दोन क्षेत्रात स्वत:चे उत्तुंग स्थान स्थापित केलेल्या व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन काम करतात, तेव्हा काय घडतं? एक अभूतपूर्व निर्मिती !! ...आणि जर या दोघांना निसर्गाची, रानावनाची आवड असेल तर? त्यातून इतरांनाही काहीतरी अद्भुत अनुभवता येईल. थोडक्यात सांगायचे तर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नितीन काकोडकर आणि निष्णात छायाचित्रकार हर्षद बर्वे, या जोडीने ‘Tadoba :The Untold Story’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ताडोबा जंगलाची माहिती, मनोरंजक किस्से आणि त्यांना जिवंत करणारी अप्रतिमछायाचित्रे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच आहे.
नितीन काकोडकर एप्रिल १९९९ ते जून २००३ या कालावधीत ताडोबाचे ‘डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट’ या पदावर कार्यरत होते. पुस्तकात त्या काळातल्या त्यांच्या आठवणी आहेत. काकोडकर १९८७ च्या तुकडीतले आयएफएस अधिकारी. त्यांचे आजोबा वनविभागात कामाला होते. जंगलाचं प्रेम त्यांना उपजतच मिळालं असावं. या आवडीला खतपाणी घालण्याचं काम चंदू वाकणकर यांच्यामार्फत झालं. ‘Nature clubs movement of WWF India'नेही त्याला हातभार लावला. तरुण नितीनने वनविभागात कारकीर्द करणे, हे स्वाभाविक होते. इथे देखील या क्षेत्रातल्या दिग्गजांनी त्यांना घडवलं. विश्वास सावरकर आणि AJT जॉनसिंग त्यांचे गुरू ठरले. काकोडकरांची उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यांचं शिक्षण कधीच थांबलं नाही. अगदी वनरक्षक, वनमजूर, सहकर्मी यांच्याकडूनही ते शिकतच राहिले आणि या सर्व शिक्षकांना त्यांनी पुस्तकात महत्त्वाचे स्थान दिले आहे. वनरक्षक नरेन सिंह, सुरेश खोब्रागडे, वाहनचालक मोंडल, तरुण संशोधक राहुल मराठे, सहकर्मी RFO वरिष्ठ आणि तिखे Field director श्री भगवान, स्टॅन ब्रोक, वन्यजीवतज्ज्ञ राजेश गोपाल, उल्हास कारनाथ, झाला, मित्रमंडळी गोपाल थोसर, मनोहर सप्रे या सर्वांचा आवर्जून उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचे पती श्रावण मुरकुटे यांचादेखील उल्लेख आहे.
सदैव शिकत असलेल्या काकोडकरांचा आणखी एक गुण म्हणजे संयम. जंगलात गेल्यावर वाघ दिसणे हेच सर्वस्व मानणारे लोक असतात. तो दिसला नाही तर ‘कुछ भी नही देखा.‘ काकोडकरांनी सुरुवातच एका लाजर्या प्राण्याबरोबर केली आहे. भव्य गव्याची भेट त्यांना तेवढाच आनंद देते. अस्वल आणि त्याची पिल्लं, लंगुर माकडांच्या टोळ्या, हरणांचे नजाकतदार कळप, अननुमेय रानडुक्कर, पक्षीदेखील भान हरपून घेतात. अडकलेल्या हरणाच्या पिल्लाची सुटका केल्यावर त्यांना ’सुकून’ मिळतो. रानकुत्र्यांना शिकारीचा फडशा पाडताना बघण्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या बिबट्याला ताडोबात प्रस्थापित करण्यात आणि मगर आणि वाघाची झुंज बघण्यात सारखाच रोमांच आहे. ताडोबाला जाणार्या पर्यटकांना काकोडकरांचं कामआजही दिसलं. कारण पुस्तकातले वर्णन आणि नावं तशीच आहेत. पाणवठ्याची नावं, काटेझारी, पांढर पवनी, पुरानी विहीर, काला आंबा, कोलसा, पांगडी, खतोडा यांचा समावेश यात केला आहे. काकोडकरांच्या आजी आणि माजी अधिकार्यांनी जंगलातले हे आवास खूप प्रयत्नपूर्वक जतन केले.
