राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे हे मी कुठेतरी वाचलं होतं. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड ह्या पाच राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालानंतर ह्या वाक्याचा अर्थ मला हळूहळू कळायला लागलाय. अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी देखील भारताचं राजकारण काँगेस पक्षाला केंद्रबिंदू मानून त्या पक्षाभोवती फिरत असायचं, पण २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला न भूतो असा विजय मिळाला आणि देशाचा राजकारणाचा केंद्रबिंदू हलला. त्यानंतर झालेल्या सगळ्या राज्य निवडणुकांनी देखील हेच अधोरेखित केलं की काँग्रेस पक्ष अधोगतीच्या वाटेवर आहे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी ह्यांच्या हाताला यश नाही. बिहारमध्ये आणि दिल्लीमध्ये भाजपचा दणदणीत पराभव झाला, पण काँग्रेस पक्ष मात्र वळचणीला फेकला गेला तो गेलाच. २०१७ मधल्या सर्व निवडणुकांच्या निकालात तर काँग्रेसचे अपयश जास्तच ठळकपणे उठून दिसलं. राहूल गांधी ह्यांच्या नाकर्त्या नेतृत्वाचे परिणाम काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून भोगतोय पण राजाने कपडे घातलेले नाहीत हे उघड सत्य बोलून दाखवण्याचे नैतिक धाडस काँग्रेसमध्ये कुणातही नसल्यामुळे राहूल गांधी असेच यापुढेही मोदींचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यात हातभार लावतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्या जोडगोळीने भाजपला अद्वितीय असे यश मिळवून दिले. जवळ जवळ ४१ टक्के मते भाजपच्या पारड्यात घालून मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावरचा आपला विश्वास व्यक्त केला. केवळ जातीचे राजकारण करत वर्षानुवर्षे उत्तरप्रदेशमध्ये आपली पोळी भाजून घेणाऱ्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे तर अस्तित्वच धोक्यात आले आहे. ह्या निकालाचे विश्लेषण करायला म्हणून मला एका हिंदी वृत्तवाहिनीने बोलावले होते. त्या कार्यक्रमात मला बसपाचे एक प्रवक्ते भेटले होते. १० तारखेच्या संध्याकाळी ते मला छातीठोकपणे सांगत होते की 'ये एक्सिट पोलवाले झुगी झोपडीयोंमें नही जाते जी. ये सब झूठ है. बेहेनजी को १८० सीट मिलेंगे. हमारा दलित और मुसलमान मतदाता बसपा को छोड के और कहीं नही जाता, आप चाहे विकास की बात करो या मंदिर की'. त्यांच्या दलित-मुसलमान व्होटबॅंकेवर त्यांचा इतका विश्वास होता की दुसऱ्या शक्यता पडताळून पहायला देखील ते तयार नव्हते. आपल्या मतदारांना गृहीत धरल्याचा त्यांना किती पश्चात्ताप झाला ते दुसऱ्या दिवशी दिसलंच. ११ तारखेला जसजसे निकाल यायला लागले तसतसा त्यांच्या चेहेऱ्यावरचा रंग उडत गेला. नंतर मला गाठून ते म्हणाले, 'लगता है हमारा तो बेडा गरक हो गया'. खरोखरच उत्तरप्रदेशच्या मतदारांनी समजून उमजून मायावतीचा 'बेडा गरक' केला होता. मुळात एक 'जात' हा एकमेव निकष लावून मायावतींनी आजवर त्यांचे राजकारण केले होते आणि वर आम्ही कसेही वागलो तरी 'आमचा हक्काचा' मतदार कुठेही जाणार नाही ही उर्मट अरेरावी. भाजपला भरपूर मतदान करून मायावतींच्या 'हक्काच्या' मतदारांनी दाखवून दिले की त्यांना जातीपेक्षाही विकास हवाय, पुढे जाण्याची संधी हवीय.
समाजवादी पक्षाची तर वेगळीच तऱ्हा. मायावतींचा पक्ष जातीचे राजकारण करणारा तर समाजवादी पक्ष फक्त एका कुटुंबाचे राजकारण करणारा. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंग यांच्या ह्या कुटुंबात यादवी माजल्याचे नाटक करण्यात आले आणि विकासाचे राजकारण मी करतो, कुटुंबाचे नाही ही भूमिका घेऊन मुलायम सिंगांचे चिरंजीव अखिलेश यादव यांनी सवतासुभा मांडला. त्यात अखिलेश यांनी राहूल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाशी युती केली आणि हे दोघे 'यूपी के लडके' शोले सिनेमामधल्या जय-वीरूच्या आवेशात 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' असे म्हणत प्रचार करू लागले. पण सर्वसाधारण भारतीय मतदार शिक्षित जरी नसला तरी सूज्ञ नक्कीच आहे. त्याने हे राजकीय समीकरण म्हणजे शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच होते हे फार पटकन ओळखले आणि अखिलेश व राहूल ह्या दोघांनाही नाकारले. उत्तराखंड मध्येही काँग्रेसची पुरती वाताहत झाली. मावळते मुख्यमंत्री हरीश रावत ते उभे होते त्या दोन्ही जागांवरून पडले. मतदारांनी भाजपला भरभरून मतदान करून मोदींवरचा त्यांचा विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली तरीही नोटबंदी हा मुद्दा सामान्य मतदाराला आवडला आहे हेच ह्या निकालातून सगळ्यांना कळून चुकले.
