’’मुंबईचा विकास झाला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार मिळेल. या दृष्टीने मुंबईमध्ये ’इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ उभारण्यात येत आहे. बुलेट ट्रेन, कोस्टल रोड या माध्यमातून मुंबईच्या विकासाचे व्हिजन भारतीय जनता पक्षाने सादर केले. खड्डे व रस्ते यापलीकडे जाऊन देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे’’, असे मत खा. पूनममहाजन यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
मुंबईच्या विकासाची तुमची नेमकी संकल्पना काय आहे ?
मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. भारत हा वेगाने आर्थिक प्रगती करत आहे. मागच्या महिन्यातच आपण बर्याच वर्तमानपत्रांत वाचले असेल की, भारत ब्रिटनला मागे टाकून विश्वातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला. याचा अर्थ असा आहे की, जे ध्येय आपण भारतासाठी निश्चित केले, त्या दिशेने आपण योग्य वाटचाल करत आहोत. आता जगातील सर्वोत्कृष्ट तीन अर्थव्यवस्थेमध्ये भारताचे स्थान असावे, हे आपले लक्ष्य आमधहे. त्यादृष्टीने या माध्यमातून आपण एक पाऊल पुढे गेलो आहोत.
परंतु, देश प्रगतीची नवी शिखरे गाठत असताना आपली आर्थिक राजधानी कमकुवत राहिली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी तो एक अडथळा ठरेल. मुंबई ही केवळ एक शहर नाही, तर मेट्रोपॉलिटन रिजन आहे. भारताच्या ‘जीडीपी’मध्ये मुंबईचा वाटा २५ टक्के आहे, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचा वाटा ७५ ते ८० टक्के आहे. त्यामुळे जगातील सहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ‘ग्लोबल आर्थिक सिटी’ होणे अत्यावश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. ‘मुंबई ग्लोबल सिटी’ होण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे फार गरजेचे आहे. मुंबईचा विकास हा फक्त एक गल्ली किंवा दोन रस्ते यापुरता मर्यादित न राहता तो सर्वांगीण होणे आवश्यक आहे. कारण एक जागतिक आर्थिक केंद्र म्हणून आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा भाग म्हणून मुंबईला ओळखले जाते. त्यामुळे मुंबई शहराचा एक सर्वांगीण ‘ग्लोबल विकास’ होणे फार महत्त्वाचे आहे.
‘इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या नेतृत्वाखाली आकारास येत आहे, यामुळे मुंबईच्या विकासात कसा हातभार लागेल, असे आपल्याला वाटते?
मी आधी म्हटल्याप्रमाणे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला मुंबईला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे घेऊन जायचे आहे. आज आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक राजधानी म्हणून शांघाय, सिंगापूरकडे आणि नंतर टोकियोकडे पाहिले जाते. सिंगापूरनंतर ‘इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ दुबईने बांधले आहे. परंतु, दुबई हे ‘इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’साठी सहज वाटावे असे केंद्र नसूनही दुबई त्यासाठी प्रयत्न करत आहे. पण मुंबई मात्र, नैसर्गिकरित्या ‘इंटरनॅशनल इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ होऊ शकते. ‘मुंबई इज ए नॅचरल सेंटर फॉर इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस.’ भारताची सर्वोच्च बँक-रिझर्व्ह बँक मुंबईत आहे. आर्थिक राजधानीसाठी जे आवश्यक असते, ते ते सर्व मुंबईत आहे. येथे बॉलीवूड आहे. येथे स्मॉल ऍण्ड मीडियमसेक्टरचे व्यवसाय आहेत. मुंबईत कॉर्पोरेटसही आहेत आणि छोटे-छोटे व्यापारी-व्यावसायिकही आहेत. म्हणजेच मुंबई आर्थिकदृष्ट्या स्वयंभू व स्वयंपूर्ण आहे. ती देशातल्या अन्य शहरांसाठीदेखील पूरक ठरु शकते.