पुस्तकात काकोडकरांचे निसर्गप्रेम आणि त्यांचे संवर्धन करण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन ठायी ठायी जाणवतो. त्यांच्या आठवणी खूप बोलक्या आहेत. एकदा तर ते सांबर हरणाला प्लॅस्टिक गिळण्यापासून थांबवायला धावत गेले!
अनुभवातून त्यांना उमजलं की, जंगलातल्या आगींचा सामना अगदी साध्या साधनांनीही करता येऊ शकतो. पर्यटनाचा जंगलावर पडणारा ताण आणि तो कमी करण्याचा मार्ग त्यांना गवसला. जंगलातून इतर ठिकाणी स्थलांतरित केलेल्या खेड्यांच्या शेतांवर जीवनदायी कुरणं कशी प्रस्थापित करता येतील, हे ते अनुभवातून शिकले. जंगलात कार्य करणार्यांना तर त्यांच्या अभ्यासूवृत्तीची जाणीव होईलच.

जंगलाचं संवर्धन म्हणजे केवळ वनस्पती आणि प्राणी यांचंच नव्हे, तर त्यात आणि त्याभोवती राहणार्या समुदायांचेही आहे. या लोकांबद्दलचा विचार, त्यांच्या जीवितार्थाबद्दलचा विचार आणि कृती त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने केली. इथल्या स्थानिकांचे जंगलांवर अवलंबून राहणे कमी कसे करता येईल, असे बरेच प्रश्न आहेत. बिडी पत्ता गोळा करणार्यांना पर्यायी उद्योग देता येईल का? पर्यायी उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करता येतील? बरं, उद्योग नाही तर इतर प्रश्न देखील आहेत. इथले लोक निर्वाह करायला लहान प्राणी पकडायला सापळे लावतात. क्वचित बिबटेही त्यात अडकून मरू शकतात. काही वेळा भक्षकाला मारण्यासाठी विष पेरलेलं मांस ठेवलं जातं. शिकारी तर प्राण्यांना मारतातच, त्याचबरोबर कठडा नसलेल्या विहिरींमध्ये पडण्याचा धोका प्राण्यांना असतो. वन अधिकार्यांसमोर अनेक पेचप्रसंग येतात. कधी प्राणी मनुष्यवस्तीत शिरतात. अशा वेळी प्राण्याला, वाघ-बिबट्याला tranquilizer देऊन निश्चल करावं लागतं. हे अत्यंत अवघड आहे, कारण प्राणी सतत हलत असतो. शिवाय आजूबाजूला मोठा जमाव जमलेला असतो, गर्दीमुळे ते आणखीनच कठीण होतं. बर्याच वेळा भूल देण्याच्या औषधाचे शॉट्स फोल जातात. जमावातल्या पर्यटकांना, फोटोग्राफर्स, शहरी जंगलप्रेमींना हे वनविभागाचे असामर्थ्य वाटतं, खरंतर हे वाटतं तेवढं सोपं नसतं. जंगलात भूल देणे तर त्याहून अवघड, नुकतेच ते शिवगी रेंजच्या अनुभवातून सिद्ध झालं. पण, शहरातल्या पर्यटकांना समजवायचे तरी कसे? काही वेळा जंगलातला प्रसिद्ध वाघ दिसेनासा होतो. अशा वेळेसाठी काकोडकरांचा मोलाचा सल्ला आहे. नुकतेच ‘जय’च्या बाबतीत असं घडलं. संरक्षित क्षेत्रातल्या व्यवस्थापकाकडे तिथल्या सगळ्या प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचा आदेश असतो. पण, एखाद्या प्राण्याच्या मागे हातचं काम सोडून पळत सुटणं हे योग्य नाही. व्यवस्थापकाचे कर्तव्य एखाद्या प्राण्याच्या मागे लागणे नसून संपूर्ण जंगलाचे वातावरण वन्यजीवांसाठी पूरक कसे बनविता येईल, हे आहे. जंगलात वाघाची पिल्लं सदैव दिसायला हवी. कारण बछडे हे वाघांच्या स्वास्थ्याचे सूचक आहे.
