थितीचे कायमभान ठेवून त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले.

केतन राणा यांचे वडील आणि काका हे देखील कलोपासक. त्यामुळे केतन त्यांना कलात्मकतेचं बाळकडू या दोघांकडूनच मिळालं. आपल्या कलाशैलीचा वापर आपण केला पाहिजे, अशी एक कल्पना त्यांच्या वडिलांच्या डोक्यात आली आणि तिथूनच मग मूर्तिकार म्हणून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मूर्ती घडवण्याचा कारखाना कसा सुरू करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. मात्र, तरीही न डगमगता त्यांच्या वडिलांनी धाडसी पाऊल उचलून लघु स्तरावर मूर्तिकलेच्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. यासाठी त्यांना त्यांच्या मित्रमंडळींकडूनही थोडी आर्थिक मदत मिळाली. पण केवळ शाडू मातीच्याच मूर्त्या तयार करायच्या, असा पक्का निर्धार त्यांनी केला. स्थानिक व्यापार्यांकडून शाडूची माती विकत घेऊन त्यांनी मूर्तिनिर्माणाला प्रारंभ केला आणि अल्पावधीतच त्यांच्या हातून घडलेल्या मूर्त्या लोकांच्या पसंतीस उतरु लागल्या.

वडिलांची ही मूर्तिकलेची जादू पाहून केतन यांनाही मूर्तिकलेमध्ये रुची निर्माण झाली. ते कारखान्यात त्यांच्या वडिलांच्या हातून घडणार्या सुबक मूर्त्यांना आपलेसे करु लागले. निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष वडिलांकडून त्यांनी मूर्तिकलेचे धडे गिरवायलासुरुवात केली. एकीकडे पुस्तकातील शालेय शिक्षण, तर कारखान्यात पिताश्रींकडून मूर्तिकलेचा वारसा त्यांनी आत्मसात केला. परिणामी, स्वत: मूर्त्या घडवून वडिलांच्या कामाला केतन यांनी हातभार लावला. मातीशी असलेलं आपलं नातं त्यांनी अधिक घट्ट केलं आणि दहावीनंतर पुढे शिकण्याचा निर्णय न घेता आपलं सर्वस्व मूर्तिकलेसाठी समर्पित केलं. मात्र, राणा यांनी घडवलेल्या मूर्त्यांची वाढती मागणी पाहाता, वेळेत त्या मूर्त्या पूर्ण करण्याचे आव्हानही होतचं. पण तरीही खचून न जाता, आर्थिक परिस्थितीचा अडथळा पार करत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मोठ्या प्रमाणात गुजरातमधून शाडूची माती खरेदी करायला सुरुवात केली. या कामी त्यांना व्यापारी मित्रवर्गाने मोलाची मदत केल्याचेही ते सांगतात. यानंतर ग्राहकांच्या पसंतीनुसार, त्यांनी दिलेल्या छायाचित्रांनुसार गणपती, देवीच्या आणि अन्य मूर्त्या बनवून देण्यास सुरुवात केली आणि केवळ डहाणूपुरता मर्यादित असलेला त्यांचा हा मूर्तीकलेचा व्यवसाय अल्पावधीतच महाराष्ट्रभर आणि गुजरातमध्येही पसरला. एकेकाळी केवळ १५-२० मूर्त्या तयार करणार्या राणा यांच्याकडून शेकडो मूर्त्यांची खरेदी होऊ लागली. मेहनतीच्या जोरावर त्यांनी अनेक यशाची शिखरे गाठली. व्यवसायामध्ये पुढे अनेकदा चढउतारदेखील पाहिले. व्यावसायिक-आर्थिक संकटांचादेखील त्यांना सामना करावा लागला. त्याविषयीचा एक किस्सा सांगताना ते म्हणतात, ’’शाडूच्या मूर्त्या या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांसारख्या नसतात. त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. तेव्हा असेच एकदा मूर्त्या नेत असताना अचानक टेम्पोचे टायर पंक्चर झाले आणि त्यामुळे टेम्पोतील मूर्त्या एका दिशेला सरकल्या. त्यातच मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणीही टेम्पोच्या पत्र्यातून आत शिरले आणि तशाच सगळ्या मूर्त्या एका क्षणाचाही विलंब न होता पाण्यात विरघळून गेल्या. यामुळे जबरदस्त आर्थिक फटका तर बसलाच, मात्र त्या मूर्त्या घडवण्यामागे असलेली मेहनतदेखील पाण्यात विरघळून गेली.’’ तेव्हा, आजही हा प्रसंग आठवला तरी अंगावर शहारा आल्याचे केतन थोडे भावनिक स्वरात सांगतात. पण तरीही न खचता, न डगमगता त्यांनी आपला हा प्रवास पुढे सुरूच ठेवला.

आज त्यांच्या हाताखाली पाच ते सात कामगार पूर्ण वेळ कामकरत आहेत, तर दुसरीकडे गणपती आणि नवरात्रीच्या मोसमात त्यांच्याकडे कामकरणार्या हंगामी कलाकारांची संख्याही कमी नाही. आज मूर्तिकलेच्या क्षेत्रातील दिग्गजांमध्ये केतन राणा यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. केतन राणा यांच्या कामाची दखल घेत सिल्वासाचे महापौर मोहनभाई डेलकर यांनीही त्यांना उत्कृष्ट कलाकृती साकारल्याबद्दल सन्मानित केले, तर दुसरीकडे परिस्थितीची जाण असलेल्या राणा यांनी आपल्याकडे मूर्त्यांच्या डोळ्यांची सजावट करणार्या एका तरुण कामागारालाही मोलाची मदत केली. त्याच्या अंगी असलेले कसब पाहून त्यांनी त्या तरुणाचा फाईन आर्ट्स क्षेत्रातील शिक्षणाचा काहीसा आर्थिक भारदेखील आपल्या खांद्यावर उचलला. आज राणा परिवाराच्या हातून घडणार्या मूर्त्यांचे चाहते दूरवरुन त्यांच्याकडे मूर्त्या घेण्यासाठी गर्दी करतात. यापुढेही आणखी मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढविण्याचा केतन यांचा मानस असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. केतन राणा हे एक उत्तम मूर्तिकार तर आहेतच, मात्र याव्यतिरिक्त ते एक उत्तम छायाचित्रकार देखील आहेत. वेगवेगळ्या ठिकाणचे आकर्षक फोटो कॅमेर्यात कैद करणे हाच मुळी त्यांचा छंद. या क्षेत्रातूनही रोजगार मिळावा यासाठी त्यांनी गावातीलच काही तरुणांना फोटोग्राफीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात केली आहे. असेच कलाप्रेमी केतन राणा यांच्या हातून अशाच प्रकारच्या सुबक मूर्त्या यापुढेही घडतच राहतील आणि त्यांची ख्याती देशभर पसरेल, अशी आशा करूया.
-जयदीप दाभोळकर