
नव्वदीच्या दशकात आपला देश एका राष्ट्रव्यापी आंदोलनाने भारावून गेला होता. देशभरातले हिंदू शिलापूजनाच्या निमित्ताने रामजन्मभूमी आंदोलनात एकत्र येत होते आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी होत होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून बाबरी ढाचा पाडला गेला. थोडा मागे जाऊन विचार केला आणि आपल्या देशातल्या माध्यमांची भूमिका त्यावेळी काय होती याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर असे लक्षात येईल की, आपली माध्यमे हा संघर्ष ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ असा रंगविण्यात दंग होती. जे थोडे नावाजलेले होते त्यांनी देखील या आंदोलनाचे आकलन हिंदू उन्मादाचे प्रतीक म्हणून केले होते. काहींच्या मते यामुळे या देशातील धर्मनिरपेक्ष तत्त्वांना धक्का बसला होता, तर काहींना अडवाणी ‘हिंदू खोमेनी’ भासू लागले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत आणि विचार मांडण्याचा अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेमुळे तो अबाधित देखील आहे, मात्र ज्याचा दावा आपली माध्यमे अत्यंत उच्चरवाने करीत, त्या सामाजिक-राजकीय परिवर्तनाच्या प्रक्रियेची गंधवार्ताही आपल्या माध्यमांना आली नाही. रामजन्मभूमी आंदोलनामुळे या देशाचे संपूर्ण राजकारणच बदलून गेले. देशाला संपूर्ण वेगळ्या विचारसरणीचे दोन पंतप्रधान मिळाले, त्या आंदोलनाकडे माध्यमांचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत पक्षपाती आणि साचेबंद होता. खरं तर मिनाक्षीपुरमच्या धर्मातरणानंतरच या देशातील मुस्लीम आक्रमकतेबाबतच्या पर्यायी विचाराला सुरुवात झाली होती. शाहबानो प्रकरणाच्या निमित्ताने राजीव गांधींनी त्यात इंधन घालायला सुरुवात केली. भारतीय जनमानसात सुरू झालेली ही सुप्त प्रक्रिया माध्यमांना टिपता आली नाही. आपल्याच विचारांच्या पिंजर्यात माध्यमे जाऊन अडकली.
नुकत्याच झालेल्या अमेरिकन निवडणुकीमध्ये माध्यमांचा असाच फज्जा उडाला. बहुसंख्य माध्यमांनी हिलरींच्या बाजूने कौल दिला होता. एका साप्ताहिकाने तर ‘मॅडम प्रेसिडेंट’ नावाचा अंकही छापून तयार ठेवला होता. ऐनवेळी ट्रम्प निवडून आले आणि या प्रकाशनाला हा अंक मागे घ्यावा लागला. यात फक्त अमेरिकेतले पत्रकार होते, असे नाही. मराठीतले काही संपादकही अमेरिकेत जाऊन तळ ठोकून बसले होते. या मंडळींनीही आपले न मागितलेले मत हिलरींच्या पारड्यात टाकले होते. माध्यमे त्यांच्या बौद्धिक अहंकारात इतकी अडकली आहेत की, जनमानसाशी त्यांची नाळच तुटली आहे. जे जागा भरायला मदत करू शकत, त्यांच्यामागे आजची आपली माध्यमे धावत आहेत. काहींनी आपली वेगळी जागा दाखविण्यासाठी निरनिराळे पवित्रे घ्यायला सुरुवात केली आहे. माध्यमातील तटस्थतेपेक्षा माध्यमे चालविणार्यांची विशिष्ट विचारसरणीच ठळकपणे दिसू लागली आहे. त्यातून जी पुन्हा विचारसरणी आपल्याला मान्य नाही त्यांच्याबाबतचा पूर्वग्रह ठळकपणे दिसत असतो. गंमत म्हणजे, ही मंडळी मोठमोठ्याने विवेकाचा गजर करीत असतात. या सार्यांचे गंभीर परिणाम भारतीय समाजव्यवस्थेला भोगावे लागत आहेत. वैचारिक क्षेत्रातील घुसळण ही सामाजिक मूल्यांना जन्म देत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक, आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, रानडे यांच्यासारखे विचारवंत दैनिकांच्या, नियतकालिकांच्या माध्यमातून ही धुसळवणूक घडवून आणण्याचे काम करीत होते. समाज प्रवाही असतो आणि प्रत्येक पिढीला अशा मूल्य निर्मिती करणार्या व्यक्ती व संस्थांची गरज असते. लोकशाही पद्धतीत ही अपेक्षा माध्यमांकडूनच ठेवता येते. मात्र माध्यमांची स्थिती दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. वर्गणीदार होण्यासाठी वाचकांना दिली जाणारी वर्गणीतली सूट इतकी असते की, त्यापेक्षा रद्दीत जास्त पैसे मिळतात. पर्यायाने बहुआवृत्त्यांच्या, प्रचंड खपाच्या दैनिकांची उपयुक्तता बुद्धीपेक्षा रद्दीसाठीच जास्त झाली आहे.

