अवंती: मेधाकाकू या म्हणींच्या पुस्तकाची पुढची पाने मी वाचत्ये आता. पण गम्मत आहे की या प्रकरणातल्या सगळ्या म्हणी पाळीव किंवा जंगली प्राण्यांवर आहेत. हे कसे काय असेल असा प्रश्न आहे माझ्या मनांत... !!
मेधाकाकू: अगदी बरोबर आहे तुझे निरीक्षण, अवंती...!!... या म्हणी आणि वाकप्रचारातून आपल्याला त्या काळातील समाजाच्या मानसिकतेचा परिचय होतोच पण आपल्या शोधक नजरेत अजूनही काही टिपण्यासारखे असते यांत...!!... आपण वाचत असलेल्या या म्हणींमधे, तू म्हणालीस तसा प्राण्यांचा संदर्भ दिला आहे. या सगळ्या प्राण्यांच्या गुणवत्तेचा आणि स्वभाव वैशिष्ठ्यांचा केलेला अभ्यास आणि रूपक म्हणून- धृष्टांत म्हणून त्याची व्यक्ति किंवा समाजाशी केलेली समर्पक तुलना हे फार विलक्षण आहे. निसर्गाच्या खूप जवळ असलेल्या आणि परंपरेने शेतीप्रधान अशा आपल्या समाजाची अभ्यासवृत्ती, निरीक्षण शक्ति आणि सूक्ष्म विश्लेषक नजर या सर्वाचा परीचय सुद्धा अशा म्हणींतून आपल्याला होतो. आता याच पानावरची ही म्हण बघ, आपल्याला कायकाय सांगते.... !!!
अस्वलीच्या आधी किंक फोडावी.
मेधाकाकू: किंक फोडणे म्हणजे किंकाळी फोडणे किंवा मोठयाने ओरडणे. एक लोकभ्रम असा आहे की जंगलातून प्रवास करतांना अचानकसमोर आलेलेअस्वल आपल्यावर प्रथम गुरगुरते.अश्यावेळी घाबरून न जाता मोठयाने किंचाळावे, त्यामुळे अस्वल घाबरते आणि त्यामुळे त्याला ऐकू येईनासे होते, आणि मग आपल्यावर हल्ला न करताच ते पळून जाते. मात्र या म्हणीचा सामाजिक व्यवहार संदर्भाला घेतला जाणारा गूढार्थ किंवा मथितार्थ असा कीकोणाशी वाद किंवा भांडण झालेच आणि आपण जरी चुकीचे आणि खोटे असलो तरी आपले म्हणणे सगळ्यात आधी मोठ्या आवाजात सगळ्यांसमोर मांडावे. मग ऐकणारे श्रोते, आपण ओरडून सांगितलेलेच खरे आहे असे गृहीत धरतात आणि आपण खरे ठरतो. बहाणेबाज आणि कांगावखोर व्यक्तींचे समर्पक वर्णन करणारी ही दुसरी म्हण.
आजच्या घडीला, आपल्या समाजाचे गैरव्यवहार सुधारू पहाणार्याला आणि नीतिमत्ता आणि कायद्याचे पालन करा असा आग्रह धरणार्या आपल्या चारित्र्यवान नेत्यावर आरोप करताना माध्यमे आणि विरोधक ज्याप्रकारे “ किंक फोडतात ” ते हरलेल्या कांगावखोरांचे आणि त्यांच्या बहाणेबाजीचेच लक्षण आहे...!!
अवंती: अरेच्या.... म्हणजे काकू या म्हणींचा वरवर दिसणारा शब्दार्थ वाचून थांबायचे नाहीये मला..... तर यातले रूपक ओळखून समजून घ्यायचे आहे. काकू तुझे पटले मला.... यातून... कुठल्याही शाळेत जाऊन शिकता येणार नाही असे उत्तम व्यवहार ज्ञान नक्की शिकायला मिळतय मला.... !!... आणि आता म्हणीत आल्ये एक घोरपड... !!..गम्मतच आहे ...मोठी ...!!
घेगं घोरपडी मान तर म्हणे टाक माझ्या धावेवर.
मेधाकाकू: अरे वा ...अवंती ..बघ या म्हणींत तर घोरपडी बरोबरचा संवादच आहे जणू…!... एक लक्षात घे की दंतकथा ह्या अलंकाराशिवाय कुठलाही इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. अशीच एक दंतकथा १६७०सालातिल वीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा किल्ला अर्थात सिंहगड मोहिमेबद्दल सांगितली जाते....!!
तर ही घोरपड मावळ्यांची फार लाडकी. घोरपड हा साधारण पाल किंवा सरड्यासारखा दिसणारा पण आकाराने खूप मोठा असा प्राणी, जो संह्याद्रिच्या डोंगर रांगातला रहिवासी आहे. फताडे – रुंद पाय आणि लांब टोकदार नखे यामुळे याला खडकांवर घट्ट पकड घेता येते. चढाईच्या वेळी याच्या कमरेला दोर बांधून मावळे याला सर्वात आधी डोंगरावर पाठवित असत अशी आख्यायिका आहे. म्हणून त्याकाळी एक जणू लोकश्रद्धा होती की मोहीम फत्ते झाली की त्याचे श्रेय घोरपडीला द्यायचे. म्हणूनचमग कृतज्ञतेने प्रत्येक मावळा शिलेदार घोरपडीला विचारे,“ घे गं घोरपडी मान .... तुला भूक लागली असेल... काय देऊ तुला खायला ”...!!त्यावेळी घोरपड जणू उत्तर देत असे,“ माझा मान – माझे जेवण इथे नको पण तेमाझ्या धावेवर म्हणजे बिळाजवळ ठेव ”....!! तर यातला मथितार्थ आणि भावार्थ असा की आपले श्रद्धास्थान असेल अश्या प्रत्येकाचा सन्मान योग्य पद्धतीने,योग्य वेळी आणि योग्य ठीकणीच व्हायला हवा.
अवंती:मेधाकाकू ...अगं या छोट्याशा म्हणींत काय खजिना दडलाय..... एकदम सही है ये ...!!!
मेधाकाकू: अवंती या परंपरेने आलेल्या अशा म्हणी - दंतकथा - आख्यायिका –
लोकश्रुती आणि लोकश्रद्धांमधेसुद्धा आपल्याला ... आपल्या अभिमानास्पद इतिहासाची पाळेमुळे शोधता येतात...!!
-अरुण फडके