#ओवी Live - ज्ञानार्जन

    05-Feb-2017   
Total Views |


नुकत्याच परीक्षा संपल्या होत्या. मधल्या सुट्टी नंतरचा तास होता. एक एक करत मुले वर्गात आली. निलेश नेहेमीप्रमाणे अगदी मागच्या बाकावर बसला. त्याला ना गणितात, ना विज्ञानात, ना भाषेत, ना खेळात, ना कुठल्या कलेत रस वाटत असे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास करण्याची इच्छा नसे.

इतक्यात, सरिता ताई वर्गात आल्या. सगळ्या मुलांनी एकच गलका केला – “आज तास नको, गोष्ट सांगा!” मुलांच्या मागणीला झुकून, ताई गोष्ट सांगू लागल्या -

“जुनी गोष्ट आहे! १८ व्या शतकातली! पेशव्यांच्या काळातली.

“सोळा वर्षांच्या रामने सातारा सोडले. पदरी पैसा नाही. काडीचेही शिक्षण नाही. डोक्यावर आई-वडिलांचे छत्र नाही. रामकडे जर काही होते, तर त्याची ज्ञानार्जनाची तीव्र इच्छा. शास्त्र शिकण्याच्या निश्चयाने राम वाराणसी मध्ये, बाळंभट पायगुडे यांच्या पाठशाळेत दाखल झाला.

“७-८ वर्षांच्या लहान मुलांबरोबर, मिसरूड फुटलेला राम शिक्षण घेऊ लागला. गुरूगृही राहून, लहान सहान कामे करून राम अतिशय तळमळीने शिकू लागला. रामची अभ्यासाची पद्धत अशी की - गव्हाची रास समोर ठेवायची. श्लोक एकदा म्हणून झाले, की त्या राशीतला गव्हाचा एक दाणा काढायचा. अशाप्रकारे रास संपेपर्यंत त्याचे पाठांतर होत असे.

“१२ वर्षांनी रामने – संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व मिळविले होते. वेद, उपनिषदे आणि पुराणांचा अभ्यास केला होता. भारतीय धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला होता. या शिवाय बायबल, कुराण आणि ब्रिटीश Law चा देखील अभ्यास केला होता.

“असे ज्ञानी, न्यायी आणि कर्तव्यकठोर रामशास्त्री प्रभुणे १७५१ मध्ये पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून रुजू झाले.

“ज्ञान मिळवून मनुष्य काय करू शकत नाही? एक गरीब मुलगा केवळ ज्ञानाच्या आधाराने भारताचा न्यायाधीश होऊ शकतो! आपल्या न्यायदानाने त्यांनी कित्येकांचे कल्याण करू शकतो!

“तसे आपण एखाद्या विषयाचा मन लावून अभ्यास करायची इच्छा बाळगावी! त्यासाठी प्रयत्न करावेत! त्याने केवळ आपलेच नाही तर आपल्या संपर्कात येणाऱ्यांचे देखील भले होते!”

सरिता ताईंची गोष्ट ऐकणाऱ्या निलेशचे डोळे चमकले आणि त्याच्या मनात एक जिद्द आकारु लागली...


ज्ञानेश्वर म्हणतात -  

शून्य जैसे का गृह | का चैतन्येवीण देह |

तैसे जीवित ते संमोह | ज्ञानहीन || ४.१९२ ||

 

ज्याच्याकडे ज्ञान नाही, आणि ज्ञान मिळविण्याची ओढही नाही, अशा माणसाचे जगणे एखाद्या पडक्या घरा प्रमाणे आहे. जिथे ना रात्री दिवा लागतो, ना पथिकाला आश्रय मिळतो, ना अतिथीला अन्नदान होते. ज्ञानाशिवाय जगणे मृतवत् असल्याप्रमाणे आहे.  

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121