थंडी, उन्हाळा, पावसाळा प्रत्येक ऋतूत विविध त्वचाविकार किंवा त्वचेच्या तक्रारी आढळून येतात. पण स्कीन ऍलर्जी हा त्रास असा आहे की, तो कोणत्याही ऋतूत कालावधी आढळतो. त्याबद्दल आज थोडे जाणून घेऊया.
ऍलर्जी म्हणजे काय? जे शरीराला सूट होत नाही ते व ज्यामुळे शरीराच्या आत किंवा बाहेर म्हणजेच त्वचेवर विभिन्न लक्षणे उत्पन्न होतात, उमटतात त्यांना सर्वसाधारणपणे ‘ऍलर्जी’ म्हणावी. डास चावून गांधी येते, त्वचा (स्थानिक) लाल होते, ही सुद्धा सौम्य स्वरूपाची ऍलर्जीच आहे. काहींमध्ये मात्र डास वा अन्य कीटक चावल्यावर मोठाली गांधी येतात आणि त्याच्या आसपासची त्वचा लालबुंद होते. तसेच काही वेळेस त्यातून म्हणजे बघा पाण्यासारखा स्त्राव वाहतो आणि काहींमध्ये काळे डाग राहतात. एकच डास वेगवेगळ्या लोकांमध्ये किती विविध लक्षणे उत्पन्न करतो. शरीर एखाद्याचे कसा प्रतिसाद (Reaction) देईल. त्याप्रमाणे या लक्षणांवरील तीव्रता आढळते.
काहींना दूध व दुधाचे पदार्थ पचत नाही. त्याला Lactose Intolerance म्हणतात. काहींना शेंगदाणे व अन्य नट्सचा त्रास होतो, याची लक्षणे शरीराच्या आत आणि त्वचेवर दोन्ही जागी लगेच उठतात. काही वेळेस विशिष्ट गंधाचा, वासाचा त्रास होतो. Allergic Rhinitis मध्ये बहुतांशी धुलीकण, रजःकण किंवा विशिष्ट सुगंधाची ऍलर्जी आढळते. यामध्ये हे ’Allergens' (ऍलर्जी निर्माण करणारे घटक) संपर्कात येतात. सटासट शिंका सुरू होतात. नाक वाहू लागतं. तीव्र ऍलर्जिक रिऍक्शन्स असल्यास श्वास घेण्यासही त्रास होतो.
तीव्र वासाचे- रंगाचे साबण, शॅम्पू, कपड्यांचा साबण, डिटर्जंटस, अत्तरे, डिओड्रंटस् यांचीही अनेक जणांना ऍलर्जी असते. जिथे स्पर्श होतो तिकडची त्वचा लाल होते. पुरळ उठते, क्वचित लसही वाहू लागते. वारंवार या Allergensच्या संपर्कात आल्यामुळे स्थानिक त्वचा राठ होते आणि काळवंडते.(एक चट्टा उठून दिसतो) काहींना खोट्या आभूषणांची ऍलर्जी असते. जिथे या आभूषणांचा संपर्क येतो, त्वचा सुजते आणि चिघळते, आधी लाल होते, अतिशय कंड येतो, त्वचा सुजते आणि चिघळते. याचप्रमाणे काहींना सिंथेटिक कपड्यांची ऍलर्जी असते. इलॅस्टिकची, प्लास्टिकच्या पट्ट्यांची ऍलर्जी उद्भवते. काहींना मेंदीची, हेअर डायची ऍलर्जी असते. म्हणजे काही वेळेस कृत्रिम रसायनांची, तर अन्य वेळेस नैसर्गिक वस्तूंचीही ऍॅलर्जी असू शकते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. त्यामुळेच प्रत्येकातच सारखीच ऍलर्जी सहसा आढळत नाही. ऍलर्जीची लक्षणे आधी स्थानिक असतात आणि मग ती चटकन सर्वत्र पसरतात. त्यांना नियंत्रणात आणणे जरा कठीण असते आणि त्यावर आभ्यंतर आणि बाह्य अशा दोन्ही उपचारपद्धतींचा वापर करावा लागतो.
कित्येक वेळेस लहान वयात त्या वस्तूंची ऍलर्जी असते. त्यांचे मोठेपणी सात्मीकरणे होऊन जाते किंवा त्यांची प्रखरता कमी होते. पण काही वेळेस मात्र असे होत नाही. त्यांची तीव्रता वाढते. म्हणून तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी (Prevention is better than cure ) जसे डासांची ऍलर्जी असेल तर बागेत किंवा झाडाझुडपांजवळ जाताना संपूर्ण अंगभर कपडे घालावेत. डास चावल्यावर औषध लावण्याऐवजी आधीच अंगाला खोबरेल तेल आणि कापूर लावून पाठवावे. करंज तेल नावाचे उत्कृष्ट आयुर्वेदिक तेल आहे. यात कापराच्या वड्यांची पूड घालावी. ते हलवावे. हे मिश्रण लहान मुलांनाही बागेत नेण्यापूर्वी लावावे. याच्या कडू-उग्र वासामुळे आणि औषधी गुणांमुळे डास जवळ फिरकतही नाही. सुती कपड्यांचा वापर करावा.

