वस्तुत: हे दोन्ही शब्द आपल्याला ‘एक विरुद्ध दुसरा’ असेच ऐकण्याची, वाचण्याची सवय झाली आहे. ‘एक विरुद्ध दुसरा’ असा झगडा लावून पोटे भरण्याची सवय असलेल्या आपल्या माध्यमांना यात नेहमी संघर्षच दिसतो. डाव्यांनी या दोन्ही संकल्पना त्यांच्या मासलेवाईक ‘शोषिक विरुद्ध शोषित’ अशा चौकटीत ठोकून ठोकून बसविल्या आणि चालवून नेल्या. ’अभिजन म्हणजे फक्त ब्राह्मण व उच्चवर्णीय’, तर ‘बहुजन म्हणजे या दोन श्रेणी वगळता अन्य जातीत जन्मलेले लोक’ अशी सोईची व्याख्या प्रचलित केली गेली. त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची वैचारिक बीजे पेरती झाली. गेल्या वर्षी निघालेल्या मराठा मोर्चाच्या निमित्ताने हे मोर्चे बहुजनांचे असून त्याचा रोख अभिजनांकडे आहे, असा जावईशोध काहींनी नक्कीच लावला होता. ‘मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत म्हणून हे सगळे सुरू आहे’, ‘मराठा नेतृत्वाला वाव मिळाला पाहिजे’ अशा आवयाही काहींनी उठविल्या. या दोन्ही संकल्पना परस्पर विरोधात उभ्या करण्यासाठीच्या नाहीत. हे भेद सांस्कृतिक आहेत आणि भारतीय संदर्भात ते बहुतांश वेळा परस्परांना पूरक असतात.
अभिजन आणि बहुजन यांच्या श्रेणी निर्माण होण्याची एक पद्धत नक्कीच आहे. रा. चि. ढेरेंनी या विषयाचे उत्तमविश्र्लेषण केले आहे. ‘विठ्ठल एक महासमन्वय’ या पुस्तकात ते आपल्याला वाचायला मिळते. विठोबा ही बहुजनांची लोकदेवता मात्र कालगतीच्या चक्रामध्ये अभिजनांमध्येही लोकप्रिय झाल्याचे ते सांगतात. भिमसेन जोशींची अभंगवाणी ही केवळ बहुजनांमध्ये नव्हे, तर अभिजनांमध्येदेखील तितकीच लोकप्रिय होती. या दोन्ही श्रेणींचे चलनवलन आणि सामाजिक अभिसरणातील त्यांचे योगदान हे समाजशास्त्राचे अध्ययन करणार्यांनी अभ्यासण्याची गरज आहे. यातून काही नवी तथ्ये निघू शकतात. ही प्रक्रिया गतिमान आहे व सातत्याने नवनव्या समीकरणांना जन्मदेत असते. या दोन्ही श्रेणींना परस्परांच्या विरोधात उभे करायचा प्रयत्न केला तर मिळणारे यश दीर्घ टप्प्यातले असू शकत नाही. याचे तपशीलवार अध्ययन झाले तर अलीकडच्या काळात ज्याला ‘बिग डेटा’ म्हणतात अशी काही वेगळी माहितीही यातून निघू शकते. बहुजनांच्या आंदोलनात अभिजनांनीही आपला सहभाग नोंदविल्याचे आपला इतिहास सांगतो. नाशिकच्या काळाराममंदिराबाहेर एक पाटी लावलेली आहे. या पाटीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरप्रवेशासाठी केलेल्या संघर्षात सहभागकर्त्यांची सूची आहे. या सूचीत ज्यांना रूढ अर्थाने ‘अभिजन’ म्हणू शकतो अशा मंडळींची नावेदेखील वाचायला मिळतात. अभिजन व बहुजन निर्मितीची एक निश्र्चित प्रक्रिया आहे. त्या त्या ठिकाणच्या सामाजिक वातावरणातून जी मूल्य परंपरा, रितीभाती व्यक्तीचे सामाजिक भरणपोषण करतात त्यातून व्यक्ती त्या त्या सामाजिक श्रेणीत विकसित होत जातात. अभिजन हे व्यवस्थाकेंद्री, तर बहुजन हे अधिक प्रमाणात समूहमनाने चालणारे म्हणून विकसित झाल्याचे दिसते. बुद्धिप्रामाण्य ही अभिजनांच्या विचाराची पद्धत, तर भावनिक विषय हे बहुजनांच्या प्रेरणांचे स्रोत असतात. त्यातूनच या श्रेणींच्या भाषा, उत्स्ङ्गूर्तता व अभिव्यक्ती आकारास येतात. त्याचेच प्रतिबिंब समाजात आपल्याला पाहायला मिळते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वात चर्चिला गेलेला विषय होता तो म्हणजे शिवसेना-भाजप युती(?). नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल की, अर्थोअर्थी ही बहुजन व अभिजनांचीच युती होती. ती जेव्हा तुटली तेव्हा या दोन्ही घटकांचे