कार्यशील काका

Total Views |
 
 
 
रोहिदास पाटील उर्फ ‘काका’ म्हणजे मीरा-भाईंदर क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. परिवार म्हणजे अखंड वाहणारी गंगा आणि समाज म्हणजे आपला परिवार, या भावनेने समाजकारण आणि राजकारणात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अवीट ठसा उमटवला. त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, सचोटी यांच्या जोरावर त्यांनी यशोशिखर गाठले. त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा हा लेख...
 
रोहिदास पाटील हे मूळचे वसई तालुक्यातील जूचंद्रचे. त्यांचं सातवीपर्यंतचं शालेय शिक्षण हे जूचंद्रमध्येच झालं. गावकर्‍यांचं काम शेती आणि मिठागरापर्यंतच मर्यादित असल्यामुळे त्यांच्या गावातून मुंबईकडे जाणार्‍या व्यक्तीही हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्याच. रोहिदास पाटील यांचे वडील शंकर नारायण पाटील हे देखील तेथीलच एका जवळच्या मिठागरात मुकादम म्हणून कार्यरत होते. रोहिदास पाटील आणि त्यांच्या भावंडांनी आपल्या वडिलांचे नाव आपल्या कर्तबगारीतून आणि परिश्रमातून आणखी मोठे केले. पाटील यांचा स्वभाव तसा साधा, सरळ, शिस्तबद्ध. त्यांच्या विनोदी शैलीतून कधी कधी मिश्किलपणाही अगदी सहज झळकायचा. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द त्यांनी आपल्या उराशी बाळगली होती. पुढे त्यांच्या याच जिद्दी स्वभावाचा वारसा त्यांच्या मुलांनाही मिळाला. रोहिदास पाटील यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण जूचंद्र येथील शिक्षण मंदिर या शाळेत, तर त्यापुढील शिक्षण हे वसईच्याच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. मुळातच त्यांचा स्वभाव हुशार आणि अभ्यासू असल्यामुळे १९६३ साली ते ११वी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांच्या घरापासून ते न्यू इंग्लिश स्कूलपर्यंतचा प्रवास जाऊन-येऊन १४ मैलांचा. गाव असल्यामुळे आतासारखी प्रवासाची साधने नसल्यामुळे मध्ये खडतर होडीचा प्रवास करत त्यांनी आपल्या शाळेचा पल्ला गाठला. मात्र, शिकण्याची जिद्द आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी मनाशी असल्यामुळे त्यांनी आपल्यासमोर आलेल्या सर्व संकटांवर मात केली. त्यावेळी नायगाव स्थानकावरून दीड-दोन तासांनी एक रेल्वे मुंबईच्या दिशेने धावत असे. नियोजित वेळेपेक्षाही रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबापुरी गाठता आली नाही, याची खंत त्यांच्या मनाला कायमच बोचत राहिली. पुढे आपले भविष्य घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचे शिक्षण आवश्यक असल्याचीही त्यांना जाण होती. यासाठी त्यांनी आपल्या परिचयाच्या यशवंत म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला आणि मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या बॉम्बे टॉकीजमध्ये टर्नरचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आपले टर्नरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कांदिवली येथील ओमको ऑईल सिल्स कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे ते दहिसरमध्ये एकनाथ शिरोडकर यांच्या कंपनीत रूजू झाले. तिथे कार्यरत असताना त्यांनी बाहेरून आयटीआयची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आणि इथूनच त्यांच्या व्यावसायिक निर्णयाची खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. आपल्या मेहनतीच्या आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांना शिरोडकर यांच्या कंपनीत भागीदारी करण्याची संधी मिळाली आणि एक व्यावसायिक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली
 
१९६९ साली पाटील यांनी रबरचे स्पेअर पार्ट तयार करणार्‍या प्रवीण रबर कंपनीची स्थापना केली. यासाठी त्यांची बहीण आणि तिच्या यजमानांची मोलाची साथ लाभल्याचे ते आवर्जून सांगतात. मात्र, आपली नवीन कंपनी भाईंदर येथे असल्यामुळे जूचंद्र ते भाईंदर असा लांबचा प्रवास रोज करावा लागू नये म्हणून ते भाईंदर येथे स्थायिक झाले. यानंतर त्यांनी १९७९ ते १९८३ या कालावधीत ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रीयल असोसिएशन’चे सेक्रेटरीपद भूषवले. १९७९ साली त्यांनी अभिनव विद्यामंदिर आणि भाईंदर सेकंडरी शाळेचे पदाधिकारी म्हणूनदेखील कामपाहिले. दरम्यान, त्यांनी बांधकाम क्षेत्रातही काही काळासाठी भागीदारी केली. मात्र, या क्षेत्रातील अनेक गोष्टी न पटल्यामुळे त्यांनी बांधकाम व्यवसायाला रामराम ठोकत पुन्हा आपल्या रबर कंपनीवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कंपनीने टिकवलेल्या गुणवत्तेमुळे त्यांच्या उत्पादनांना देशभरातून मागणी वाढू लागली. व्यवसाय वृद्धिंगत होत गेला. नफाही वाढला आणि रोहिदास पाटील यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत गेले.