माझ्या मतदारसंघात देशातलाच नव्हे, तर आशिया खंडातला सगळ्यात मोठा चपलांचा बाजार आहे. जो चीनशी स्पर्धा करतो, असे इथले छोटे कारागीर सांगतात. आपल्याकडे ‘बॉम्बे स्टॉक एक्सेंज’ आहे. ‘एनएसई’देखील इथेच आहे.
‘इंटरनॅशनल फायनान्स सेंटर’ बीकेसीमध्ये उभारण्याचे कारण म्हणजे, सर्वच खाजगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांची कार्यालये येथे आहेत. मोठ्या-मोठ्या बिझनेस हाऊसेसची ऑफिसेस बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहेत. मुंबईतील सगळ्यात मोठा बिझनेस या कॉम्प्लेक्समधून चालतो.
आता मुंबईची वाढ अधिक गतीने होत आहे. पूर्व आणि पश्चिमउपनगरांच्य दृष्टीने बीकेसी हे मध्यवर्ती ठिकाण झाले आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून येथे तीन मोठे पूल उभारले गेले आहेत. या मार्गाने आपण ईस्ट ऑफ मुंबई, वेस्ट ऑफ मुंबई, एससीएलआर आणि एक्स्टेंडेड एससीएलआर पश्चिमेकडूनही जाऊ शकतो, तसेच धारावीहून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे दळणवळण सुविधेच्या दृष्टीनेही ‘आयएफसी’साठी बीकेसी मध्यवर्ती ठिकाणी आहे.
सध्या भारताचा ‘जीडीपी’ ग्रोथ वेगाने पुढे जात आहे. आर्थिक राजधानीने त्यासाठी आणखी हातभार लावला, तर जगातील सर्वोत्कृष्ट तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आपण स्थान मिळवू शकू. त्यासाठी मुंबईतील ‘इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर’ हा महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे.
‘आयएफएससी’च्या माध्यामातून इथे हजारो कोटींची उलाढाल होऊ शकते. स्टॉक एक्सचेंज, बँक सेक्टर वा अन्य क्षेत्राच्या माध्यमातून ही उलाढाल होऊ शकते. आम्ही ५० हेक्टर क्षेत्रावर फायनान्शियल एसईझेड उभारायचा प्रयत्न करत आहोत. येथे गुंतवणूकदारांना टॅक्स हॉलिडेजसुद्धा मिळतील.
मोठ्या-मोठ्या कंपन्यांना आपल्या कामासाठी नेहमी फ्रंट ऑफिसेसची आवश्यकता असते. यासाठी सिंगापूरचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. बिझनेस कंपन्या जेव्हा सिंगापूरला आपले फ्रंट ऑफिसेस उभारायच्या तेव्हा त्या आपली बॅक ऑफिसेस चीनमध्ये उभारत असत. कारण सिंगापूरमध्ये जागा, इन्फ्रास्ट्रक्चर महाग असायचे आणि चीनमध्ये स्वस्त आहे.
मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट इक्विटी फंड जे मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात ते आपली फ्रंट ऑफिसेस सिंगापूरला ठेवतात आणि बॅक ऑफिसेस शांघायला ठेवतात किंवा आता दुबईला उभी करतात. ‘इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर’च्या उभारणीसाठी आम्ही जोपर्यंत चढाओढीने प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्थेला त्याचा उचित लाभ मिळणार नाही. ‘आयएफएससी’च्या उभारणीने अर्थव्यवस्थेच्या वाढीला मोठा हातभार लागणार आहे, त्यामुळे आम्ही त्याकडे मोठ्या आशेने पाहत आहोत.
‘आयएफएससी’चा अणखी एक लाभ म्हणजे, यामुळे पहिल्या टप्प्यात सुमारे १५ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. यात कंपन्यांच्या प्रमुखांपासून ते सुरक्षा रक्षकांपर्यंत अनेक रोजगाराच्या संधी असतील.
‘आयएफएससी’ प्रकल्प ५० हेक्टर जागेत उभारण्यात येत असून बांद्रा ईस्ट, कुर्ला ते कलिना या जवळजवळ पाच हजार एकरच्या भागाचा यात समावेश करता येऊ शकतो.