काकोडकरांनी अनेक अवघड कामगिर्या बजावल्या. त्यापैकी एक जरा जास्तच अवघड होती. ताडोबाच्या मध्यभागी स्थित तलावाचा परिसर वाघाच्या अधिवासाचे मुख्य ठिकाण. नेमके याच्याभोवती पौष महिन्यात मंदिरांत मोठा सोहळा होत असे. हजारोंच्या संख्येने लोक येत, प्राण्यांचा बळी देऊन तिथेच ते शिजवून खात असत. ही प्रथा तातडीने थांबवायची गरज असली तरी त्यासाठी धैर्य आणि संवेदनशीलता दोन्हींची गरज होती. काकोडकरांनी हे अत्यंत शिताफीने हाताळलं. प्रथा थांबविल्यावर लगेचच वाघाचा वावर सुरू झाला नाही. भरदिवसा वाघ बघायला तीन वर्षांची प्रदीर्घ वाट बघावी लागली. आता मात्र हा परिसर वन्यजीवनाचा अप्रतिम भाग आहे.
स्थानिक समुदायाची गरज समजून घेण्याचा आणि त्यावर उपाय काढण्याचा दृष्टिकोन काकोडकरांच्या माणुसकीचं दर्शन घडवतो. स्वतःच्या कर्मचार्यांशी ते जसे वागतात त्यातून ते सहज समोर येते. दिवाळीत ते स्वत: जंगलातल्या चौक्यांवर जाऊन मिठाई वाटत. जग दिवाळी साजरी करत असताना ते जंगलाचं रक्षण करतात. त्यांना ही कौतुकाची पावती. फॉरेस्ट गाईड म्हणून काकोडकर स्थानिकांना कामावर ठेवण्यास प्राधान्य देत. यामुळे पर्यटनाचा वाईट परिणाम रोखता येईल, असे त्यांचे मत.
काकोडकरांनी अनेक संस्था आणि व्यक्तींना दुर्गम भागात काम करण्याची संधी दिली. आनंदवन महारोगी सेवा समितीतर्फे आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. आरोग्याच्या सोयींना वंचित असलेल्या समाजाची मोठी सोय झाली. ताडोबाच्या शेजारच्या शाळेतल्या मुलांना जंगलाची ओळख करून त्या वनक्षेत्राचे महत्त्व पटवून त्यांच्या प्रेमात पाडण्याची गरज का भासते, हे समजवले. आपल्या शेतातले पाणी देखील या जंगलाचेच देणे आहे, हे मुलांना पटले. जंगलात सफार्या करून मुलांना जंगलाच्या सुंदर आठवणी दिल्या. एक निसर्गप्रेमी म्हणून मला यात भावले, ते त्यांचे सूक्ष्मनिरीक्षण आणि जंगलाला पुस्तकासारखं वाचण्याचं कौशल्य. जमिनीवर, वृक्षांच्या बुंध्यावरच्या खुणा, प्राण्यांचे ठसे, त्यांच्या शिकारीच्या अवशेषातून, विष्ठेतून भक्षकाने कोणता प्राणी खाल्ला असावा याचे अनुमान लावणे... सगळेच किती विस्मयकारक वाटते. घनदाट जंगलात जरी प्रत्यक्ष प्राणी दिसणं अवघड असलं तरी अशा खुणा खूप काही सांगून जातात. वन्यजीवनाची आवड असणार्यांनी तर हे पुस्तक संग्रही ठेवावे. वनविभाग कशा विपरीत परिस्थितीत वनांचे संरक्षण करते, हे जवळून कळेल. जंगलं केवळ झाडं-पशु-पक्षी यांचं घर नव्हे तर पाण्याचे अदृश्य धरण आहे जे मानवजातीच्या अस्तित्वाचे रक्षण करते.
- अंजना देवस्थळे