घटनेच्या मूलभूत हक्कांमधून आपण राज्याने जीवितहक्क, स्वातंत्र्य, समता कशी जपावी हे बघितलं. पुढील काही प्रकरणात संसदीय लोकशाहीची आखणी आहे. मात्र राज्य केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास बांधील नसते. भारताने स्वीकारलेल्या घटनेने केवळ लोकशाही टिकावी एवढेच ध्येय समोर ठेवू नये, तर त्याचा उद्देश हा कल्याणकारी राज्य निर्माण व्हावे, हा असायला पाहिजे. कल्याणकारी राज्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य किंवा लोकसत्ताक आणि सामाजिक न्याय निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी राज्यासमोर काही अंतिम उद्दिष्टे किंवा आदर्श असावे, राज्यांनी ह्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी कार्यरत असावे, कायदे करताना अशा आदर्शांना ध्येय मानून कायदे करावेत आणि कल्याणकारी राज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात यावी, ह्याकरिता घटनेच्या भाग चार मध्ये ‘राज्य धोरणांची निर्देशक तत्त्वे’ नमूद करण्यात आली आहेत.
कलम ३७ मध्ये म्हटल्याप्रमाणे ह्या तरतुदी कोणत्याही न्यायालया करवी अंमलबजावणीयोग्य असणार नाहीत. मात्र त्यात घालून दिलेली तत्त्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे, हे राज्याचे कर्तव्य असेल. केशवानंद भारती वि. केरळ राज्य ह्या याचिकेतही ‘मार्गदर्शक तत्त्वाद्वारे कोणत्याही हक्काची बजावणी करता येत नाही, तसेच त्याचा भंग केल्यामुळे कायदा अवैध ठरत नाही’, असे म्हटले.
तरीदेखील आदर्श राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने राज्य आपले धोरण आखेल असे पुढील काही कलमात म्हटले गेले –
अशा अनेक बाबी घटनेच्या ह्या भागाने राज्यांना मार्गदर्शक म्हणून नमूद केल्या आहेत.
आपण बघतो, ह्यासंदर्भात शासन कायद्यान्वये आपली कर्तव्ये पार पाडत असते. कितीतरी कायद्यांचा ह्या तत्त्वांशी संबंध जोडला जाऊ शकतो आणि सर्वसामान्य लोकांना त्यातली भूमिका लक्षात येऊ शकते. अशी भूमिका लक्षात घेतली, तर नक्कीच त्याच्या अंमलबजावणीसाठी जास्त उपयोग होतो.
ह्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरूनच बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९, महाराष्ट्रात गो हत्या प्रतिबंधक कायदा २०१५, दारूबंदी कायदे, अंमली पदार्थ सेवनासंदर्भातले नियम, ठराविक औषधांवरची बंदी, न्याय केंद्रे, मोफत आरोग्य सुविधा, शिबिरे, अभयारण्ये घोषित करणे, अनुसूचित जाती जमातीन्करिता आरक्षणासारखे निर्णय घेणे, किंवा इतर सुविधा पुरविणे, कुटीर उद्योगांसाठी सवलती देणे, अशा अनेक कायद्यांद्वारे अथवा कृतींद्वारे राज्य आपली कर्तव्ये पार पाडत असते. समान नागरी कायदा हा घटनाकारांनीच राज्यांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये अंतर्भूत केल्यामुळे, तसेच समता ह्या मूलभूत हक्कामुळे देखील राज्य तो करण्यास बांधील आहे. भारताची संस्कृती, समस्या, गरजा ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच घटनाकारांनी घटना लिहिली आहे. त्याविषयक आदर ठेवणे आणि राष्ट्रीय विचार जोपासणे हे नागरिकांचे कर्तव्यच आहे.
-विभावरी बिडवे