गरज सरो, वैद्य मरो की डॉक्टर, तुम्हीसुद्धा? 

    24-Mar-2017   
Total Views |

माझी लेक चार-पाच वर्षांची होती तेव्हा तिला डॉक्टरी पेशाचं फार आकर्षण होतं. तिचा खेळण्यातला स्टेथोस्कोप घेऊन ती तासंतास आम्हा सगळ्यांना तपासत असायची. एकदा तिला ताप आला होता म्हणून मी तिला तिच्या बालरोगतज्ज्ञाकडे घेऊन गेले होते. ती त्यांना बघून उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'मला पन दोत्तल व्हायचंय'. ते तिचा गालगुच्चा घेत नुसतेच हसले. काहीच बोलले नाहीत. मग निघताना एकदम गंभीरपणे मला म्हणाले. 'तिच्या डोक्यातलं हे डॉक्टर व्हायचं वेड काढून टाका शक्य झालं तर. इट इस नॉट वर्थ इट. फार किंमत मोजावी लागते डॉक्टर होण्यासाठी'. सध्या महाराष्ट्रात जो निवासी डॉक्टरांचा संप चालू आहे त्या निमित्ताने मला तो प्रसंग आणि त्या डॉक्टरांचा तो गंभीर चेहेरा आणि अर्धवट माझ्याशी आणि अर्धवट स्वतःशी बोललेलं ते वाक्य आठवलं, 'फार किंमत मोजावी लागते डॉक्टर होण्यासाठी.' हे वाक्य मी त्यानंतर आणि त्याआधीही अनेक डॉक्टरांच्या तोंडून ऐकलंय, वेगवेगळ्या संदर्भात. 

 

गेले पाच दिवस महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप चालू आहे. मार्ड ह्या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पुकारलेल्या ह्या राज्यव्यापी संपामुळे राज्यभरातल्या सरकारी आणि पालिका रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम झालाय. रुग्णांचे तर अतोनात हाल सुरु आहेत. उच्च न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या आवाहनानंतरही संप मागे घ्यायला निवासी डॉक्टरांनी नकार दिला आहे. त्यामागची कारणेही तितकीच गंभीर आहेत. गेल्या तीन वर्षात विविध सरकारी इस्पितळांमधून निवासी डॉक्टरांना मारहाण होण्याच्या ५० हून अधिक घटना घडलेल्या आहेत. मरण पावलेल्या एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या जमावाने रुग्णालयात राडा करणे, हाती येईल त्या निवासी डॉक्टरला निर्ममपणे मारहाण करणे ह्या सारख्या घटना महाराष्ट्रात आता नित्याच्याच झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धुळ्याच्या सरकारी रुग्णालयात एका निवासी डॉक्टरला तो बेशुद्ध होईपर्यंत तुडवण्यात आलं. त्यात त्याचा एक डोळाही त्याला गमवावा लागला. ऐन पंचविशीतल्या तरुण डॉक्टरला डोळा गमवावा लागणे हे दुःख किती भयंकर आहे ते फक्त तो डॉक्टर आणि त्याचे कुटुंबीयच जाणू शकतील. जवळचं कोणी गमावलं की नातेवाईकांनी दुःखावेगाने सैरभैर होणे साहजिकच आहे. कदाचित त्यावेळेला रुग्णालयाबद्दल, मिळालेल्या डॉक्टरी सेवेबद्दल मनात शंका असणेही आपण एकवेळ समजून घेऊ शकतो पण कायदा हातात घेऊन डॉक्टरला मारहाण करणे ह्याचे समर्थन कुठल्याच शब्दात होऊ शकत नाही.  

 

