“सुमित, चंद्राने बांधलेल्या मंदिराची गोष्ट, ही चांद्र कॅलेंडरची गोष्ट आहे, अती प्राचीन. दक्ष राजाला २७ मुली होत्या. या मुली म्हणजे आकाशातील २७ नक्षत्र! उपवर झाल्यावर दक्षाने त्यांच्यासाठी अनुरूप वर शोधला – चंद्र.
“कदाचित दक्ष राजाने नक्षत्रांच्या आधारे चांद्र कॅलेंडरचा शोध लावला असावा. किंवा त्याने आकाशाचे २७ भाग करून नक्षत्रांना नावे दिली असतील! म्हणून त्याला ‘नक्षत्रांचा जनक’ अशी ओळख लाभली असेल.
“ते असो, लग्न झाल्यावर काही दिवसातच चंद्राचे रोहिणी नक्षत्रावर मन जडले. दिवस रात्र तो रोहीणीकडेच राहू लागला. तेंव्हा बाकी २६ पत्नी त्याची तक्रार दक्षाकडे घेऊन गेल्या. संतापलेल्या दक्षाने चंद्राला शाप दिला – ‘तुला क्षय होईल!’
“चंद्र दिवसें दिवस खंगत चालला. शेवटी प्रभास क्षेत्री जाऊन चंद्राने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले आणि चंद्राच्या शापावर उपाय केला – १५ दिवस क्षयाने अगदी नाहीसा झालेला चंद्र पुढचे १५ दिवस वाढत जाऊन पूर्वीचे तेज व स्वरूप पावेल.
“चंद्राच्या जीवात जीव आला! पश्चाताप पावलेल्या चंद्राने दक्षाकडे क्षमा मागितली आणि प्रत्येक पत्नीकडे महिन्यातील एक एक दिवस राहण्याचे वचन दिले.”, आबा म्हणाले.
“खरच की! ही तर खगोल शास्त्रातली कहाणी झाली! चंद्राचा प्रत्येक नक्षत्रात साधारण एक दिवस, असा एक महिन्याचा प्रवास होतो!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“खगोल शास्त्र सोपे करून सांगण्यासाठी रचलेली कहाणी वाटते.
“पुढे चंद्राने प्रभासला समुद्र किनारी शंकराचे भव्य मंदिर उभारले. सोन्याचे! हे मंदिर होते – चंद्राच्या नाथाचे! सोमनाथ! १२ ज्योतिर्लिंगातील पहिले मंदिर म्हणजे - सोमनाथ. पुढे त्रेतायुगात शिवभक्त रावणाने जीर्ण झालेले मंदिर पुन्हा बांधले. हे मंदिर चांदीत बांधले होते. त्याही नंतरच्या काळात, कृष्णाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला तेंव्हा त्याने चंदनाचे मंदिर बांधले, असे म्हणतात.
“मला राहवत नाही म्हणून सांगतो, शिवमंदिरा जवळच एक प्राचीन सूर्याचे मंदिर देखील होते.”, आबा म्हणाले.
“एकूण सोमनाथ मंदिर किती जुने आहे ते सांगता येत नाही. मानवी स्मृतीच्या आधीपासून सोमनाथला शिव मंदिर होते असे म्हणायला हरकत नाही. पुढे काय झाले आबा?”, सुमित म्हणाला.
“आता आपण एकदम ११ व्या शतकातील पहिली ३० वर्ष पाहू - ७ व्या शतकात अरेबिया मध्ये इस्लामचा उदय झाला. आणि पुढच्या ३०० वर्षात – अरेबिया, असायरीया, पर्शिया गिळंकृत करत गंधार मध्ये येऊन ठेपला. सन १००० मध्ये, राज्यावर बसलेल्या भावाला कैदेत टाकून, मुहम्मद गझनीचा राजा झाला.
“या दरम्यान, राजा पुरूला (Porus) आपला पूर्वज मानणारे हिंदूशाही राजे पेशावर येथून राज्य करत होते. हिंदुशाही राजा जयपाल गझनविंशी अनेकदा लढला. सन १००१ मध्ये मुहम्मद गझनीने जयपालचा दारूण पराभव केला. प्रजेचा पुत्रवत् सांभाळ करणारा, राष्ट्राची मातेसमान सेवा करणारा आणि हिंदूधर्माचा पित्यासमान आदर करणारा राजा जयपाल, या पराजयाने व्याकूळ झाला. प्रजा, राष्ट्र व धर्माचे रक्षण करण्यास असमर्थ ठरलो असे म्हणून राजा जयपालने अग्नी प्रवेश केला.
