पीरेड्स, पाळी या बाबत आता सगळ्यांनाच माहीत आहे. हे खरं तर कुणाच साठी नवीन नाही. खरं तर आपल्या समाजात हे अनेक नावंनी ओळखल्या जातं. पाळी, पीरेड्स, पीएमएस आणि बरंच काही. मात्र या बद्दल बोलल्या जात नाही. अजूनही पीरेड्स आपल्या सारख्या साध्या सुध्या घरांमध्ये 'टॅबू' च आहे. या बाबत बोलू नये, चर्चा करु नये, कधी करायचीच असेल तर घरातील आई, ताई, आजी, काकू, मामी यांच्याशीच करावी अशा अनेक सूचना लहानपणापासूनच आम्हा मुलींना दिल्या जातात. मात्र ज्या घरात केवळ आई, बाबा आणि तिची दोन मुलं (हो मुलं म्हणजे मुलंच, मुली नाहीत) असतील, तिथे त्या आईनं काय करावं? हा प्रश्न मला अनेकदा पडला आहे.
काल सहज फेसबुक बघत होते, आणि अचानक प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे हिची एक पोस्ट दिसली 'टॉक टू युवर बॉईज' म्हणून. आणि काही तरी इंटरेस्टिंग वाटलं म्हणून मी बघायला गेले. तिने लिहिलं होतं ते मना पासून पटलं मला. ती तिच्या पोस्ट मध्ये म्हणाली, 'अनेक वर्षांपूर्वी मी सॅनिटरी नॅपकिनची जाहीरात केली होती, तेव्हा प्रचंड संकोच होता मनात, कसं करायंच, कसं बोलायचं वगैरे. आजही आपल्या घरांमध्ये या बद्दल बोललं जात नाही. आणि घरात केवळ मुलंच असतील तिथे त्यांना बायोलॉजीच्या पुस्तकातून जी माहिती मिळेल तितकीच मिळाली तरीही त्या दिवसांमध्ये एका महिलेच्या शरीरात आणि मुख्य म्हणजे मनात, भावनांमध्ये काय बदल होतात, हे ते समजूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी या बद्दल बोलणं गरजेचं आहे.' तसंच तिने तिच्या स्वत:च्या मुलांसोबत एका शॉर्टफिल्मचं चित्रीकरण करत आपल्या मुलांशी बोला असा संदेश दिला आहे.
केवळ शरीरच नाही तर भावनांमध्ये घडणारे बदल ही समजून घेणं आवश्यक :
या दिवसांमध्ये ती मुलगी, महिला शरीरानं थकलेली असते. मात्र त्याहूनही जास्त त्रास होतो, तो हार्मोनल डिसबॅलेंस म्हणजेच शरीरातील विशिष्ट पदार्थांच्या प्रमाणात चढ उतार याचा. आणि त्यामुळे ती मुलगी किंवा महिला एखाद्या छोट्याशा गोष्टीवरुन रडते, चिडते, ओव्हर रिअॅक्ट करते. ज्या घरात महिलांची संख्या जास्त आहेत, तिथे हे समजता येवू शकतं मात्र आजच्या काळात जिथे राजा राणी आणि दोन मुलांचा संसार असेल, वरुन तिथे दोन्हीही मुलंच असतील तर या काळात तिला कुणीतरी समजून घ्यावं अशी तिची अपेक्षा असते. बरेचदा तसं होत नाही, मुलं ही चिडचिड करतात, नवरा ही समजून घेत नाही आणि भांडणं होतात. त्या मागचं मोठं कारण आहे 'टाळलेला संवाद'. या बाबत आपल्या मुलांशी खुलून संवाद साधला, त्यांना सांगितलं की तुमची पाळी सुरु आहे, म्हणून असं होत आहे, तर ते ही समजून घेतील. आणि इथून तिथून, नेट वरुन चुकीची माहिती मिळण्यापेक्षा आईनं सांगितलेलं कधीही बरंच की..
लहान मुलांना आईनंच सांगितलेलं बरं..