विचारवंतांच्या बाबतीत स्वातंत्र्योत्तर काळात खरोखरच आपल्याकडे मोठी पोकळी निर्माण झाली. स्वातंत्र्यापूर्वी विवेकानंद, योगी अरविंद यासारखी काहीतरी नावे होती. मात्र आता ती स्थिती खरोखरच गंभीर आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठे येथे अध्यापनाचे काम करणार्या मंडळींकडून समाजाची ही अपेक्षा नक्कीच आहे, मात्र आपल्या विद्यापीठांचा एकंदरीत दर्जाच इतका घसरतो आहे की, तिथूनही विचारवंतांची अपेक्षा ठेवणे थोडे मुश्कीलच आहे. समाज वास्तवाचे कुठलेही चटके आपल्याला बसणार नाहीत, याची पुरेपूर काळजी या श्रेणीतले लोक घेत असतात. जे लोक ‘विचारवंत’ म्हणून टीव्ही चॅनलच्या चर्चासत्रामध्ये माध्यमांकडूनच पुढे आणले जातात, त्यांना थोडेसे कसोटीच्या ऐरणीवर आणले तर त्यांचे कचकड्याप्रमाणे तुकडे पडतात. ‘‘स्वतंत्र बुद्धीने विचार करणार्या, प्रामाणिक, निःस्वार्थी विचारवंतांच्या वर्गावर आपल्या देशाचे प्रारब्ध अवलंबून आहे,’’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. विचारवंतांच्या तपासकार्याची सुरुवात बाबासाहेबांचे हे वाक्य प्रमाण मानून करायला लागलो. आजच्या संदर्भात काहीतरी चांगली नावे समोर येतात का? विद्यापिठीय प्रबंध आजही भरपूर तयार होतात, मात्र त्यातून सत्व सापडेलच असा दावा करता येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे समाजाशी, समाजातल्या अत:प्रवाहांशी विद्यापिठीय विचारवंतांचे काही देणेघेणेच नाही.
ज्ञान, विज्ञान, विवेक यांना एका सूत्रात बांधता आले तर मानवी जीवनात सुखसमृद्धी आणता येईल, यासाठी बेर्ट्रांड रसेल विचारांची मांडणी करीत राहिला. अशा आशयाचे मांडताना आज कुणीही दिसत नाही. जे काही थोडके विचारवंत आहेत त्यांच्या ठायी नावडत्यांचे द्वेषच पाहायला आणि वाचायला मिळतात. एखाद्या राष्ट्राची मूल्ये ही त्याच्या विचारवंतांनी, लेखकांनी, तत्त्वचिंतकांनी, संशोधकांनी, इतिहासाचा अभ्यास करणार्यांनी निर्माण करावी लागतात. वैचारिक निष्ठा व त्या लोकांना पटल्या नाही तरी मांडण्याचे धाडस या व अशा गुणांचा समावेश असल्याशिवाय विचारवंताला विश्वासार्हता येणे अवघड आहे. आपल्याकडे यातले थोडेफार काम झाले की, मंडळी सरकारी पुरस्कार, विद्यापीठातल्या जागा, राष्ट्रपतींच्या कोट्यातल्या राज्यसभेतली खासदारकी अशा गोष्टींवर डोळा ठेवायला सुरुवात करतात. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना तर आज वैचारिक मजकुराची, विचारवंतांची संदर्भासाठी का होईना दखल घेणेही आवश्यक वाटत नाही.
_H@@IGHT_140_W@@IDTH_750.jpg)
जसजसे तंत्रज्ञान मानवी जीवनाला व्यापते आहे तसतशी एक नवी मूल्यव्यवस्था आकाराला येत आहे. मुक्त माध्यमांवर टाकला गेलेला टोकदार मजकूर आज सत्य मानून परस्परांना पाठविला जातो. असे कपोलकल्पित मजकूरच आज अधिक लोकप्रिय होताना दिसतात. मनोरंजन करणार्या वाहिन्यांच्या माध्यमातून एखाद-दुसरा सामाजिक कार्यक्रम करणारा नट आपल्याला सामाजिक कार्यकर्ता वाटू लागतो. तो तत्वज्ञही भासायला लागतो आणि मग त्याने काही अपेक्षाभंग केला की मुक्त माध्यमांवर लोक त्याच्यावर तुटून पडलेले पाहायला मिळतात. नथुराम गोडसेंचे नाटक चालविणार्या अशाच एका नटाच्या बाबतीत सध्या हेच चालू आहे. तो नट आहे, अगदी नथुराम गोडसेही नाही याचे भानच राहिलेले दिसत नाही. वैचारिक क्षेत्रातला विचारवंतांचा तुटवडा लोकांना सांस्कृतिक किंवा कलेच्या क्षेत्रातील मंडळींकडे मूल्य व्यवस्थेच्या अपेक्षेने ढकलू लागला आहे. कलेच्या माध्यमातून मूल्य निर्मितीची प्रक्रिया होतेच. ती होत नाही असे नाही, परंतु ‘मूल्य निर्मितीसाठी कला’ असा ठामवसा घेऊन कामकरणारे कलाकार आपल्याकडे तरी दिसत नाहीत.
विचारवंतांनी केलेल्या बौद्धिक कष्टातूनच मूल्ये निर्माण होऊ शकतात. हे कष्टच सामाजिक परिवर्तनाचे व सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग होत असतात. समाजात नीरक्षीरविवेक निर्माणासाठी लागणारे बौद्धिक धारिष्ट्य हेेच मुळात एक मूल्य आहे. बुद्धिप्रामाण्याने समाजात घडणार्या आरोह अवरोहांची चिकित्सा करीत राहणे हे विचारवंताचे काम आहे. समाजातले विविध प्रवाह लक्षात घेऊन समाजाशी संवादी असणारी प्रक्रिया यासाठी निर्माण करावी लागेल. लोकशाही हे देखील एक मूल्यच आहे. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास जर टिकवून ठेवायचा असेल तर अशा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करता आल्या पाहिजे. इतिहासाचे संदर्भ घेऊन वर्तमानाचे भान ठेवणार्या व भविष्य घडवू शकण्याची ताकद असलेल्या विचारांची निर्मिती करणार्यांची या देशाला आज गरज आहे.
-किरण शेलार