“जसे पुरूने सिकंदरला झेलमच्या पलीकडे येऊ दिले नाही, तसे जिवंत असे पर्यंत जयपालपुत्र आनंदपालने मुहम्मदला थोपवून धरले. त्याच्या नंतर त्रिलोचनपाल व भीमपाल देखील १०२६ पर्यंत मुहम्मदशी लढले. या दरम्यान उज्जैन, ग्वाल्हेर, अजमेर, पंजाब, दिल्लीचे राजे एकत्रितपणे मुहम्मदशी लढले. तरीही मुहम्मदने पंजाब व सिंध ताब्यात घेतले.”
“पाकिस्तानची सुद्धा कमाल आहे! ज्या अफगाणिस्तान मधल्या आक्रमकाने पाकिस्तान काबीज केले, त्याचे नाव missile ला दिले! खरा पाकिस्तानी पुरुचे नाव देईल, जयपालचे नाव देईल, आनंदपालचे नाव देईल!”, सुमित उद्गारला.
“जोपर्यंत ते त्यांचा हिंदू इतिहास स्वीकारत नाहीत तोपर्यंत असंच दिसणार! अरे, अफगाणिस्तानच्या घुरीने पाकिस्तानवर हल्ला केला होता, त्याच्या नावाचेही missiles आहेत. आणि ही पाकिस्तान मधली पाटी पहा, मुहम्मद घुरीच्या कबरीची! हे, हे पाकिस्तानचे ‘heritage’!”, आबा वैतागून म्हणाले.
“असो. प्रत्येक वर्षी भारतावर एक जिहादी हल्ला करण्याचा चंग बांधलेल्या मुहम्मदने, १०२७ मध्ये सोमनाथवर हल्ला केला. मंदिराच्या रक्षणार्थ उभ्या राहिलेल्या हजारो हिंदूंची कत्तल करून, मंदिर लुटले. त्याने सोमनाथचे शिवलिंग तोडून त्याचे तुकडे गझनीच्या जामा मशिदीच्या पायऱ्यांवर बसवले असे म्हणतात. १०३० मध्ये मुहम्मद मेल्यावर, सोमनाथच्या मंदिराचे चंदनाचे दरवाजे त्याच्या स्मारकाला लावले.
“पुढची ६०० वर्ष - अल्लाउद्दिन खिलजी, पोर्तुगीज, औरंगझेब इत्यादींनी हे मंदिर अनेकदा लुटले. एकूण १७ वेळा तोडले असे म्हणतात. या मंदिरासाठी हजारो हिंदूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मधल्या काळात गुजरातच्या परमार व सोळंकी राजांनी हे मंदिर पुनःपुन्हा बांधले. मात्र औरंगझेबने १६६५ मध्ये मंदिर तोडल्यावर पुन्हा कोणी बांधायला धजले नाहीत.
“१७८३ मध्ये इतिहासाला एक कलाटणी मिळाली. महाद्जी शिंदेंनी लाहोरच्या महंमद शहा कडून, जुन्या मंदिराचे तीन चांदीचे दरवाजे जिंकून आणले. ते दरवाजे आता उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात लावलेले आहेत. याच दरम्यान अहिल्याबाई होळकर, पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे व कोल्हापूरचे भोसले या सर्वांनी जुन्या मंदिराच्या अवशेषा जवळ नवीन शिवालय बांधले.
“आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर, सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रभासला समुद्राचे पाणी हातात घेऊन सोमनाथचे मंदिर पुन्हा बांधण्याची शपत घेतली! जुन्या मंदिराचे अवशेष उतरवून संग्रहालयात ठेवले. आणि एका भव्य शिवालायाची उभारणी केली! हे मंदिर स्वराज्याचे पहिले चिन्ह होते! स्वराज्याचा मंगल उत्सव!
“भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी जगातील मोठमोठ्या नद्यांचे पाणी आणले होते – गंगा, यमुना, सिंधू, नर्मदा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, ब्रह्मपुत्रा, टिग्रिस, युफ्रेटिस, नाईल, मिसीसिपी, अमेझोन, वोल्गा! २१ तोफांची सलामी देऊन शिवाची प्रतिष्ठापना करण्यात आली, आणि चंद्राने बांधलेले मंदिर पुनश्च उभे राहिले!“
References