“आबा, आतापर्यंत आपली इजिप्त, युरोप, अरेबिया, तुर्कस्तान, आणि पर्शियाची सूर्य मंदिरे पाहून झाली. आता आपला आजचा दौरा कुठे?”, सुमितने विचारले.
“सुमित, आज आपण याच प्रांतातील चंद्र मंदिरे पाहू. प्राचीन काळापासून मानवाने जशी सूर्याची उपासना केली, तशी चंद्राची सुद्धा उपासना केली. या नकाशाच्या आधारे आपण चंद्र मंदिरांचा प्रवास करू.
“२००० BCE च्या आधी, सुमेरचे ‘गील्गामेश’ हे महाकाव्य लिहिले गेले. या काव्याचा नायक, सुमेरचा प्राचीन राजा गील्गामेश, ययातीची आठवण करून देतो. गील्गामेश अमर होण्याची दुर्दम्य इच्छा बाळगतो आणि त्यासाठी एक मोठा प्रवास करतो. त्या प्रवासातील त्याचे अनुभव आणि शेवटी वार्धक्य व मृत्यू अटळ आहेत याचा स्वीकार करून गोष्ट संपते. या प्रवासात सुमेरच्या प्रथेप्रमाणे गील्गामेश सूर्याची व चंद्राची पूजा करतो.
“गील्गामेशच्या नंतरच्या काळात, १६०० – ११०० BCE दरम्यान, सुमेर वर कासाईट / कास्सी / काशी राजे राज्य करत होते. हे राजे शुरीयश म्हणजे सूर्य, मरुत्तश म्हणजे मरुत्त व इंदश म्हणजे इंद्राची उपासना करत. एका काशी राजाचे हे शिल्प पहा – त्या मध्ये शमश हा सूर्य देव, सिन् हा चंद्र देव आणि इष्टार ही शुक्राच्या चांदणीची देवता कोरली आहे.
“दक्षिण तुर्कस्तानातील हरन येथे सिन् म्हणजे चंद्राचे एक प्राचीन मंदिर होते. या शिवाय त्या भोवती – सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनी अशी एकूण सात मंदिरे होती. ७०० BCE दरम्यान असुरबनीपाल या असुर राजाने, हे मंदिर पुन्हा बांधले होते. आता त्या मंदिरांच्या ठिकाणी केवळ दगड मातीचे ढिगारे पहावयास मिळतात. हरनच्या दक्षिणेला, बेबिलोनिया व असयरीया मध्ये अशी अनेक चंद्र मंदिरे होती, जी आता नष्ट झाली आहेत.
“इथून आपण आता जाणार आहोत – नबातिया व अरेबिया मध्ये, ३०० BCE च्या आसपासचा काळ. नबातीयन लोक अनेक देवतांची पूजा करत. त्यातील महत्वाचे देव होते - दुशरा हा सूर्यदेव आणि हुबल हा चंद्रदेव. या शिवाय तीन महादेवी होत्या – अल्-लात, अल्-उझ्झा व मन्नत. आपल्या सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या तीन देवींप्रमाणे या अतिशय पूज्य देवता होत्या. अशा त्रीदेवी ग्रीक धर्मात पण होत्या - हेरा, डीमेटर व ऑफ्रोडाइट किंवा रोमन धर्मातील जुनो, मिनर्व्हा व व्हीनस!
“या देवींची मानवी मूर्ती करत नसत. तर वेगवेगळ्या आकाराचे – चौकोनी किंवा लांबट काळे दगड पुजत असत.
“अरेबियातील मक्का येथे एक चंद्राचे मंदिर होते, हुबलचे. या मंदिरात चंद्राची रत्नांची मानवी मूर्ती होती. कधीतरी या मूर्तीचा उजवा हात तुटल्यावर, त्या मूर्तीला सोन्याचा हात बसवला होता. हुबल समोर ७ बाण ठेवलेले असत. प्रत्येक बाणावर एक एक शब्द लिहिला होता. कोणी प्रश्न घेऊन आले की हुबलची प्रार्थना करून ते बाण फेकत असत. बाणांच्या दिशेवरून व त्या वरील शब्दावरून हुबलचे उत्तर मिळवत असत. देवाला कौल लावल्यासारखे.
“हुबल शिवाय या मंदिरात इतर ३६० देवतांच्या मूर्ती होत्या.”, आबा म्हणाले.
“वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक, म्हणून ३६० का?”, सुमितने विचारले.
“असू शकतात, शक्य आहे! ७ व्या शतकाच्या सुरवातीला प्रेषित मोहमदने इस्लाम धर्माची स्थापना केली. त्यावेळी अरेबिया मध्ये मूर्तीपूजेवर बंदी आली आणि हुबल, तेथील ३६० देवतांची मूर्ती, व जवळच्या गावांमधील अल्-लात, अल्-उझ्झा व मन्नत यांच्या मूर्ती तोडल्या.
“चंद्राची मूर्ती तोडली, चंद्राची उपासना थांबवली तरी, जनमानसातून चंद्राचे प्रेम पुसणे अशक्य होते. आजही ईदला चांद लागतो आणि मशीदीवर चंद्रकोर!”, आबा म्हणाले.
“Interesting! शिवाय त्यांचे कॅलेंडर पण चांद्र कॅलेंडर आहे, म्हणजे एकही दिवस चंद्राच्या आठवणी शिवाय जात नाही! आबा, आपण बाहेरची चंद्र मंदिरे पहिली ... पण भारतातील चंद्र मंदिर पहिले नाही? पुढच्या वेळी आपण भारतातील चंद्र मंदिर पाहूया?”, सुमितने विचारले.
“सुमित, आपण चंद्राचे मंदिर नाही, पण चंद्राने बांधलेले मंदिर पुढच्या भेटीत पाहू! आपण मंदिरांच्या यात्रेची सुरवात महाकालेश्वराच्या मंदिरापासून केली होती. या यात्रेचा शेवट पण शिव मंदिराने करू!”, आबा म्हणाले.
*BCE - Before Current Era, CE – Current Era
-दिपाली पाटवदकर