अवंती: मेधाकाकू अग ह्या सगळ्या म्हणी आणि वाकप्रचार ...कित्ती छान आहेत आणि त्या चार-सहा शब्दात कितीतरी अर्थ भरून राहिलाय ना... मला तर हे सगळं नव्यानेच समजतय... !!... तुला कुठे मिळाले हे पुस्तक... ?
मेधाकाकू: अवंती, मला ना तुझ्यासारखीच वाचनाची आवड माझ्या अगदी लहानपणापासून आहे... आणि ती आवड लागली ती माझ्या आई-बाबांच्यामुळे. ते एका मोठ्या ग्रंथालयाचे सभासद होते आणि तिथे एक बालविभागही होता. मी त्यांच्याबरोबर जायचा हट्ट करायचे कारण त्या बालविभागात लहान मुलांनी वाचायची खूप पुस्तके होती आणि ती मला वाचायला आवडायचे ....!!...
मेधाकाकू: तुला कुठे मिळाले हे पुस्तक... ? या तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाले तर त्याला माझी उत्सुकता आणि माझी मुलगी दीप्ती हे दोन्ही कारणीभूत आहे...!..दीप्तीमुळेच मी आंतरजाल म्हणजे इंटरनेटवर माझ्या आवडीची पुस्तके शोधायला शिकले आणि त्याच शोधकार्यात मला हे सव्वाशे वर्षांपूर्वी छापलेले पुस्तक गवसले.
अवंती: मेधाकाकू.... आपल्या घरात आपण म्हशी ठेवत नाही ... मग ही म्हण कशी आली असेल... ?
अगे अगे म्हशी मला का नेशी.
मेधाकाकू: असे बघ अवंती ... मूर्ख बहाणे करणार्या माणसाचे वर्णन करण्यासाठी जणू ही म्हण रचली गेली असावी. कारण असे बहाणे, कांगावखोरी करणार्या आणि आपल्या नियोजित कामात किंवा संसारात लक्ष न देणारी माणसे आपल्या समाजात असतातच.
एका कुटुंबातला एक गृहस्थ, “ मी तुला सोडून लांब निघून जाईन ” अश्या धमक्या विनाकारण आपल्या बायकोला नेहमी देत असे आणि त्याची बिचारी बायको गयावया करून नका जाऊ अशा विनवण्या करत असे. हे सगळे विनाकारण होतय हे समजणारा नवर्याचा एक मित्र बायकोला सल्ला देतो, “ एकदा तू हरकत नाही जा असे म्हणच, मग आपण बघूया तो काय करतो ते ”...!! नवर्याने धमकी दिल्यावर एक दिवस बायको म्हणते, “ खुशाल जा...!! माझी काsssही हरकत नाही ” ..!! आपण जिंकलो आणि सुटलो एकदाचे अशा समजुतीने नवरा तडक घराबाहेर पडतो. गावाबाहेर नदीकाठी आल्यावर त्याला आता काय करायचे असा प्रश्न पडतो कारण त्याच्याकडे कपडे नसतात आणि जेवणाची शिदोरीही नसते आणि आपला मूर्खपणा त्याच्या लक्षात येतो. आता परत घरी जायचे कारण शोधताना त्याला स्वत:हाची म्हैस नदीवर आलेली दिसते. म्हैस घरी जायला निघाल्यावर हे महाशय तिच्या मागोमाग निघतात आणि घराजवळ पोहोचल्यावर म्हशीनेच मला ओढत घरी आणले असा बहाणा करून मोठयाने ओरडतात .... ....... “अगे अगे म्हशी मला का नेशी ”.
अशा बहाणेबाज माणसांचा परिचय करून देणारी ही म्हण, अलीकडच्या काळात ‘ अग अग म्हशी मला कुठे नेशी ’ या पद्धतीने बर्याचवेळा वापरली जाते.
अवंती: अरेच्या असा अर्थ आहे का... ये सही है काकू .... फारच मजेशीर आहे ही म्हण..!!... अग पण आता ऊंट आलाय या म्हणीत आणि तो कानी बसतो म्हणजे काय असेल गं...? ......
ऊंट कोण्या कानी बसेल त्याचा नेम नाही.
मेधाकाकू: अवंती फार छान म्हण निवडलीस प्रश्न विचारायला. ऊंट या पाळीव प्राण्याला आपल्या संस्कृतीत फार महत्वाचे स्थान आहे बरे का..!! आणि गुजराथ-राजस्थान या राज्यात वाळवंटी प्रदेशात आजही ऊंट पाळले जातात कारण त्यांच्या पायांचे खूर वाळूत चालण्यासाठी योग्य असतात. समानाची ने आण किंवा नांगरणीसाठी सुद्धा ऊंटांचा वापर केला जातो त्या प्रदेशात. लांबचा प्रवास करून विश्रांतीसाठी थांबला की पाय मुडपून जमिनीवर बसण्याची आणि लोळण्याची ऊंटाला सवय असते. यालाच ऊंटाचे कानी बसणे असे म्हणतात... कानी बसणे म्हणजे डाव्या किंवा उजव्या कुशीवर लोळणे.
तर एके दिवशी आठवड्याच्या बाजाराला निघालेल्या ऊंटाच्या मालकाने ऊंटाच्या पाठीवर दोन्ही बाजूला बोजे ठेवले. एका बाजूला शेतकर्याचा हिरवागार भाजी-पाला तर दुसर्या बाजूला कुंभाराची मडकी. वाट चालताना मधेच ऊंट मान वळवून हिरवा भाजी-पाला खातोय हे कुंभाराच्या लक्षात आले आणि हसत हसत त्याने शेतकर्याची टिंगल करायला सुरुवात केली. वाटेत विश्रांतीसाठी थांबल्यावर ऊंट खाली बसला आणि कुंभाराची मडकी होती त्या कुशीवर कलंडला आणि सगळी मडकी फुटली. आता हसायची पाळी शेतकर्याची होती पण त्या भल्या माणसाने तसे काही केले नाही. या म्हणीचा मथितार्थ असा की दुसर्यावर आलेल्या संकटांना हसू नये कारण आपल्यावरही अचानक असे एखादे संकट येऊ शकते.
अवंती या अशा म्हणी आणि वाकप्रचारातून आपल्याला तत्कालीन समाजाच्या मानसिकतेचा परिचय होतो आणि हे लोकशिक्षणाचे उत्तम माध्यम आहे याची खात्री पटते.
-अरुण फडके