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, काही लोकांच्या ह्या आतताई कृत्यामुळे सर्व रुग्णांना त्यांची काहीही चूक नसताना त्रास भोगावा लागतोय. निवासी डॉक्टरांचे प्रश्न त्यांच्या जागी बरोबरच आहेत. सरकारी रुग्णालयांमधून जराही उसंत न घेता, मिळेल त्या साधनांनिशी निवासी डॉक्टरांना दिवसाचे सोळा-अठरा तास काम करावं लागतं. तेही बारावीत मर मर मरून, ढीगभर मार्क मिळवून नंतर पाच वर्षे अत्यंत इंटेन्सिव्ह असं शिक्षण झाल्यानंतर. त्यानंतर सरकारी किंवा पालिका रुग्णालयात रेसिडेंसी. त्यानंतर एम डी ची तयारी. त्यातही मोजकेच सीट असल्यामुळे परत रात्रंदिवस अभ्यास करायचा. परत दोन वर्षे शिक्षण आणि शेवटी मग ती एमडीची पदवी एकदाची पदरात पाडून घेतली की मग कुठे व्यवसायाच्या दृष्टीने 'अच्छे दिन' येण्याची शक्यता दिसू लागते डॉक्टरला. वयाच्या तिशीत, जेव्हा बारावीला बरोबर असलेले मित्र-मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करत असतात तेव्हा कुठे डॉक्टरच्या व्यावसायिक करियरची सुरवात होते. अर्थात ह्या क्षेत्रात जाणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड-निवड असते असं आपण म्हणू शकतो पण डॉक्टर्स बहुतेक वेळा असह्य ताणाखाली वावरत असतात हे खरंच आहे. विशेषतः सरकारी इस्पितळांमधल्या निवासी डॉक्टरला तर दिवस रात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागतं. डॉक्टर हा देव असतो. रुग्णसेवेचं कंकण त्याने बांधलेले असल्यामुळे त्याने कुठल्याही रुग्णाला नकार देता कामा नये वगैरे उदात्त विचार आपण नेहमी वाचतो ऐकतो. पण मी असे व्हिडियो बघितले आहेत ज्यात एखाद्या रुग्णाचे नातेवाईक झुंडीने वार्डमध्ये येऊन अगदी लाथा-बुक्क्यांनी, आणि लाठ्या-काठ्यांनी एखाद्या डॉक्टरला मारहाण करत आहेत आणि तिथे असलेले इतर लोक, वार्डबॉय, इतर रुग्णांचे नातेवाईक किंवा इस्पितळाचे इतर कर्मचारी, कुणीही मध्ये पडून त्या डॉक्टरला वाचवायचे कष्ट घेत नाही. तेव्हा कुठे जाते 'डॉक्टर देव आहे' ही मानसिकता? 

 

गेल्या वर्षीही डॉक्टरांचा संप झाला होता. ह्याच कारणावरून. तेव्हा कुणीतरी कोर्टात याचिका दाखल केली होती आणि तेव्हा उच्च न्यायालयाने मार्डकडून आम्ही भविष्यात संपावर जाणार नाही असे आश्वासन घेतले होते. त्याच वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सरकारी रुग्णालयांमधल्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पुरेशी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तरीही सरकारने ह्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि डॉक्टरांवरचे हल्ले चालूच राहिले. त्याचा परिणाम मात्र भोगावा लागतोय निरपराध, गरीब रुग्णांना, ज्यांना सरकारी रुग्णालये सॊडून दुसरीकडे कुठे जाण्याचा पर्याय उपलब्ध नाही. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी सरकारला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाय लवकरात लवकर योजावे लागतील. 

 

ह्याचा अर्थ असा आहे का की, वैद्यकीय क्षेत्रात सगळे आलबेल आहे? तर नक्कीच नाही. बऱ्याच खासगी रुग्णालयातून तर रुग्णांची लूट होतेच पण सरकारी रुग्णालयांमध्येही काही डॉक्टर पेशंटशी अत्यंत उर्मटपणे वागतात. पेशंटच्या वेदनांकडे दुर्लक्ष होतं. त्यांच्या नातेवाईकांच्या काळज्या, प्रश्न समजून घेतले जात नाहीत. अर्थात पेशंट्सची गर्दीच इतकी असते की कधी कधी मनात असून देखील डॉक्टर प्रत्येक पेशंटला वेळ देऊ शकत नाही. त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रात कुठलीतरी फुटकळ डिग्री नावामागे लावणाऱ्या खोट्या डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आहे. ह्या स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या लोकांकडून भोळ्या, अशिक्षित लोकांचे खूप शोषण केले जाते. रोगावर उपचार तर होत नाहीच, पण पैशापरी पैसे जातात आणि रोग शेवटी खूपच बळावल्यावर पेशंटची रवानगी केली जाते जवळच्या सरकारी इस्पितळात. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि तिथल्या उपचारांचा फायदा न होऊन पेशंट मरतो. ठपका मात्र येतो तो बिचाऱ्या सरकारी निवासी डॉक्टरवर. आता सगळीकडे सुळसुळाट झालेल्या खासगी पंचतारांकित रुग्णालयातल्या रुग्णसेवेची तर बातच वेगळी. तिथे प्रत्येक गोष्टीसाठी पंधरा चाचण्या आणि वीस अहवाल मागवल्या जातात. रुग्णांचे शोषण तिथेही होतेच, फक्त पद्धत वेगळी असते. 

 

निवासी डॉक्टरांचे प्रश्न त्यांच्या जागी बरोबरच आहेत पण त्यासाठी दार वेळेला संप करून निरपराध रुग्णांना वेठीला धरणेही चुकीचेच आहे. त्यासाठी सरकारलाच सुरक्षेची पावले उचलावी लागतील नाहीतर ह्या पुढे वैद्यकीय क्षेत्रात येण्याआधी लोक दहा वेळा विचार करायला लागतील. 

 

- शेफाली वैद्य 

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121