केरळ आणि कम्युनिस्ट क्रौर्य

    28-Feb-2017
Total Views | 3


'आमच्या राजकीय शत्रूंना कसं बिनबोभाट संपवायचं ते आम्ही आमच्या बंगाली कम्युनिस्ट बंधूंकडून शिकलं पाहिजे. रक्ताचा एक थेंबही न सांडता बंगाली कम्युनिस्ट त्यांच्या विरोधकांना संपवतात. त्यांच्या विरोधकांना पळवून नेऊन ते एका खोल खड्ड्यात जिवंत पुरतात आणि वरून गोणीभर मीठ टाकतात. कसलाही पुरावा मागे राहत नाही, न रक्त, न बातमी, न फोटो!' 
 
हे निर्लज्ज उद्गार आहेत केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरयी विजयन ह्या माणसाचे. विजयन ह्यांच्याच पक्षातले त्यांचे सहकारी ए. पी. अब्दुलकुट्टी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे विजयन ह्यांनी २००८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कन्नूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका मिटिंग मध्ये हे उद्गार काढले होते. ए. पी. अब्दुलकुट्टी ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे केरळचे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. करुणाकरन ह्यांच्या उपस्थितीत पिनरयी विजयन ह्यांनी हे उद्गार काढले होते आणि उपस्थित सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून ह्या उद्गारांना दाद दिली होती. 
 
ज्या पिनरई गावाचे नाव केरळचे विद्यमान मुख्यमंत्री अभिमानाने मिरवतात, तो कन्नूर जिल्ह्यातला पिनरयी नावाचा गांव म्हणजे तर केरळमधल्या साम्यवादी हिंसाचाराचे उगमस्थळ. गेल्याच आठवड्यात २५ वर्षांच्या रेमीथ ह्या संघाच्या कार्यकर्त्याचा साम्यवादी गुंडांनी पिनरयी गावातल्या त्याच्या राहत्या घरात घुसून निर्घृण खून केला. रेमीथला २०१६ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळापासूनच धमक्या येत होत्या. मुंबई तरुणभारतशी फोनवरून बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख श्री जे नंदकुमार ह्यांनी सांगितलं की केवळ रेमिथलाच नाही तर त्याच्या वृद्ध आईलाही धमकावण्यात आलं होतं की 'आम्ही तुझ्या नवऱ्याला मारलं आता तुझ्या मुलाचाही खून करू. त्यांच्या घरासमोर प्रेतावर वाहायची पुष्पचक्रेही बरेचदा ठेवली गेली होती.' 
 
२००२ मध्ये रेमीथचे वडील, थलासेरी उत्तमन ह्यांचाही कम्युनिस्ट गुंडांनी निर्घृण खून केला होता. ते बस ड्रायव्हर होते. कामावर असताना त्यांना बसमधून खेचून काढून बसमधल्या प्रवाश्यांच्या डोळ्यासमोर उत्तमन ह्यांना कापून काढलं गेलं होतं. रेमीथ आणि त्याचे वडील उत्तमन ह्या पिता-पुत्रांचा गुन्हा एकच होता, पिनरयी ह्या साम्यवाद्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांनी राष्ट्रीय विचार रुजवायचा प्रयत्न केला. रेमीथचा खून त्याच्या वृद्ध आईच्या डोळ्यादेखत झाला. त्याची आठ महिन्यांची गरोदर बहीणही त्या ठिकाणी होती. रेमीथच्या बहिणीचा नवरा भारतीय सैन्यात आहे. सध्या तो वीर देशाच्या सीमेवर शत्रूशी लढतोय आणि केरळमध्ये त्याचे कुटुंबीय लाल शत्रूंशी.   
 