ह्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेला एकमेव दिलासा म्हणजे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मिळवलेला दणदणीत विजय. पण पंजाबमधला विजय हा राहूल गांधींमुळे मिळालेला नसून केवळ कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वतःच्या बळावर खेचून आणलाय हे सगळ्यांनाच माहिती आहे. राहूल गांधी यांना स्वबळावर खंबीरपणे टिकून राहिलेले अमरिंदर सिंग यांच्यासारखे नेते नकोच आहेत. त्यांनी अमरिंदर सिंग यांना विरोध केला होता शेवटी सिंग यांनी जेव्हा बंडाचा झेंडा फडकवला तेव्हा नाईलाजाने सोनिया गांधी यांनी मध्यस्ती करून प्रकरण मिटवले. पंजाबमध्ये लागलेला निकाल आणखी एका दृष्टीने महत्वाचा होता. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पंजाबच्या मतदाराने शिकवलेला धडा. देशात भाजपला फक्त आम आदमी पक्ष हाच पर्याय उरलेला आहे अश्या गुर्मीत केजरीवाल सदैव वावरत असतात. पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळणार ह्याची केजरीवाल आणि त्यांच्या वैचारिक दृष्ट्या दिवाळखोर गणांना एव्हढी खात्री होती की ११ तारखेला निकाल लागायच्या आधीच त्यांचे विजयोत्सव सुरु झाले होते. त्या विजयोत्सवाचे व्हिडियो आज सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेत आणि आप सगळ्यांच्या टिंगलटवाळीचा विषय बनलाय. पंजाबमध्ये विजय आणि गोव्यामध्ये दमदार पदार्पण होणार हे केजरीवाल यांचे दोन्ही आडाखे मतदारांनी सपशेल हुकवले. ज्या गोव्यात आपल्याला ४१ टक्के मते मिळून आपण सरकार बनवणार असे पोस्टर आपवाल्यांनी दर पाचशे मीटरला लावले होते, त्याच गोव्यात त्यांच्या ४० पैकी ३८ मतदारांचे डिपॉझिट जप्त झाले. आपचे कायम हवेत उडणारे विमान धाडदिशी जमिनीवर आले ही ह्या निवडणुकीच्या निकालांनी साध्य केलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट.
गोव्यामध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरीही सरकार मात्र त्यांचेच बनले हा मनोहर पर्रीकर आणि अमित शहा ह्यांच्या मुत्सद्दीपणाचा विजय आहे आणि काँग्रेस पक्षाचा नाकर्तेपणा. १७ + ३ + १ = २१ हे सोपे समीकरण काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग ह्यांना सोडवता आले नाही. त्याचे कारण एकच होते, काँग्रेसमधल्या निवडून आलेल्या चार लोकांना एकाच वेळी मुख्यमंत्री व्हायचे होते आणि कोणीच मागे हटायला तयार नव्हते. पूर्ण दिवस बैठक होऊन देखील काँग्रेस पक्षाला त्यांचा नेता निवडता आला नाही. तेव्हढ्या वेळात मनोहर पर्रीकर ह्यांनी मात्र दिल्लीहून येऊन १३ + ३ + ३ + २ = २१ हे अवघड समीकरण यशस्वीपणे सोडवून आपण आयआयटीयन असल्याचे जगाला दाखवूनही दिले होते. हाती आलेला 'विजय' काँग्रेसवाल्यांनी गोव्यात स्वतःहून पर्रीकरांच्या हवाली केला आणि वर सुप्रीम कोर्टात जाऊन स्वतःची नाचक्की करून घेतली. म्हणजे तेलही गेले, तूपही गेले हाती धुपाटणे राहिले.
मणिपूरमध्येही काँग्रेसची तीच गत झाली. इबिबो सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २८ जागा जिंकूनही सरकार मात्र बनले ते भाजपचे, कारण काँग्रेस पक्षाला इतर पक्षांचा आणि अपक्षांचा पाठिंबा मिळवता आला नाही. अशी राजकीय समीकरणे मांडून ती यशस्वी करून दाखवण्याची परंपरा काँग्रेसनेच ह्या देशात सुरु केली होती, पण सध्या काँग्रेस हा राजकीय पक्ष इतका पक्षाघात झाल्यासारखा वागतोय की कुठलाही निर्णय घ्यायची धमकच ह्या पक्षाच्या नेतृत्वात उरलेली नाही. अर्थात ह्या सगळ्याची राहूल गांधी ह्यांना जाणीव नसल्यासारखेच ते अजूनही वागत आहेत. पराभवाची कुठलीही जबाबदारी त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारलेली नाही, उलट 'उत्तर प्रदेश मध्ये आम्ही 'थोडेसे खाली घसरलो' असे म्हणून त्यांनी स्वतःच्या सात जाग्यांचे समर्थन केले आहे. आता हा दुर्दम्य आशावाद आहे की सत्य न स्वीकारता आल्यामुळे असलेला वैचारिक गोंधळ आहे हे काळच ठरवेल. सध्यातरी काँग्रेसची पीछेहाट आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची घोडदौड काही काळ तरी अशीच चालू राहील अशी चिन्हे आहेत.
-शेफाली वैद्य