“आबा, आपली सूर्या मंदिरांची यात्रा तर पूर्ण झाली. मग आज सूर्याबद्दल काय सांगणार?”, सुमीतने कुतूहलाने विचारले.
“सुमित, आज आपण भारतातील सूर्यभक्तांचे दर्शन घेऊ! सूर्याच्या महान भक्तापासून – रामापासून सुरवात करू.
“रामायणात दिलेल्या वंशावळी प्रमाणे - विवस्वानचा म्हणजे सूर्याचा पुत्र मनु. मनुची मुले म्हणजे ‘मानव’. इंग्लिश मधील man, mankind या शब्दांचा उगम ‘मनु’ शब्दात होतो.
“तर या सूर्यपुत्र मनुराजाने, मनुस्मृती म्हणजे ‘मानव धर्मशास्त्र’ लिहिले. समाजातील प्रत्येक घटकाचे अधिकार, कर्तव्य, वागणूक, सदाचाराचे कायदे. राजाने कसे वागावे, प्रजेचे अधिकार कोणते, स्त्रियांचे धन काय, पुत्राचे कर्तव्य, कोणत्या गुन्ह्याला कसली शिक्षा द्यावी अशा गोष्टींचा उहापोह या मध्ये केला आहे. भारतातच नाही, तर थायलंड, मलेशिया आदि देशांमध्येही हा कायदा इंग्रज येईपर्यंत लागू होता. अर्थात कायद्यामध्ये जसे बदल केले जातात, तसेच देशकालानुरूप मनुस्मृती मध्ये बदल करत करत १९ व्या शतकात तब्बल ५० वेगवेगळ्या मनुस्मृती उपलब्ध होत्या.
“न्याय आणि सूर्याचा संबंध प्राचीन आहे. मेसोपोटोमियाचा राजा हमुरबी याने ईस. पूर्व १७५० मध्ये धर्मशास्त्र लिहिले. हे Code of Hammurabi या नावाने प्रसिद्ध आहे. हमुरबीला शमश या सूर्यदेवाने हे कायदे दिले होते अशी आख्यायिका आहे. असेच Laws of Conduct देवाने मोसेसला दिले. अनेक देशांचे कायदे या Ten Commandments वर आधारलेले आहेत.”, आबा म्हणाले.
“आबा, पूर्वी सर्वसाक्षी सूर्य ही सर्व काही पाहणारी आणि जाणणारी न्याय देवता होती. आणि आताची न्यायदेवता डोळ्याला पट्टी बांधलेली दाखवतात!”, सुमितची टिपणी.
आबा हसून म्हणाले, “खरे आहे! तर, सूर्यपुत्र मनुने शरयू नदीच्या काठावर अयोध्या नागरी वसवली. ज्या नगरीत शत्रूचा एकही योद्धा शिरू शकणार नाही, ती ‘अयोध्या’!
“मनूच्या कुळातील राजे स्वतःला सूर्यपुत्र या अर्थी ‘सुर्यवंशी’ म्हणत. या कुळात इक्ष्वाकू, हरिश्चंद्र, भगीरथ, रघु हे राजे प्रसिद्धीस आले. या पैकी दशरथचा पुत्र राम. परंपरेप्रमाणे राम देखील सूर्य भक्त होता. राम - रावण युद्धात रावणा समोर उभे ठाकायाच्या आधी अगस्ती ऋषींनी रामाला ‘आदित्य हृदय’ स्तोत्र सांगितले. रामाने हे स्तोत्र म्हणून सूर्याची स्तुती केली, सूर्याचे आशीर्वचन घेतले आणि मग रावणाचा वध करण्यास सज्ज झाला.
“रावणवध केल्यानंतर ब्रह्महत्येच्या पापाचे निरसन कसे करावे, असा रामाला प्रश्न पडला. तेंव्हा गुरु वशिष्टांनी रामाला सूर्योपासना करण्यास सुचविले. त्यांच्या सूचनेनुसार श्रीरामाने सूर्योपासना केली. त्या यज्ञस्थली आता मोढेरा येथे सूर्य मंदिर उभे आहे.”, आबा म्हणाले.