बांद्रा ईस्टला पीडब्ल्यूडीची गव्हर्नमेंट कॉलनी आहे. १०७ ते ११७ एकरची ती जागा आहे. त्याच्या पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन पूर्णपणे तयार झाला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ‘आयएफएससी’च्या माध्यमातून या सर्व गोष्टी या प्रकल्पात समाविष्ट होत आहेत. तसेच यामुळे जागांचा ‘एफएसआय’ आणि हाऊसिंग स्टॉकही वाढत आहे. या सर्व बाबी एकमेकांशी अशा प्रकारे इंटरकनेक्टेड आहेत, ज्यांचा विकास ‘आयएफएससी’च्या माध्यमातून होणार आहे.
बीकेसीमध्ये तीन मेट्रोही धावणार आहेत. मुंबईत एकूण सात मेट्रो प्रकल्पाची उभारणी होत आहे, मेट्रोचे जाळेच होत आहे. ऑन वन तिकीटट्रान्सपोर्टेशन आपण तयार करतोय. हे सगळे एक ‘ग्लोबल शहर’ला लक्षात ठेवूनच आपण करतोय. हे व्हिजन, ही दृष्टी ‘ग्लोबल सिटी’ची आहे. गल्लीपासून संपूर्ण मुंबईच्या विकासाची संकल्पना इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आम्ही राबवितो आहोत. एवढे सर्व प्रकल्प उभारत असताना मी हेही सांगते की, यात मुंबईत राहणार्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक्क आणि रोजगारदेखील मिळणार आहे.
मात्र, असे असताना ‘ग्लोबल सिटी’साठी आवश्यक असणारा विचार अन्य कोणाहीकडे नाहीये, किंवा असे व्हिजनही कोणाकडे नाहिये. अजूनही आपण गटाराच्या आणि खड्ड्यांच्या भांडणातच स्वतःला अडकून घेतले आहे. खरे तर गटार आणि खड्डे भरायचे असतील, तर त्यासाठी एक नियोजनबद्ध विचार आणि आराखडा असायला हवा.
मुंबईच्या हितासाठी केंद्र सरकारचे कोणते प्रकल्प पुढच्या काळात राबविले जातील?
केंद्र सरकारच्या माध्यमातून मुंबईत ‘बुलेट ट्रेन’चा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ही ‘बुलेट ट्रेन’ ‘आयएफएससी’च्या खालून जाणार आहे. हा प्रकल्प ‘गिफ्ट सिटी’ आणि ‘आयएफएससी’ या दोघांना पूरक असणार आहे. ‘गिफ्ट सिटी’ला लाभलेले सर्वात मोठे वरदान म्हणजे, त्यांच्याकडे जागेची भरपूर उपलब्धता आहे. मात्र, मुंबईत जागेची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे, तसेच जागा उपलब्ध झाली, तरी त्याची किंमतही खूप जास्त आहे. ‘बुलेट ट्रेन’मुळे ‘गिफ्ट सिटी’तील ‘एसईझेड‘पासून मुंबईच्या ‘आयएफएससी‘पर्यंत कनेक्टिव्हीटी होणार आहे. तसेच अंडरग्राऊंड मेट्रोही उभारण्यात येत आहे. कोस्टल रोड हादेखील एक महत्त्वपूर्ण प्रकल्प मुंबईत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात दिल्लीत एक बैठक झाली होती. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होते. त्या बैठकीवेळीच कोस्टल रोडला सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. आरएफक्युपर्यंत आपण कोस्टल रोड घेऊन गेलो आहोत. आता आपण, कोस्टल रोड विथ सी लिंक अशा पद्धतीने त्याचा एक मोठा प्लॅन तयार करतोय. कोस्टल रोडशी सी लिंकची कनेक्टिव्हिटी केली, तर मुंबईकरांचा ट्रॅफिकचा त्रास अधिकाधिक लवकर आणि सोप्या पद्धतीने सोडविला जाईल.

मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे, असे बोलले जाते, यावर आपले काय मत आहे.
मी भाषणात सगळीकडे हे नेहमीच सांगते की, मला मराठी असण्याचा अभिमान आहे. मी मुंबईची मुलगी आहे. जरी आम्ही मूळचे मराठवाड्याचे असलो तरी माझा जन्ममुंबईतलाच आहे. माझे शिक्षण मुंबईतच सायनच्या डीईएस हायस्कूलमध्ये आणि दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये झाले. मी स्वतः सगळे शिक्षण मराठी माध्यमातून घेतले, कारण तशी माझ्या वडिलांची इच्छा होती. ते स्वतः मराठी माध्यमात शिकलेले होते. आपली मातृभाषा जो शिकतो, तो नेहमी पुढे जातो, असे ते म्हणत. हा मराठीचा अभिमान मलाही आहे.
मुंबईत राहून मला मराठी माणसाचा अभिमान वाटतो. मराठी माणसाचा जसा स्वभाव आहे, तसा अन्य कोणत्याही राज्यात दिसणार नाही. मराठीपणाचा अभिमान बाळगूनही मराठी माणूस हिंदी भाषिक वा गुजराथी भाषिक, वा अन्य कोणताही भाषिक असो त्याला मन मोठे करून आपल्यात समाविष्ट करून घेतो. त्याला आपल्यासारखे मुंबईकर बनवतो. मी स्वतः मराठी माणूस असल्याने माझ्यासाठी ही खरेच एक अभिमानाची गोष्ट आहे.
मराठी माणूस हा सुजाण आहे. अन्यथा अन्य भाषिकांना स्वीकारण्याचा कोणताही दबाव नसतानाही त्याने इतक्या लोकांना मुंबईत स्वीकारले. मराठी माणूस जेवढा कॉस्मोपॉलिटन आहे, ऍक्सेप्टेबल आहे, तसे तुम्ही इतर कोणत्याही भागामध्ये पाहायला मिळणार नाही. मराठी माणूसस्वतःला मुंबईकर मानतो. तो गुजराथी माणसाशीही आपला मुंबईचा माणूस म्हणूनच वागतो. किंवा तो हिंदी भाषिक असेल तरी तो त्यांच्याशी तसाच वागतो. पण आता या मराठी मुलाला नोकरी हवी आहे. या मराठी मुलाला शिक्षण हवे आहे. या मराठी मुलाला मुंबईत रोजगार हवा आहे. लहान का असेना पण स्वतःचे घर हवे आहे.
मनसेबाबत काय वाटते?
मराठी माणसाचा भ्रमनिरास.
युतीविषयी आज या वळणावर काय वाटते?
तेव्हाची भाजप आणि तेव्हाची शिवसेना आज दोन्ही नाहीये. आज भारतीय जनता पक्ष विश्वातला सर्वात मोठा पक्ष आहे. रालोआची १४ राज्यांत सत्ता आहे. त्यातील दहा राज्यांत भाजपची एकट्याची सत्ता आहे. आज ईशान्य भारत असो, दक्षिण भारत असो, उत्तर भारत असो सगळीकडे भारतीय जनता पक्ष आपली पोहोच वाढवत आहे. फक्त संघटन म्हणून नाही, तर सरकारमध्ये भरपूर ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा सहभाग आहे. कोणी अपेक्षितही केले नसेल, अशा मणिपूरच्या, आसामच्या, अरुणाचलच्या निवडणुका असो, आज सगळीकडे भारतीय जनता पक्ष पोहोचला आहे. तामिळनाडूमध्येसुद्धा भारतीय जनता पक्ष रुजत आहे.
कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, अधिक जागा लढवणे, हे काहीही चुकीचे नाहीये. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा चुकीच्या नसतातच, माझे एवढेच मत आहे. आज जे झाले ते झाले, कारण ती बाळासाहेबांची शिवसेना आज नाही आणि भाजपही पूर्वीचा नाही.
मुलाखतकार - किरण शेलार
शब्दांकन - महेश पुराणिक