भटके विमुक्तांच्या कौशल्यांचा उपयोग करून घेणारे शिक्षण हवे
समरसता साहित्य संमेलनात अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांचे प्रतिपादन
अहमदनगर : भटक्या जाती म्हणून ओळखले जाणारे घटक हे समाजातील वंचित घटक नसून भारतीय ज्ञान व कला जगभरात पोचविणारे ते साधन आहेत. त्यांच्याकडे अफाट कौशल्ये आहेत आणि त्या कौशल्यांचा उपयोग करून घेणारे शिक्षण त्यांना द्यायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांशनी शनिवारी केले.
येथील कै. भीमराव गस्ती साहित्यनगरी (राणावकर शाळा) येथे समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १८व्या समरसता साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री. प्रभुणे बोलत होते. यावेळी मावळते अध्यक्ष व विचारवंत लेखक रमेश पतंगे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे प्रभुणे यांच्याकडे सोपविली. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष व उद्योजक डॉ. सुरेश हावरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. अशोक गांधी, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. श्यामा घोणसे, संमेलनाचे निमंत्रक प्रा. संजय साळवे हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ ही या संमेलनाची संकल्पना आहे. शनिवारी सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनाचा प्रारंभ झाला. दोन दिवसांच्या या संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्रे प्रकाशित होणार आहेत. तसेच उद्घाटनाच्या सत्रात १६व्या व १७व्या समरसता साहित्य संमेलनातील प्रबंधांवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री. प्रभुणे म्हणाले, “भटक्या विमुक्तांमध्ये काम करण्यास सुरूवात केली तेव्हा मला काहीही माहीत नव्हते. हळूहळू शिकत गेलो आणि एका-एका प्रसंगातून पालावरचे जीवन उलगडत गेले. मग लक्षात आले, की या लोकांना देशच नाही. काही वेळेला वाटायचे, की हे काय जीवन आहे का? मात्र नंतर लक्षात आले, की भटक्या लोकांच्या जगण्यात भारताचा इतिहास आहे.”
लमाण या शब्दाचा अर्थ मालाची ने-आण करणारा, असा असल्याचे सांगून ते म्हणाले, “भटक्या लोकांच्या जगण्यात भारताचा सगळा इतिहास दडला आहे. या लोकांकडे आजही अपार मौखिक साहित्य आहे. मात्र प्रत्येक जाती-जमातीचा इतिहास अखेरच्या घटका मोजत आहे. पूर्वी शेतकरी जगला की बाकीचे लोक जगत असत. शेतकरी व भटक्यांचे नाते मौखिक साहित्यातून दिसून येते. जेवढे श्रम करणारे लोक होते त्या सर्वांकडून सर्वोत्तम साहित्य निर्माण झाले. संपूर्ण भारतातील भटक्या जमातींच्या जीवनातून समृद्धतेचे दर्शन होते. याच समृद्धतेतून अजिंठा-वेरूळसारख्या कलाकृती घडल्या. साहित्य व कला हेच लोक जगत होते व त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना वंचित म्हणावे का, असा प्रश्न पडतो.”
साहित्याची निर्मिती करताना इतिहासाची पावले शोधली पाहिजेत. भटक्यांची कौशल्ये आजच्या काळातही उपयोगी आहेत. साहित्याची निर्मिती उपाशीपोटी होत नाही. त्यांचे उत्थान करायचे असेल, तर या कौशल्याचा व कलेचा वापर होईल, असे शिक्षण द्यायला हवे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना पतंगे म्हणाले, “समरसतेचा आज अनेक जण अभ्यास करत आहेत. हा आपल्या विचारधारेच्या विजयाचा एक टप्पा आहे. साहित्याच्या क्षेत्रात साहित्याच्या प्रयोजनावर सातत्याने चर्चा चालू असते. ज्याच्यामुळे मनाचे उन्नयन होईल, ते सरस साहित्य. साहित्यिकाला जीवनानुभव सूचक रीतीने मांडावे लागतात.”
भटक्या विमुक्तांनी लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख करून श्री. हावरे म्हणाले, “ही पुस्तके वाचल्यानंतर राग येतो, चीड येते. आपला देश खरोखर स्वतंत्र झाला का, असा प्रश्न पडतो. समरसता हे आपण मूल्य म्हणून स्वीकारले आहे. मात्र समाजाची जडणघडण आर्थिक आधारावर होते. सामाजिक सुधारणांना अर्थव्यवस्थेमुळे चालना मिळते. आता भटके विमुक्त उद्योजक परिषद स्थापन करण्याची वेळ आली आहे जेणेकरून या घटकांना स्वतःचे उद्योग स्थापता येतील.”