रेमीथ
 
जेव्हा कन्नूर जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वयंसेवक आणि भाजपचे लोकसभा निवडणुकीतले उमेदवार सदानंदन मास्टर ह्यांना रेमीथच्या खुनाची बातमी कळली तेव्हा ते उद्वेगाने उद्गारले होते की 'आधी नवऱ्याला मारलं, आता डोळ्यांदेखत एकुलत्या एका मुलाला संपवलं. ह्या लाल माथेफिरुनी रेमीथच्या आईलाही मारून टाकलं असतं तर उपकारच झाले असते त्या म्हाताऱ्या आईवर'. खुद्द सदानंदन मास्टर स्वतःदेखील डाव्यांच्या हिंसाचाराचे शिकार आहेत. डाव्या गुंडांनी एकत्रित हल्ला करून, सदानंदन मास्टरना एकटं गाठून त्यांचे पाय गुढघ्यापासून खाली करवतीने कापून टाकले होते. आज सदानंदन मास्टर कृत्रिम पाय लावून वावरतात. केरळमधल्या डाव्यांच्या निर्मम हिंसाचाराचे सदानंदन मास्टर हे एक जितेजागते प्रतीक आहेत. 
 
सदानंद मास्टर
 
आज पिनरयी गांव धुमसतंय. २००० पोलिसांची तुकडी गावात तैनात आहे. त्यांचं काम गावात शांतता प्रस्थापित करणं नाही तर पिनरयी विजयन ह्यांच्या पिनरयी गावातल्या विशाल राजप्रासादाचं संरक्षण करणं हे आहे. 'कष्टकऱ्यांची हुकूमशाही' ह्या गोंडस राजकीय तत्वज्ञानाआड लपलेली डाव्यांची अनावर सत्तालालसा ह्या सगळ्या  लाल दहशतवादाविरुद्ध आहे.     
 
'गॉडज ओन कंट्री', म्हणजे 'देवाची स्वतःची भूमी' असे गोंडस घोषवाक्य असलेल्या केरळला राक्षसी राजकीय हिंसा काही नवीन नाही. कम्युनिस्ट आणि राष्ट्रीय विचार ह्या दोन भिन्न राजकीय विचारप्रणालींमधला हा संघर्ष केरळमध्ये सतत उग्र स्वरूपातच प्रकट झालेला आहे. संपूर्ण जगामधल्या कम्युनिस्ट राजवटींचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की येनकेनप्रकारेण सत्ता मिळवण्यासाठी कम्युनिस्टांनी नेहमीच हिंसा ह्या शस्त्राचा वापर केलेला आहे. रशियामध्ये स्टॅलिनने घडवून आणलेल्या त्याच्या राजकीय विरोधकांच्या कत्तली, 'लाल क्रांतीच्या' नावाखाली माओने चीनमध्ये केलेला हिंसाचार, कंबोडिया मध्ये पॉलपॉट ह्या हुकूमशहाने केलेला नृशंस हिंसाचार ही सगळी उदाहरणे कम्युनिस्टांच्या रक्तपिपासूपणाची साक्ष देतात. मग भारतीय कम्युनिस्ट तरी वेगळे काय करणार?  
 
