अवंती: मेधाकाकू ... मी हळूहळू तुझ्या पुस्तकातली पुढची पाने सुद्धा चाळते आहे आणि प्रत्येक पानात जंगली प्राण्यांच्या गमतीच्या म्हणीसुद्धा वाचते आहे. आज मी तुझ्यासारखा विचार करून या दोन म्हणींचा अर्थ लावायचा प्रयत्न करते आहे पण काही सुचत नाहीये गं मला... याचा अर्थ काय असावा ते.... !
मेधाकाकू: अरे वा ... बघ अवंती अगदी सहजपणे तू सुद्धा प्रयत्न करते आहेस की.... अग हाच संदेश आजच्या एका म्हणीत दिला आहे. प्रयत्न केल्यावरच यश मिळते हे लक्षात ठेव .... चल बघूया आपण... !!
बहुत देखिले टिळेटाळे पण चिखलास नाही पाहिले डोळे.
मेधाकाकू: अवंती आता नीट बघ ... या म्हणीत लपली आहे कोल्हा आणि सुसरीची एक गोष्ट. हे दोघेही एकमेकांना मित्र मानत असतात आणि एकमेकांना जेवायला सुद्धा बोलावतात. मात्र दोघेही प्राणी लबाड आणि कावेबाज असल्याने प्रत्येकाला दुसर्याचा कावा माहीत असतो. कोल्हा पाण्यात आला की त्याला खायचा विचार सुसर करीत असते ... तर दुसरीकडे सुसरीचा फडशा कसा पाडता येईल असा विचार कोल्हा करत असतो.
कोल्हयाने निमंत्रण देऊनही सुसर जेवायला जमिनीवर यायला तयार नसते आणि सुसरीने पाण्याखाली जेवायला बोलावल्यावर कोल्हाही टाळाटाळ करीत असतो. कांगावखोर सुसर कोल्ह्याला विचारते.. “ का रे कोल्हेभाऊ, जेवायला यायला नाही का म्हणतोयस ..!!” मग लबाड पण सावध कोल्हा पाण्यात असलेल्या सुसरीला सांगतो..... “ अगं मी अनेक माणसांच्या कपाळावर गंधाचे टिळे पाहिलेत पण चिखलात चमकणारे तुझ्यासारखे डोळे नाही पाहिले कधीच - मला तर काही ठीक लक्षण दिसत नाहीये तुझ्या डोळ्यात ”....!! थोडक्यांत याचा अतिशयोक्तियुक्त मथितार्थ इतकाच की ... काहीतरी आकर्षक दिसते म्हणून हुरळून जाऊ नये, त्यातला धोका ओळखून नेहमी सावध असावे.
अवंती: अरेच्या .... मेधाकाकू… गोष्टीत वाचल्याप्रमाणे या म्हणीतले कोल्हा-सुसर सुद्धा लबाड दिसतायत की. पण ही पुढची म्हणसुद्धा बघ किती वेगळी आहे... काही उलगडाच होत नाहीये बघ मला...!!
--------------------
समुद्राला झुरळाची गरज लागती.
मेधाकाकू: अवंती या म्हणीतला अर्थ तुला थोडासा एखाद्या लोककथे प्रमाणे वाटेल. अशा लोकश्रुति परंपरेने समाजात प्रचलित असतात आणि जणूकाही प्रत्येक आजीने आपल्या नातवंडांना सांगितलेल्या गोष्टींतून पिढ्यानपिढ्या या म्हणी आणि वाकप्रचार समाजात रूढ असतात.
लोककथांमध्ये ही म्हण टिटवी या पक्ष्याच्या किंवा झुरळ या किटकाच्या संदर्भाने वापरली जाते. आपण टिटवी पक्षिणीच्या संदर्भातली म्हण वाचूया. टिटवी पक्षिण तिची अंडी नेहमी जमिनीवर घालते. एके दिवशी समुद्राच्या भरतीमुळे तिची अंडी नष्ट होतात. चिडलेली टिटवी समुद्राकडे अंडी परत मागते परंतु समुद्र मात्र तिच्याकडे लक्षच देत नाही. वारंवार मागणी करूनही समुद्र लक्ष देत नाही असे पाहून टिटवी समुद्राला सांगते, निमूटपणे माझी अंडी परत दे नाहीतर आम्ही सगळे पक्षी तुझे पाणी पिऊन टाकू. नारदमुनी सुद्धा समुद्राला समजावायचा प्रयत्न करतात पण समुद्र त्यांनाही दाद देत नाही. मग मात्र नारदमुनी गरुडाला आवाहन करतात आणि मग सगळे पक्षी समुद्राचे पाणी पिऊ लागतात. पाणी कमी झाल्यामुळे समुद्रातले मासे तडफडू लागतात. तेंव्हा मात्र समुद्राला टिटवीची चिंता समजते पण तोपर्यन्त उशीर झालेला असतो कारण, मासे श्री विष्णुदेवाकडे मदत मागायला गेलेले असतात. हे समजल्यावर श्री विष्णुदेव समुद्राला टिटवीची अंडी परत करायला लावतात.
मेधाकाकू: अवंती....यातला मथितार्थ असा की आपल्यापेक्षा आकाराने-शिक्षणाने-वयाने किंवा आर्थिक परिस्थितीने कोणी मोठे असले तरी अन्याय झाल्यावर त्याच्याशी दोन हात करायला घाबरू नये. यासाठी लागणार्या आत्मविश्वास, अथक प्रयत्न आणि संघशक्तीचे महत्व सांगणारे हे रूपक.
- अरुण फडके