‘नवाझ आणि उद्धव यांची भाषा एकच का?’ 

    15-Feb-2017   
Total Views | 1
 
 
इतकी मोठी महापालिका म्हणून मुंबईत कोणत्या गोष्टी व्हायला हव्या होत्या, असे आपल्याला वाटते?
 
मुंबई महापालिका महत्त्वाची असण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प खूप मोठा आहे. जवळपास ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि बँकेतील दीर्घ मुदत ठेवी साधारण ५० हजार कोटींच्या आहेत. असे असताना मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ज्या मूलभूत सुविधा निर्माण करणे अपेक्षित होते, त्या निर्माण करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. चाळीत, गावठाणात, झोपडपट्टीत राहणारा गरीब मुंबईकर आज काय अपेक्षा ठेवतो? पुरेशी व स्वच्छ शौचालयाची सोय असावी, पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे आणि रात्री फिरताना रस्त्यांवर दिवे असावेत इत्यादी इत्यादी. आज एवढ्या हजार कोटींचा अर्थसंकल्प असतानाही आज मुंबईत रेल्वे लाईनच्या, समुद्रकिनारी, झुडूपांमध्ये अनेकांना शौचास बसताना आपण पाहतो. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय? त्यामुळे रस्ते, सांडपाण्याचा निचरा, त्यावर प्रक्रिया, समुद्रकिनारा स्वच्छता, रुग्णांची सोय, शिक्षण सुविधा या सार्‍याच क्षेत्रात अत्यंत सुमार व निराशाजनक काम गेल्या १५-२० वर्षांत झाले आहे.
 
पारदर्शक कारभाराचा आग्रह आपण धरता आहात. पारदर्शी कारभार म्हणजे आपल्याला नेमके काय अपेक्षित आहे?
 
पारदर्शी कारभार म्हणजे जनतेला दिल्या जाणार्‍या सेवा-सुविधा या जनतेला प्रतिसाद देणार्‍या असाव्यात, मुंबईकर जो कररूपी पैसे भरतो त्याचे पुढे काय होते याचा त्याला वेळच्या वेळी ऑडिटेड हिशोब मिळावा, या सर्व कररूपी गंगाजळीतून किती व कोणती विकासकामे होतात याचा अहवाल त्याला मिळावा, या विकासकामांसाठी दिल्या जाणार्‍या कंत्राटांच्या कंत्राटदरांची पारदर्शकता, त्याचा दर्जा, कंत्राटदार दिलेल्या अटींनुसार व वेळेत काम करतो आहे की नाही, याबाबत प्रत्येक मुंबईकर नागरिकाला वेळच्या वेळी माहिती मिळावी व ती न मिळाल्यास त्याविरुद्ध तक्रार करण्याची व तिला तत्काळ न्याय देण्याची यंत्रणा सक्षम असायला हवी, आदी गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत. यासाठी आज टेंडरिंग प्रक्रियेत पारदर्शकता यायला हवी. सर्वच अधिकारी व नगरसेवक भ्रष्ट आहेत असे नाही, पण अधिकार्‍यांची व नगरसेवकांचा उत्पन्नाचा ताळेबंद नागरिकांना दरवर्षी मिळायला हवा. यासाठीच भाजपने आपल्या जाहीरनाम्यातून मुंबईकरांना हा अधिकार देण्यासाठी उपलोकायुक्तपदाची तरतूद करण्याची हमी दिली आहे. या पारदर्शकतेतून नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास वाढेल आणि पालिकेत भ्रष्टाचाराचे काम न होता सेवेचे काम होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
 
मुंबई भाजपकडे यापूर्वी सक्षम मराठी नेतृत्व नव्हतं. आता तुमच्यारूपाने ते मिळालं असं वाटतं का?
 
मी या मताशी असहमत आहे. यापूर्वी अनेक दिग्गज मराठी नेत्यांनी मुंबई भाजपचे नेतृत्व केले आहे. याआधी त्या त्या वेळी भाजप अध्यक्षांना जो रोल मिळाला तो त्यांनी उत्तमरित्या निभावला, असं मला वाटतं. मी याबाबतीत भाग्यवान आहे. कारण आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागरिकांच्या हिताच्या रक्षणासाठी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम करत आहेत. हे मला मिळत असलेले पाठबळ आधीच्या मुंबई अध्यक्षांना कदाचित मिळाले नव्हते, त्यामुळे माझं काम हे आता थोडं उजवं दिसत असेल.
 
आपल्या व्यक्तिगत राजकीय कारकिर्दीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे वाटते का?
 
निश्चित हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जनसंघाच्या काळातील ठाऊक नाही, पण भाजपच्या काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूक अशा तीनही निवडणुका याआधी कोणाच्या मुंबई अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आल्याचे मला स्मरत नाही. त्यातही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अहंकारी शिवसेनेने भाजपशी युती तोडली असताना पक्षाचे संघटनात्मक बळ वाढविणे, त्याचबरोबर निवडणुकीच्या दृष्टीनेही यश मिळवून देणे, अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने ही निवडणूक हा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, असे मला नक्कीच वाटते.
 