त्यात जगभरात धर्माशी फटकून वागण्याचे तत्वज्ञान असलेल्या साम्यवाद्यांनी केरळमध्ये मात्र राजकीय सत्तेसाठी नेहमीच ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांधांशी अभद्र युती केलेली आहे. त्या अभद्र युतीचा फटका केरळमधल्या राष्ट्रीय विचारांच्या जनतेला कायम बसलेला आहे, त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक ह्या हिंसाचाराचे नेहमीच बळी ठरत आलेले आहेत. साम्यवादी आणि स्वयंसेवक ह्यांच्यामधल्या संघर्षाचा पहिला बळी पडला तो १९६५ मध्ये, थनूर मध्ये. जनसंघाचा फक्त १६ वर्षांचा कोवळा कार्यकर्ता सुब्रमण्यम हा मुस्लिम लीगने केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या पोलीस गोळीबारात मारला गेला, पण साम्यवाद्यांनी पाठिंबा दिला तो मुस्लिम लीगच्या धर्मांध राजकारणाला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बिनीच्या कार्यकर्त्यांना शोधून शोधून निर्घृणपणे मारून टाकण्याचा कार्यक्रमच केरळमधल्या साम्यवाद्यांनी हाती घेतला. विशेषतः कन्नूर जिल्ह्यामध्ये साम्यवाद्यांच्या हिंसाचाराचं प्रमाण इतकं होतं की खुद्द कम्युनिस्ट पक्षातल्या लोकांनीच त्याला 'कन्नूर पॅटर्न' असं नाव दिलं. कन्नूर जिल्ह्यामध्ये वडीक्कल रामकृष्णन ह्या संघाच्या दलित कार्यकर्त्याचा १९६९ मध्ये निर्घृणपणे खून करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत जवळ जवळ ३०० संघ स्वयंसेवकांचा केरळमध्ये साम्यवादी गुंडांनी खून केलेला आहे, तर हजारो लोक ह्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेले आहे. लाल दहशतवाद केरळमध्ये नुसता वाढतच नाहीये तर कम्युनिस्टांच्या राजवटीखाली ते एक वेगळं बिनमंत्र्याचं सरकारी खातंच आहे. 
 
केरळचे साम्यवादी संपूर्ण कन्नूर जिल्हा हा स्वतःच्या राजकीय विचारसरणीचे राखीव कुरण असेच समजतात त्यामुळे कन्नूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाढती लोकप्रियता साम्यवाद्यांना कधीच सहन झालेली नाही. ह्याचाच परिणाम म्हणून 'कन्नूर पॅटर्न' इथे विरोधी विचारांचे खच्चीकरण करण्यासाठी वापरला जातो. विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री परमेश्वरन यांनी आपल्या एका लेखात म्हटलंय की '१९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात डावे आणि संघ हे दोन्ही आणीबाणीच्या विरोधात असल्यामुळे संघाच्या विरोधातला हा हिंसाचार काही काळ कमी झाला होता पण आणिबाणीनंतर जेव्हा साम्यवाद्यांना समजलं की संघकार्य केरळमध्ये अजूनच जोमाने वाढतंय तेव्हा परत एकवार संघविरोधातला हा हिंसाचार उफाळून उठला, आणि १९८० च्या दशकानंतर केरळमध्ये एका नव्या दहशतपर्वाची सुरवात झाली.' 
 
ह्या लाल हिंसाचाराच्या तडाख्यातून स्त्रिया आणि मुलेही सुटली नाहीत. एका संघ कार्यकर्त्याच्या फक्त सात वर्षांच्या कार्तिक ह्या मुलाचा हातच कम्युनिस्ट गुंडांनी  २०१६च्या निवडणुकीनंतरच्या उन्मादात छाटून टाकला. आलापुझा गावातले एक माजी सैनिक धर्मराजन आणि त्यांची पत्नी यशोदा ह्या दोघांनाही लाल गुंडांनी १९८२ मध्ये सायकलच्या चेनने मारहाण केली आणि नंतर भोसकून मारून टाकलं. त्यांची मुलगी गिरीजा हीदेखील ह्या हल्ल्यात जखमी झाली होती पण थोडक्यात बचावली. १९८८ मध्ये तर एकाच दिवशी पाच संघ कार्यकर्त्यांची कम्यूनिस्टानी मुरिकूमपूझा गावात निर्घृण कत्तल केली. ही 'ओणमची कत्तल' आजही केरळचे लोक विसरलेले नाहीत. 
 
