आमची अवंती म्हणजे आमचे सख्खे शेजारी सराफ काका आणि अनुराधा काकू यांची मुलगी. अवंती मराठी माध्यमात यत्ता सहावीमधे शिकते. आम्हाला तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक अश्यासाठी की त्यांनी आग्रहाने तिला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि आई वडिलांवर पूर्ण विश्वास असल्याने अवंतीनेही त्यांचा निर्णय स्वीकारून त्याशाळेत एक हुशार विद्यार्थीनी अशी स्वताःची ओळख निर्माण केली. आणि या गोष्टीतल्या मेधाकाकू म्हणजे अवंतीच्याच शाळेत शिक्षिका असलेली माझी आई. अवंती आणि माझी आई अर्थात तिच्या मेधाकाकू यांच्यातील गेल्या दोन वर्षात झालेले संवाद मी माझ्या रोजनिशीत लिहून ठेवत असतो. त्या संवादाची काही पाने तुमच्या साठी.
(१) एप्रिल २०१५ उन्हाळी सुट्टीची सुरुवात ....
अवंती: मेधाकाकू, अग तू दिलेल पुस्तक काय छान आहे ... !!... त्यातली मराठी मुळाक्षर वेगळी आहेत गं. आणि या शब्दातला अ आणि ण ही दोन मुळाक्षरे थोडी वेगळीच आहेत.
मेधाकाकू: हो ना ..... कारण हे पुस्तक १८९९ सालात छापले आणि त्यावेळी ही मुळाक्षरे लिहिण्याची हीच पद्धत होती. आणि तुझ्या लक्षात आले का.... की हे पुस्तक रेव्हरंड अल्फ्रेड मन्वरिंग या बीटीश लेखकाने लिहिले.... !!
अवंती: मेधाकाकू ... ही म्हण बघ.... काय अर्थ आहे याचा...??..आणि अधोलि म्हणजे
काय गं ... !!!
लाकडाची अधोलि मोजिल खंडोखंडी फोडली तर एक भाकरही भाजणार नाही.
मेधाकाकू: अधोलि म्हणजे जड असे लाकडाचे दोन शेर धान्याचे माप जे खंडीने म्हणजे खूप धान्य मोजते. आणि दोन शेर म्हणजे अंदाजे आताचे साधारण एक किलो धान्य. बर का अवंती, अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात, धान्य मोजायची हीच पद्धत होती. या म्हणीचा भावार्थ असा की जर अधोलि हे वजनदार मापटे फोडले, तरी त्याचे लाकूड एक भाकरीसुद्धा भाजू शकणार नाही. थोडक्यात ते लाकडाचे असले तरी ते माप म्हणूनच वापरायचे. ते दुसर्या कुठल्याही कामासाठी उपयोगी नाही. आणि यातला खरा अर्थ (गुढार्थ) असा की आपल्या परिचयातील एखादी व्यक्ति मोठ्या महत्वाच्या पदावर असली तरी अशी वजनदार व्यक्ति आपल्या फार कामाची असतेच असे नाही. आता मी भाजी निवडायला बसत्ये .... तू काय काय वाचलेस ते आता सांग मला..... !!
--००—००—
(२) एप्रिल २०१५ उन्हाळी सुट्टीची सुरुवात.
अवंती: काकू प्रत्येक वर्षात बारा महीने असतात हे मला महित्ये.... पण या वकप्रचारात तर तेराव्या महिन्याचे वर्णन आहे ... हे कसे काय ..??
दुष्काळात तेरावा महिना.
मेधाकाकू: अगदी बरोबर आहे तुझे अवंती. आता एक लक्षात घे की अश्या म्हणी आणि वाकप्रचारात बर्याच वेळा काही सूचक-रूपकात्मक विधान केले असते. असे विधान, या वाकप्रचाराचा प्रत्यक्ष शब्दार्थ वाचून बर्याचवेळा लक्षात येत नाही. या वाक्प्रचाराचा आज घेतला जाणारा अर्थ आहे अडचणीत अडचाणींची भर.
अवंती: मेधाकाकू, दुष्काळ आणि तेरावा महिना हे रूपक कसे समजून घ्यायचे..?
मेधाकाकू: अवंती, अनेक शतकांपासून प्राचीन भारतीय कालगणनेनुसार चांद्र मासाचा संदर्भ घेऊन वेगळा अर्थ काढला गेला होता. चांद्र मास कालगणना म्हणजे निसर्गचक्राप्रमाणे प्रतिपदेपासून (अमावास्येनंतरचा पहिलं दिवस) सुरू होणारा आणि पोर्णिमेसह पुढील अमावस्येपर्यंतचा साधारण चार आठवड्यांचा कालावधी. हा कालावधी साधारण २८ दिवसांचा असतो. यामुळे चांद्र मास कालगणनेचा गणितानुसार दर तीन वर्षानी अधिक मास (तेरावा महिना) असतो.
अवंती आता यातील तेरावा महिना याचा भावार्थ आणि लोकमानसातील श्रद्धेचा भाग असा की दुष्काळी परिस्थितीत जर असा आषाढाचा अधिक मास (तेरावा महिना) आला तर पाऊस पडेल आणि उत्तम पीक येईल।. शेतकर्यांना असा विश्वास जणू या वाकप्रचारातून मिळत असावा. सर्व समाजच जणू होकारात्मक (Positive) विचार करतोय असे आपल्या लक्षात येते. दुर्दैवाने या सामाजिक - सार्वजनिक विचाराला आणि संस्कृतीला हल्ली, “ ही अंधश्रद्धा आहे ” असे लेबल लावणारी मंडळीही आपल्याला भेटतात.
तर अवंती, एक लक्षात घ्यायला हवे की आपल्या या परंपरेतुन चालत आलेल्या लोकसंस्कृतीमध्ये या वाकप्रचारांचे आणि म्हणींचे फार महत्वाचे स्थान आहे. यामुळेच अगदी वेचक आणि निवडक-अर्थपूर्ण आणि थोडक्या शब्दात, आपण काही शतकानपूर्वीच्या समाजाच्या व्यवहारांचा अभ्यास करू शकतो.
- अरूण फडके