मंजिरीचा पत्ता शोधत, नीता एकदाची बरोब्बर गल्लीत पोचली. गल्लीत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग पाहून तिला कसेसेच झाले. बाजूची थोडी मोकळी जागा जुने सामन, काचा, थर्माकोल, टाकाऊ सामानाने व्यापली होती. नाक मुरडून नीता मंजिरीच्या सोसायटीत शिरली.
गेटच्या आत सगळ एकदम पॉश! स्वच्छ, प्रशस्थ रस्ते. शोभिवंत झाडे. सुबकशी बाग. लहानसे मंदिर. दारात watchman ची फौज. Visitor’s Register मध्ये नाव लिहून नीता लिफ्टकडे वळली.
दार उघडताच मंजिरी तिच्या गळ्यातच पडली! “किती वर्षांनी भेटत्येस, नीतू! ये बस!” दोघींच्या खूप गप्पा रंगल्या! इतक्यात मंजिरीची कामवाली बाई प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा घेऊन गेली. नीताने चौकशी केली तेंव्हा, “काही नाही ग, जाता जाता कोपऱ्यावर कचरा टाकून देईल ती!”, मंजिरीने म्हणाली.
नीताच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला! चकाचक सोसायटीचे रहस्य उलगडलं!
“अग, पण परिसर सुद्धा तुमचाच आहे न! तो नको का स्वच्छ ठेवायला?”
“तिकडे पाहायला वेळ आहे कुणाला? आणि रस्ता पालिकेचा आहे. त्यामुळे तो स्वच्छ ठेवायचे काम नगरपालिकेचे आहे.”, मंजिरी सहज म्हणाली.
नीता हसून म्हणाली, “हे कसं आहे सांगू का? पुण्याचा कचरा उरुळी देवाचीला नेऊन टाकायचा! मुंबईचा कचरा देवनारला नेऊन टाकायचा! किंवा अमेरिकेने आपला कचरा दुसऱ्या देशात नेऊन टाकायचा! दुसऱ्याची हानी झाली तरी चालेल. आपण स्वच्छ!
“तुला एक गम्मत सांगते! जपान मधला प्रसंग. एक जपानी माणूस रोज ठरलेल्या लोकलने कामाला जात असे. एक दिवस, तो ज्या सीटवर बसायचा ते सीट त्याला किंचित फाटलेले दिसले. दुसऱ्या दिवशी तो घरून येतांना सुई – दोरा घेऊन आला. गाडीत चढल्यावर त्याने आधी ते सीट व्यवस्थित शिवले. त्याला कोणी विचारले, ‘का रे बाबा, तुझं काम आहे का हे?’ तर तो म्हणाला, ‘माझ्या घरातले सोफ्याचे कवर फाटले तर मी शिवणार नाही का? हे पण माझेच आहे की!”.
मंजिरीने जीभ चावली! “खरे आहे ग! असं माझे पणाला कुंपण घालून, परिसराची हानी करणे काही बरोबर नाही!”
ज्ञानेश्वर संतांचे वर्णन करतांना म्हणतात, की त्यांची मी-माझे ही संकुचित वृत्ती देशाच्या, मानवाच्या, प्राण्यांच्या, पृथ्वीच्याही पलीकडे जाते. संपूर्ण विश्व त्यांना आपले घर वाटते. त्यातील सर्व जीव इतके आपलेसे वाटतात, की जणू काही ते स्वतःच अनंत रूपांनी नटले आहेत! जिवंत प्राण्यांनाच काय, दगडा मातीच्या खाणींना, नद्या तलावांना, डोंगर दऱ्याना सुद्धा ते आपले मानतात! असा मनुष्य कोणालाही किंवा कशालाही हानी पोहचू शकेल काय?
ज्ञानेश्वर म्हणतात -
हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपणाची जाहला ।।