के. टी. जयकृष्णन मास्टर नावाचे शिक्षक संघाचे स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. ते कन्नूर जिल्ह्यातल्या एका शाळेत शिकवायचे. त्यांना सतत धमक्या यायच्या म्हणून त्यांना तेव्हाच्या केरळ सरकारने पोलीस संरक्षण देखील दिलं होतं. १९९९ साली त्यांच्या शाळेत ते सहावीच्या वर्गाला शिकवत असताना सात कम्युनिस्ट गुंडांनी भरवर्गात शिरून त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर के. टी. जयकृष्णन मास्टर ह्यांना तलवारी-बर्च्यानी भोसकून जीवे मारलं. पोस्ट मॉर्टेम मध्ये त्यांच्या शरीरावर चक्क ४८ घाव मिळाले. के. टी. जयकृष्णन मास्टर यांचे मारेकरी असलेले कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते इतके निर्लज्ज होते की  के. टी. जयकृष्णन मास्टर ह्यांचा खून केल्यावर त्यांनी वर्गातल्या फळ्यावर धमकी लिहून ठेवली की ही घटना पाहणाऱ्या कुणी विद्यार्थी आणि शिक्षकाने पोलिसांकडे तक्रार केली तर त्यांचंही असंच शिरकाण करण्यात येईल. त्यानंतर के. टी. जयकृष्णन मास्टर यांच्या रक्ताने रंगलेली हत्यारे नाचवत ह्या लाल दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या गावातून विजय मिरवणूक काढली, आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.   
 
केरळमधले कम्युनिस्ट आणि तालिबानी विचारसरणीचे लोक ह्या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. किंबहुना ह्या दोन्ही विचारसरणींचे केरळमध्ये साटेलोटेच आहे. राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख जे. नंदकुमार ह्या अभद्र युतीला  'मार्क्सिस्ट-जिहादी नेक्सस' असे नाव देतात. २०१० मध्ये एर्नाकुलम जिल्ह्य़ातील मुवत्तापुझा येथे प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्या हाताचा पंजा मुसलमान धर्माधांनी छाटून टाकला. थोडुपुझा येथील न्यूमन कॉलेजमध्ये जोसेफ हे प्राध्यापक होते. एका प्रश्नपत्रिकेत प्रेषितांविषयी कथित वादग्रस्त प्रश्न विचारल्याबद्दल त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता.
 
केरळमधली राजकीय हिंसा सामान्य नागरिकाला हादरवणारी आहे. फायनान्शियल एक्सप्रेस ह्या वृत्तपत्रात छापून आलेल्या आकडेवारीप्रमाणे देशात घडणाऱ्या राजकीय हिंसेच्या घटनांमधल्या अर्ध्याहून जास्त घटना ह्या एका केरळमध्ये घडलेल्या आहेत. गेली जवळजवळ सहा दशके केरळमध्ये लाल दहशतवादाचे सत्र सुरूच आहे. तरीही संघाचा आणि राष्ट्रीय विचारांचा प्रभाव केरळमध्ये सतत वाढताना दिसतोय. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळमध्ये भारतीय जनता पक्षाला जवळ जवळ दहा टक्के मते मिळाली. शशी थरूर ह्या दिग्गज काँग्रेस नेत्याशी टक्कर देऊन देखील भाजपचे उमेदवार आणि संघाचे केरळमधले ज्येष्ठ कार्यकर्ते ओ. राजगोपाल फक्त पंधरा हजार मतांनी निवडणूक हरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमध्ये जवळजवळ ४५०० हजार शाखा भरतात. हा आकडा संपूर्ण भारतात सगळ्यात जास्त आहे. केरळमधले संघ स्वयंसेवक कोण आहेत, तर कम्युनिस्टांच्या दंडेलीला, ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रचाराला आणि इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या कारवाईला कंटाळलेली सर्वसामान्य केरळीय जनता. लाल दहशतवादाला निर्भीडपणे तोंड देत केरळमध्ये संघ वाढतोय.
 
केरळ मधलं राजकारण आणि समाजकारण हळूहळू, पण निश्चितपणे बदलतंय ह्यात शंकाच नाही. त्यामुळेच कम्युनिस्टांच्या पायाखालची भुई सरकलेली आहे. सध्या भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे केरळमध्ये वाढलेले निर्घृण हल्ले म्हणजे कम्युनिस्ट काळसर्पाचे शेवटचे चवताळलेले आचके आहेत! 
 
-शेफाली वैद्य
अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121