 
पूर्वीपासून शिक्षणाची आवड असलेल्या पाटील यांनी यानंतर ज्ञानदानाचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शंकर ज्ञान मंदिराच्या अनेक शाखा उभारल्या. या ज्ञान मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करून त्यांना जीवनात योग्य दिशा देण्याचे कार्य ते करत आहेत. या विद्या मंदिरात निरनिराळ्या योजना, उपक्रमराबवले जात असल्यामुळे यांना सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे.

 
व्यवसाय क्षेत्रात कंपनीच्या पारदर्शक कारभारामुळे आणि उत्तम गुणवत्तेमुळे १९९२ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते रोहिदास पाटील यांना ’उद्योगश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कायमच आपल्या कंपनीतील सहकार्‍यांना आपलेसे केले. त्यांच्या अडीअडचणींमध्ये कायमच कामगारांना मोलाची साथ दिली.
 
पाटील यांनी स्थानिक क्षेत्रातील समस्या अगदी जवळून अनुभवल्या. याबद्दल काहीतरी ठोस करण्याची तळमळ त्यांच्या मनात निर्माण झाली. यावेळी त्यांचा संपर्क रामभाऊ नाईक आणि रामकापसे यांसारख्या दिग्गज नेत्यांशी झाला आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाईंदरसारख्या ठिकाणी आपल्या विचारांच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने आपले पाय रोवले होते. त्यातच रोहिदास पाटील यांचे कर्तृत्व अणि सामाजिक प्रश्नांबाबत असलेली जाण आणि तळमळ पाहून १९८५ साली ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी भाजपचे भाईंदरचे अध्यक्षपद पाटील यांच्याकडे सोपवले. त्यांची सामाजिक कारकीर्द जशी मोठी आहे, तशी त्यांची राजकीय कारकीर्ददेखील मोठी आहे. १९९२ ते २००७ दरम्यान सलग पंधरा वर्षे त्यांनी नगरपरिषद आणि महानगरपालिकेत नगरसेवकपद भूषवले, तर २०१२ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. याव्यतिरिक्त त्यांनी कोकण म्हाडा सदस्यपद, ठाणे विभाग भाजप सरचिटणीसपद, ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्षपद, मीरा-भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षपद आणि स्थायी समिती सदस्य अशी विविध पदे त्यांनी आजवर भूषवली आहेत. १९७०-८० दशकात मीरा-भाईंदर परिसरात विजेची समस्या होती. दरम्यान, १९७९ साली रामभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लघुउद्योजकांना वीज मिळवून देत त्यांच्या उद्योगाला चालना दिली, तर या क्षेत्राचा पाणीप्रश्न सोडवण्यातही ‘काका’ कायमच आघाडीवर होते. १९९१ साली रुग्णांच्या सोयीसाठी त्यांनी रुग्णवाहिका सेवा सुरू केली.
 
दुसरीकडे सर्वांसाठी शिक्षणाची मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी ‘शंकर नारायण ट्रस्ट’ची स्थापना केली आणि महाविद्यालयदेखील उभारले. केवळ ४२ विद्यार्थ्यांनीशी त्यांनी आपल्या महाविद्यालयाची सुरुवात केली. मात्र, सध्या त्यांच्या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी निरनिराळ्या अभ्यासक्रमांमधून शिक्षण घेत आहेत. त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय, प्रवीण पाटील तंत्रनिकेतन, रोहिदास पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पदव्युत्तर अभ्यासक्रम-पदवी महाविद्यालय, प्रमिला प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांसारख्या विद्या मंदिरांची स्थापना केली. सर्वांप्रती असलेला आदर, सततच मदतीसाठी असलेली त्यांची तयारी यामुळे ते सर्वांचे ‘काका’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे हे कार्य असेच पुढे सुरू राहावे आणि त्यांनी यापुढेही अनेक यशोशिखरे गाठावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना! 
- जयदीप दाभोळकर

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121