ज्यांना विशिष्ट अन्नपदार्थांचा त्रास होतो, त्यांनी प्रत्येक आहाराचे पॅकेट वाचून त्यातील घटकांबद्दल खात्री करून नंतर ते खावे. ऍलर्जिक रिऍक्शन अंगावर असल्यास त्वचा लाल होते. तसेच घसा, अन्ननलिका आतून लाल होते. फोड (बारीक पुरळ) येतात. गिळताना त्रास होतो. बोलताना त्रास होतो. श्वासोच्छ्वास करण्यासही त्रास होतो. तेव्हा खबरदारी घेणे महत्त्वाचे.
अंगावर पित्त उठणे हे ऍलर्जी समानच असते. पित्त उठणे, रॅश येणे हे केवळ ऍलर्जीनेच होते असे नाही पण ऍलर्जीचे पहिले लक्षण म्हणजे त्वचेची लालिमा (आरक्तता) आणि गांधी उठणे होय. काही वेळेस अंगातील उष्णता वाढल्याने पित्त वाढल्याने गांधी उठते. अशा वेळेस पित्तशामक उपचारांचा वापर/ उपयोग होतो. काही विशिष्ट अन्नपदार्थांनी अंगातील पित्त वाढते, ते टाळावे. अंगावर कंड असल्यास खाज असल्यास सर्वप्रथमगुलाबपाण्याने किंवा साध्या पाण्याने अंग धुवावे. त्यावर तेल व कापूर लावावे. लाल झाले असल्यास चंदन उगाळून लावावे. अंगात उष्णता वाढल्याने त्रास होत असल्यास, गुलकंद किंवा तत्समउष्णता कमी करणारे काही घ्यावे. धणे-जिर्याचे पाणी प्यायल्यानेही आरामपडतो. पित्तावर आमसुलाचे पाणी लावल्याने कंड कमी होण्यास मदत होते. वारंवार पित्त उठत असल्यास जेवणातील मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. याने कंड येण्याचे प्रमाण कमी होते.
धुळीची, धुराची ऍलर्जी असल्यास एक सोपा उपाय अवलंबावा. रोज नस्य करावे. (नाकात औषधी तेलाचे /तुपाचे/ गाईच्या तुपाचे थेंब घालावेत) ते जमत नसल्यास घरातून बाहेर पडण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांना आतून तेलाचा हात फिरवावा. असे केल्याने परिसरातील धुलिकण, रज:कण या तेलाच्या स्तरावर अडकतात नाकावाटे शरीरात प्रविष्ट होत नाहीत आणि allergic rhinibtis व अन्य श्वसनाच्या तक्रारींवर आळा घालता येतो. हा खूप प्रभावी उपाय आहे.
Allergy test करून सर्व allergensची माहिती होत नाही. त्यापेक्षा त्वचेची प्रतिकारशक्ती वाढविणे महत्त्वाचे आहे. ही प्रतिकारशक्ती वाढविणे महत्त्वाचे आहे. ही प्रतिकार शक्ती दोन प्रकारची असते.
१) सहज (बीजातून मिळालेली)
२) acquired /संपादित म्हणजेच प्रयत्नपूर्वक मिळवलेली. Acquired साठी पोषक आहार, नित्य व्यायामआणि शांत मन यांची जोड असणे गरजेचे आहे. असे नसल्यास औषधांवर अवलंबत्व येते. अंगावर पित्त उठणे, हे वारंवार होत असल्यास रक्तशुद्धीसाठी काही उपाय करावे लागतात. घरगुती आणि सगळ्यात उपयोगी द्रव्य म्हणजे हळद. हळदीने रक्त शुद्ध होते. त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. वारंवार ऍलर्जीमुळे होणार्या सर्दीत तुळस उपयोगी आहे. तुळस ही प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करणारी औषधी वनस्पती आहे. कडुनिंब, अनंतमूळ, मंजिष्ठा, ज्येष्ठमध इ. औषधी वनस्पती बहुतांशी सर्व प्रकारच्या ऍलर्जीवर उपयोगी आहेत. पण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्याखेरीज आभ्यंतर औषधे घेणे टाळावीत. प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर द्यावा.
-वैद्य किर्ती देव