मुंबई भाजपची यापुढील वाटचाल कशी असेल असं वाटतं?
 
आज मुंबईत भाजपचे तीन खासदार आहेत, १५ आमदार आहेत. तीन विधान परिषद सदस्य आहेत. आता मुंबई महानगरपालिकेतही भाजपने क्रमांक १ चा पक्ष व्हावं असेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. आणि याचदृष्टीने मुंबईकरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही कामाला लागलो असून आता मुंबईत परिवर्तन व्हायलाच हवं ही मुंबई भाजपची आता प्राथमिक जबाबदारी राहील आणि त्यादृष्टीने कार्यकर्त्यांची व संघटनेची बांधणी करावी लागेल.
 
 
छोट्या व स्वस्त घरांची निर्मिती हा मुंबईतील केवळ मराठी माणूसच नाही, तर मतदानाविषयी जागरूक असलेला कनिष्ठ, कनिष्ठ मध्यमवर्गीय आदी सर्वांचीच एक महत्त्वाची गरज आहे. याकडे आपण कसे पाहता?
 
ही आज मुंबईची खरच खूप मोठी गरज आहे. गेल्या १५-२० वर्षांच्या काळाचा विचार करता बांधकाम क्षेत्राचा-व्यवसायाचा विकास झाला, ज्यांना परवडतं त्यांच्यासाठी २,३,४, अगदी ५ बेडरुम्सची घरं निर्माण झाली. मात्र हे करत असताना झोपडपट्टी पुनर्विकास, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, एकात्मिक विकास (क्लस्टर) आदी गोष्टी अपेक्षित वेगाने झाल्या नाहीत. त्या होण्याची आज नितांत गरज असून आता छोट्या आणि स्वस्त घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्यास राज्य सरकारने अनुकूल भूमिका घेतली आहे, ही गोष्ट दिलासादायक आहे. भाजपनेही हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे. यामुळे पुढच्या सात-आठ वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण होऊन सामान्य मुंबईकरांना मोठी सोय उपलब्ध होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
 
शिवसेनेने केंद्रात व राज्यात सत्तेत राहूनही सातत्याने नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे धोरण अवलंबले आहे. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने युती तुटलीच आहे. आता राज्य व केंद्र सरकारमधूनही शिवसेनेने बाहेर पडावे, असे वाटते का?
 
शिवसेनेने काय करावे हे त्यांनाच ठरवावे लागेल. मात्र आज सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यामध्ये शिवसेनेच्या या भूमिकेबाबत प्रचंड राग आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे, त्यांचे करेजमुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमानिर्मिती, भ्रष्टाचाराविरोधात उघडलेली व्यापक मोहीम, सीमा सुरक्षेसाठी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’सारख्या धाडसी गोष्टी आदी सर्व घडत आहेत. असे असताना दुसरीकडे पाकिस्तानचे नेते, त्यांचे पंतप्रधान नवाझ शरीफ ज्याप्रकारे मोदींवर टीका करतात, निंदा-नालस्ती, विनोद करतात त्याच भाषेत आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही बोलत आहेत. मग नवाझ शरीफ आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषेत फरक तो काय? असा प्रश्न सामान्य भाजप कार्यकर्त्याला पडत आहे. आणि याचमुळे भाजपमध्ये आज शिवसेनेबाबत प्रचंड राग आहे.
 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या निवडणुकीतील कामगिरीबाबत आपला काय अंदाज आहे?
 
या निवडणुकीत सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष कुठे नजरेसही पडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आम्हाला कोण विचारण्याची हिम्मत करणार, अशा गुर्मीतून कॉंग्रेसने आजवर मुक्तपणे केलेला भ्रष्टाचार यामुळे सार्‍या देशातीलच जनतेला आता कॉंग्रेसचा वीट आलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसचे काही अस्तित्वही नाही आणि त्यांची कोणी दखलही घेत नाही. तिच गत राष्ट्रवादीची. त्यामुळे हे दोघे पक्ष निवडणुकीत काही यश मिळवू शकतील, असे मला वाटत नाही.
 
मनसेबाबत काय वाटते?
मनसे सध्या ज्या परिस्थितीत आहे, ते पाहता ते सध्या शिवसेनेशी जास्त जवळीक करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे दिसत आहे. त्यामुळे माध्यमांसमोर चमकत राहून टीआरपी खेचणे यापलीकडे जाऊन लोकांच्या आयुष्यात खरोखरच काही बदल घडविण्याची इच्छा आणि तशी मेहनत घेण्याची वृत्ती मनसेकडे अजिबातच दिसत नसल्यामुळे मुंबईकर मनसेला फार जवळ करतील, असे मला वाटत नाही.   
 
मुलाखतकार- किरण शेलार
शब्दांकन- निमेश वहाळक

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा
अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121