“आजी, येतेस ना? आज अरेबिया मधील मंदिरे पहायची आहेत.”, सुमितने आजीला बोलावले.
दुर्गाबाई हात पुसत बाहेर आल्या. शंकररावांना म्हणाल्या, “अरेबिया म्हणले की सिंदबादच्या सात सफरी, अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा अशा गोष्टी आठवतात. सूर्य मंदिरे नवीनच आहे!”
“नवीन कसली दुर्गाबाई, फार जुनी मंदिरे आहेत! आपण जाणार आहोत इस्लामच्या आधीच्या अरेबिया मध्ये. आज आपण बायबलच्या आधाराने अरेबियाची सफर करू!
“तर बायबल मध्ये दिलेला घटनाक्रम असा आहे - आदमचा वंशज नोह. याने प्रलय काळात मोठ्या जहाजातून (Noah’s ark) अनेक माणसांना व प्राण्यांना वाचवले. नोहचा वंशज अब्राहम. हा साधारण १६०० BCE मध्ये आपला कबिला घेऊन हरन् (South Turkey) येथून इजिप्त मध्ये गेला. पुढे २०० वर्षांनी, मोसेसने इस्रायीलींना इजिप्त मधील दास्यातून मुक्त करून, कनान मध्ये आणले.
“आता, कनान मध्ये राहणारे लोक (Canaanites), अनेक देवतांची पूजा करत असत. सूर्य, चंद्र, अग्नी देवता, पावसाची देवता, नृत्य देवता अशा अनेक देवतांची पूजा करत असत.
“मोसेस १० आज्ञा (10 Commandments) आणायला गेला असता, त्याच्या अनुयायांनी, तिथल्या प्रथेप्रमाणे सोन्याचे वासरू तयार करून त्याची पूजा केली. ‘निराकार’ देव मानणारा मोसेस जेंव्हा परत आला, तेंव्हा हा प्रकार पाहून तो अत्यंत संतापला. त्याने कनानी देवांची पूजा करण्यास सक्त मनाई केली. अर्थातच सूर्य पूजेवर बंदी आली. हिब्रू बायबल मध्ये – शमश या सूर्य देवतेची पूजा करणाऱ्याला दगडे मारून ठार मारण्याची शिक्षा सांगितली आहे.
“साधारण ९५० BCE दरम्यान, अब्राहमच्या वंशातील सोलोमन इस्राईलचा राजा झाला. सोलोमन याने जेरुसेलम मध्ये पहिले मंदिर उभे केले. सोलोमन मंदिर सूर्य मंदिरा प्रमाणे पूर्वाभिमुख होते.
“या सोलोमनने शिबाच्या राणीला (The Queen of Sheeba) बोलावणे पाठवले. शिबा प्रांत म्हणजे आजचा येमेन. तुम्ही कोणत्या देवांची पूजा करता असे त्याने राणीला विचारले असता, ती म्हणाली – आमच्या पूर्वजांनी शिकवल्या प्रमाणे आम्ही सूर्याची उपासना करतो. आमच्या अनेक देवतांमध्ये, सूर्य हा देवांचा राजा आहे. सूर्य हा आमचा निर्माता आहे. अंधाराचे निर्मुलन करणारा, भय निवारण करणारा देव असून, तो आमचा अन्नदाता आहे!
“शिबाच्या राणीने सोलोमन प्रभावित झाला. ज्यू धर्माच्या शिकवणीच्या विरुद्ध, सोलोमन शेवटच्या काळात, इतरही देवांना मानू लागला होता. या पापकृत्यासाठी त्याला LORD ने शाप दिला, असे बायबल सांगते.
“काळाच्या ओघात तग धरून राहिलेले शिबा मधील हे सूर्य मंदिराचे अवशेष -
“Unbelievable! तीन हजार वर्षांपूर्वीचे सूर्य मंदिर! आबा, सोलोमनच्या मंदिराचे पुढे काय झाले?”, सुमितने विचारले.
“५८६ BCE मध्ये, जेरुसलेमचे पहिले मंदिर बेबिलोनच्या हल्ल्यात उध्वस्त करण्यात आले. लवकरच ५३६ BCE मध्ये, पर्शियन राजा सायरसने दुसरे मंदिर बांधण्यासाठी निधी दिला. दुसरे मंदिर बांधले गेले. या मंदिराचा जीर्णोद्धार, येशूच्या जन्माच्या काही वर्ष आधी, २० BCE मध्ये हेरोड राजने केला. ७० CE मध्ये रोमन आक्रमणात हे मंदिर जमीनदोस्त झाले. तेंव्हा पासून ज्यू प्रार्थनेत त्या जागेवर तिसरे मंदिर व्हावे असे मागितले जाते! ७ व्या शतकात अरबांनी जेरुसलेम ताब्यात घेतल्यावर, त्या जागेवर डोम बांधला. Dome of the Rock. इस्लामच्या धारणे प्रमाणे, येथे प्रेषित मोहमदने प्रार्थना केली होती.
“ते असो. आपण आता आणखी एक सूर्य मंदिर पाहायला जोर्डनला जाऊ. त्याचे जुने नाव - नबाटीया (Nabataea). येथील लोक अनेक देवांची पूजा करत. यांच्या सूर्य देवतेचे नाव होते – दुशारा. देवाची मानवी मूर्ती स्थापन करण्यापेक्षा, हे काळ्या दगडाची (cube) स्थापना करत असत. हे राज्य रोमन राजांनी काबीज केल्यावर, इथल्या देवतांवर रोमन साज चढला. दुशारा देव Zeus व Helios मध्ये सामावला आणि इतर देवतांनाही मानवी रूप मिळाले.
“पेट्रा या गावात अनेक मंदिरे आहेत. अजंठा - वेरूळ प्रमाणे दगडात कोरलेली ही मंदिरे त्यांच्या भव्यतेने डोळ्याचे पारणे फेडतात! येथील ‘दुशारा’ ची मंदिरे पूर्वाभिमुख असून उत्तरायणाला सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात पोचतात!”, आबा म्हणाले.
Petra, Jordan
“सूर्य मंदिरा शिवाय आणखी कुठली मंदिरे होती अरेबिया मध्ये?”, सुमितने विचारले.
“अरेबिया मध्ये चंद्राची व ग्रहांची देखील मंदिरे देखील होती! पुढच्या भेटीत आपण इथली चंद्र मंदिरे पाहू!”, आबा म्हणाले.
*BCE - Before Current Era, CE – Current Era
-दिपाली पाटवदकर