“आबा, तुम्ही रामाकडून सूर्योपासना शिकलात का?”, सुमितने विचारले.
“माझ्या रामकडून काय आणि किती शिकावे? बंधूप्रेम, मातृप्रेम, कर्तव्यपालन, जनकल्याण आणि राष्ट्रभक्तीही शिकवतो! रावणवध केल्यावर राम - लक्ष्मण लंकेचे दर्शन घेतांना, रामाचे वाक्य प्रसिद्ध आहे -
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते | जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी||
“रामाचे काही भक्त सूर्योपासक होते आणि त्यांच्या मध्ये रामाचे सर्व गुण दिसतात. प्रखर तेज, कुशाग्र बुद्धि, कर्तृत्व, सामर्थ्य आणि राष्ट्राभिमान!
“रामाचा सर्वात जवळचा भक्त म्हणजे हनुमान. बाळपणी सूर्याला धरू जाणारा मारुती पुढे सूर्यनारायणाचा शिष्य झाला. गतिमान, शक्तीवान, धैर्यवान, बुद्धीमान, भक्तराज, रामनामधारी आणि राष्ट्रकाजासाठी जीव वेचणारा सेवक ... त्याचे किती गुण वर्णावे!!”, आबा म्हणाले.
“आबा, अलीकडच्या काळातील रामभक्त आणि सूर्यभक्त कोण होते?”, सुमितने विचारले.
“अलीकडच्या काळातील म्हणशील तर, संत एकनाथ. एकनाथांच्या घरी अनेक पिढ्यांपासून सूर्योपासना होती. त्यांच्या पूर्वजांची नावे पण सूर्याची होती - पणजोबा भानुदास आणि वडील सूर्यनारायण! नाथांचे कार्य सूर्यासारखे तळपणारे होते. एकनाथ प्रकांड पंडित होते. मराठी, संस्कृत, पर्शियन भाषांचे तज्ञ होते. शास्त्रांचा प्रचंड अभ्यास होता. काही काळ दौलताबादच्या राजाकडे लेखपाल होते. प्रसंगी हातात तालावर घेऊन लढले होते. समाज सुधारक होते. आणि राष्ट्रप्रेमी असल्याने, परकीय राजवटीची सल त्यांच्या मनात रुतत होती. एकनाथांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी ‘भावार्थ रामायणातून’ शिवाजी महाराजांना रामराज्य स्थापन करायची प्रेरणा मिळाली, आणि महाराजांच्या ‘हिंदवी राज्याने’ टिळकांना ‘स्वराज्याचे’ ध्येय दिले असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही!
“आणखीन एक तेजस्वी रामभक्त म्हणजे - रामदास स्वामी! यांच्या घराण्यात देखील सूर्योपासना होती. त्यांच्या आई वडिलांचे नाव होते- सूर्याजीपंत आणि राणूबाई. एकनाथांची पत्नी गिरिजाबाईंची ही धाकटी बहिण होती. सूर्याजीपंत रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करत असत. रामदास स्वामींनी तपश्चर्येच्या काळात गोदावरीच्या तीरावर गायत्री पुरश्चरण केले होते. स्वामींनी एकनाथांचे राष्ट्र निर्माणाचे कार्य पुढे चालवले. तेजाची आणि शक्तीची उपासना समाजात रुजवली. मारुतीची मंदिरे स्थापन केली. आखाडे स्थापन केले. सूर्यनमस्काराचा प्रचार केला. आणि रामनामाबरोबरच राष्ट्रभक्तीची बीजे रोवली.”
“आबा, म्हणजे शिवाजी महाराज देखील सूर्यभक्त होते का?”, सुमितने विचारले.
“सुम्या सगळच एक दिवशी कसे सांगायचे? पुढच्या भेटीसाठी काही ठेवूया!”, आबा मिश्किलपणे हसत म्हणाले.
- दीपाली पाटवदकर