झालेले अभिसरण हेच यामागचे कारण आहे, हे लक्षात येईल. २५-३० वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना व भाजप यांनी युती केली, तेव्हा या दोन्ही पक्षांकडे स्वत:ची काही ताकद होती व काही कच्ची बाजूही होती. शिवसेनेकडे मोठ्या संख्येने लोकभावना होत्या, तर जनसंघ किंवा भाजपकडे व्यवस्थात्मक यंत्रणा होत्या, अखिल भारतीय विचार व आवाका होता. शिवसेना लोकसूमहाच्या भाषेत बोलत होती, अभिव्यक्त होत होती, तर भाजप राष्ट्रीय मुद्द्यांच्या आधारे आपले राजकारण करीत होता. मध्यमवर्ग हा भाजपसोबत जाणारा, तर बहुजन ही शिवसेनेची मक्तेदारी होती. या दोन्हींची मिळून ‘एक अधिक एक अकरा’ अशी युती झाली आणि त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही पक्षांना राज्यात व केंद्रात सत्ता संपादन करता आली होती. भाजपकडे त्यावेळी नसलेला बहुजन वर्ग या युतीमुळे आत आला तर शिवसेनेला मध्यमवर्ग सापडला. अभिजन व बहुजन अभिसरणाला सामाजिक, राजकीय व आर्थिक घटकही कारणीभूत ठरतात. केंद्रात झालेला नरेंद्र मोदी यांचा विजय हा या देशातील अनेक सामाजिक, राजकीय प्रक्रिया बदलण्यास कारणीभूत ठरला. आपल्याकडल्या तथाकथित विचारवंतांना व ज्येष्ठ पत्रकारांना मोदीद्वेषातून उसंत मिळत नसल्याने अशी विश्र्लेषणे करता येत नाहीत. पण मोदींच्या नेतृत्वामुळे पूर्वीच्या युतीत झालेली या दोन घटकांची सरमिसळ संदर्भासहित बदलून गेली. भाजपकडे बहुजनांचा ओढा वाढताना पाहायला मिळाला, तर शिवसेना स्वतंत्र लढल्याने मध्यमवर्गाचा काही अंशी हिस्सा त्यांच्याकडे सरकताना दिसत आहे. महापालिका आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तरी हेच घडताना दिसले.
शिवसेना निवडणुकीत वापरत असलेल्या रूपकांची मुक्त माध्यमांवर प्रचंड टवाळी करण्यात आली. तलवार, तुळजाभवानी, लढाईची भाषा इ. परवलीचे शब्द शिवसेना वारंवार का वापरते, असा प्रश्न अनेकांना पडत असतो, मात्र त्याचे उत्तर त्यांच्या मागे वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या बहुजन जनमानसात राहिले आहे. हे मानस ज्या प्रकारे विचार करते त्याच प्रकारची भाषा ‘सामना’ व सेनानेते वापरत राहतात. भाजपचा प्रचार अधिक सुसूत्र, विकासाची – जनकल्याणकारी योजनांची चर्चा करणारा राहिला. लोकशाही व्यवस्थेमध्ये अपेक्षित असलेला व सर्वांना सोबत घेऊ शकेल, असा अजेंडा भाजपने लोकांसमोर मांडला. त्याचाच परिणामम्हणून ही ध्रुवीकरणे होताना दिसली. या दोन्ही पक्षांनी स्वत:चा मतदार सांभाळलाच; परंतु त्याबरोबर काही प्रमाणात एकमेकांचा व राजकीय अवकाशातील अन्य पक्षांबरोबर असलेला मतदारही स्वत:कडे खेचून नेला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने त्यांची पहिली जाहिरात इंग्रजीत तयार केली होती. दुसर्या बाजूला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ ही प्रेरक संकल्पना भाजप शिवसेनेसाठी मोकळी सोडत आली होती, ती यावेळी भाजपने अधिक आक्रमकपणे आत्मसात केली. बहुजनातील अधिकाधिक घटकांना पक्षाची दारे खुली केली आणि आपला जनाधार वाढविला. अभिजन वर्गातली असल्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुरुवातीला जे काही फडतूस डाव खेळले गेले, त्यावरही या प्रक्रियेने मात केली. फडणवीसांची जात काढण्याचे उद्योग स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्या शरद पवारांनी का केले, त्याचे उत्तर इथे दडले आहे. या घटकांचा कुठलेही पूर्वग्रह न ठेवता विचार केला गेला तर अनेक सामाजिक तथ्ये समोर येताना दिसतील.
किरण शेलार