#ओवी Live - मोत्यांची माळ

    12-Mar-2017   
Total Views |

"महाराष्ट्र मुंबई. राजस्थान जयपूर. गुजरात गांधीनगर ... ", श्रवणची घोकंपट्टी चालू होती.

"कसलं रे नुसते घोकून घोकून पाठ करतोस! जरा चालीत बांध, ठेक्यात म्हण. मग असं घट्ट डोक्यात बसेल की दहा वर्षांनी सुद्धा डोक्यातून काढायचे म्हणालस तरी जमणार नाही.", आई म्हणाली.

"हे काय गाणे आहे का चालित म्हणायला? राजधान्यांची नावे कशी ग चालित बसतील?", श्रवण म्हणाला.

"बघ बरे हे जमतंय का –“, आई जरा विचार करून म्हणाली,


“तमिळ नाडूची चेन्नई, महाराष्ट्राची मुंबई ।

मध्य प्रदेशची भोपाल, मणिपूरची इंफाल ।

झारखंडची रांची, गोव्याची पणजी ।"


हाताने ठेका देत आईने दोन चार ओळी म्हणाल्या.

"आई मस्तच की! जमेल असे करायला! रायपूर आणि जयपूर जुळतंय. श्रीनगर आणि इटानगर ... ", श्रवण जोड्या जुळवायला लागला.

दोघांचे संभाषण ऐकून अभिजित म्हणाला, "आई, माझ्या एका मित्राने अख्खे Periodic Table गाण्यात बसवलंय! पूर्ण पाठ आहे त्याला, माहितेय."

"अरे, हा अभ्यासलेला विषय आहे. कोणतही गाणे ४-५ वर्षांनी जरी ऐकले, तरी मधल्या pieces सकट सगळं आठवते. आपल्या मेंदूची संगीत, चित्र, ठेका, रंग आदी लक्षात ठेवायची क्षमता प्रचंड आहे. त्या क्षमतेचा वापर करून घेऊन आपण लक्षात ठेवायला अवघड असलेल्या गोष्टी पाठ करू शकतो.", आई म्हणाली.

नीला आजी म्हणाली, "हे जाणून आपल्याकडे वेद, सूत्रे, गीता सगळं श्लोकबद्ध करायची पद्धत होती.



"ज्ञानेश्वर म्हणतात - स्वातीच्या पावसाचे थेंब शिंपल्यात पडले की त्याचे सुंदर मोती होतात. आणि मगच त्या टपोऱ्या थेंबांची माळ गळ्यात घालता येते. तसे कृष्णार्जुनाचा गद्य संवाद व्यासांनी छंदबद्ध केला. पद्यात गुंफला. आणि प्रसादासारखा ओंजळीत दिला. त्या टपोऱ्या मोत्यांची माळ कंठस्थ करता येईल अशी सोय केली!”

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121