काही दिवसांपूर्वी आलेल्या पप्पू अॅण्ड पापा या वेब सीरीज मध्ये सुद्धा आई आपल्या ६-७ वर्षाच्या मुलाला सॅनिटरी नॅपकीन म्हणजे काय? ते का वापरतात हे समजवताना दिसली आहे. तसंच त्याच्या असंख्य प्रश्नांना म्हणजे 'ब्लीडींग का होतं, कसं होतं', ती उत्तरं देताना दिसली आहे. ते करणं आज महत्वाचं झालं आहे. कारण आज केवळ आई बाबा आणि मूल इतकाच परिवार जास्त दिसून येतो. मग त्यांना असे प्रश्न पडणारच. त्यातून आईची तब्येत बरी नाही असं अनेकदा बाबा आपल्या मुलाला सांगतो, पण मग त्याला जी काळजी वाटते तिच्या कडे कुणाचं लक्ष जात नाही, आईला काय झालं असेल, दर महीन्यात ती का आजारी पडते, तिला खूप त्रास तर होत नसेल ना? वगैरे प्रश्नांने त्या चिमुकल्याच्या डोक्याचा पार भुगा होत असतो.
मुलींना आया ६वी ७वीत असताना या बद्दल माहिती देतात. कारण त्यांची पाळी सुरु झाल्यास त्यांना या बाबत कल्पना हवी, त्या घाबरून जावू नयेत म्हणून. मात्र मुलांशी अशा पद्धतीचा संवाद खुलून कधीच होत नाही. पुढे हीच मुलं आपल्या बायकोच्या या काळातील 'इमोशनल' त्रासाला समजू शकत नाहीत आणि भांडणं होतात. तसंच याचे अनेक परिणाम ही समोर येतात.
एकूणच संवाद कमी :
हा विषय काही आजचा नाही? मात्र असे प्रश्न आज उद्भवले आहेत. त्याचं कारण म्हणजे एकूणच 'संवाद' हा कमी होताना दिसतो. मग जिथे संवादच नाही तिथे अशा विषयांवर संवाद कुठून येणार? या विषयावर कमालीची शांतता बाळगली जाते, मंदिरात जायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, देवाला शिवायचं नाही अशा अनेक पद्धतीच्या (चुकीच्या) प्रथा आजही पाळल्या जातात. मुलांना कळायला मार्गच नसतो की आई, किंवा ताई का शिवत नाहीये, देवघरात का जात नाहीये. या असंख्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मुलांशी संवाद साधणं आवश्यक आहे. माझ्या घरात आई बाबा आणि आमच्या मधला संवाद नेहमीच छान होता, त्यामुळे 'संवाद टाळण्याचा' कधी प्रश्नच आला नाही. मात्र अनेकदा साधे संवाद देखील टाळल्यामुळे अशा विषयांवर बोलता येत नाही.
संवाद साधतानाही सावधगिरी आवश्यकच :
संवाद साधणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते कुठल्या पद्धतीनं सांगतो हे ही महत्वाचं आहे. ११-१२ वर्षाची मुलं म्हणजे ५वी ६वी तील मुलांना या बद्दल अचानक कळलं तर ते आपल्या वर्गातील मुलींकडे कसे बघतील, त्यांना आणखी प्रश्न पडतील, कदाचित ते आपल्या मित्रांशी आणि मैत्रीणींशी देखील चर्चा करतील, त्यांची काय प्रतिक्रिया असेल? या सगळ्याचा विचार करणं पण आवश्यक आहे. आम्ही आजच्या मुली या बद्दल ओपनली बोलायला लाजत नाही, आणि आमचे मित्र ही आमच्याशी या विषयावर मोकळेपणानी बोलू शकतात. कारण थोडी मॅच्योरिटी आलेली असते. मात्र पाचवी सहावीच्या मुलांकडून तशी अपेक्षा नाही. त्यामुळे सावधगिरीसह संवाद साधला तर या विषयावरही बोलता येवू शकतंच की.
एकूण 'संवाद' त्यानंतर 'अशा' विषयांवर संवाद साधण्याची आता तुमची 'पाळी' आली आहे. सावधगिरीने संयमाने पण अत्यंत आवश्यक हा संवाद आता घरातील 'मुलांशी' ही साधावा अशी आवश्यकता निर्माण झाली आहे. पुढे कदाचित आणखी प्रश्न निर्माण होतील पण तूर्तास तरी 'संवाद' वाढवला तर अनेक प्रश्न सुटलीत असं दिसतं.
शुभम भवतु म्हणणारा आवाज कायमचा थांबला: जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!..