
सध्या काँग्रेस पक्षामध्ये एकूणच 'बालिश बहु मीडियात बडबडला' अश्या वाचाळ नेत्यांचा सुकाळ आहे. अर्थात ज्या पक्षाच्या प्रमुख नेतेपदी राहुल गांधी असतील, त्या पक्षाच्या इतर नेत्यांकडून तरी परिपक्वतेची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे म्हणा? दोन दिवसांपूर्वी 'मोदी खरे हिंदू नाहीत, राहुल गांधी हेच खरे हिंदू आहेत' असे अकलेचे तारे तोडणाऱ्या कपिल सिब्बल ह्यांनी सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील म्हणून रामजन्मभूमी खटल्यात बाजू मांडताना 'ह्या प्रकरणाचा निर्णय जुलै २०१९ नंतरच कोर्टाने द्यावा' अशी मागणी केली होती. नेमकी जुलै २०१९ ही तारीख सिब्बलनी का निवडली हे तर भारतातलं एखादं शेम्बडं पोर देखील सांगू शकेल, कारण २०१९ मध्ये ह्यापुढच्या सार्वत्रिक निवडणूका आहेत. सिब्बल ह्यांच्या ह्या वक्तव्यानंतर सारवासारव करताना काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुरजेवाला ह्यांनी म्हटलं की 'ते सिब्बल ह्यांचे वकील म्हणून वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही', पण सुन्नी वक्फ बोर्डाचे असे म्हणणे आहे की, त्यांनी सिब्बल ह्यांना 'निर्णय पुढे ढकला' अशी भूमिका घ्यायला सांगितलेच नव्हते. त्यांनाही रामजन्मभूमी प्रकरणाचा शक्य तितक्या लवकर निकाल लागलेलाच हवा आहे. म्हणजे सिब्बल ह्यांनी कोर्टात मांडली ती भूमिका नक्की कुणाच्या सांगण्यावरून मांडली होती? जर काँग्रेस पक्षाचा सिब्बल ह्यांच्या भूमिकेशी काही संबंध नाही तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी एक पत्रकार परिषद भरवून तसे स्पष्ट का सांगत नाहीत?
सिब्बल ह्यांच्या मुक्ताफळांनंतर गुजरातमध्ये निवडणूका ऐन तोंडावर आलेल्या असताना काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि स्वतःला सोनिया गांधींचे निकटवर्तीय म्हणवून घेणारे मणिशंकर अय्यर ह्यांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करत 'नरेंद्र मोदी एकदम नीच आणि घाणेरडी राजनीती करणारा असभ्य माणूस आहे' असे म्हटले होते. पंतप्रधान मोदींनी साहजिकच आपल्या गुजरातमधल्या प्रचारसभेतून ह्या वक्तव्याचा सडेतोड समाचार घेतला. पंतप्रधानपदावर असलेल्या, लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या व्यक्तीवर अश्या भाषेत टीका केल्यामुळे साहजिकच मणिशंकर अय्यर ह्यांच्याविरुद्ध मीडियामध्ये भरपूर टीका झाली. हे प्रकरण अंगाशी येत आहे हे जाणवताच खुद्द राहुल गांधींनी एका ट्विटमधून मणिशंकर अय्यर ह्यांना माफी मागण्याचा आदेश दिला. पण सरळ माफी मागितली तर ते मणिशंकर अय्यर कसले? त्यांनी बराच शब्दच्छल करत 'मी हिंदी भाषक नाही, त्यामुळे मी नीच हा शब्द मोदींच्या जातीला उद्देशून वापरला नव्हता आणि मी 'फ्रिलान्स काँग्रेस कार्यकर्ता' असल्यामुळे राहुल गांधी ह्यांचा आदेश पाळण्याचा प्रश्नच येत नाही.' असे वर ऐकवले. त्यानंतर काल संध्याकाळी उशिरा काँग्रेस पक्षाने अय्यर ह्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले.
मणिशंकर अय्यर ह्यांच्यावर ही तोंडदेखली कारवाई करून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी टाळू शकत नाही. 'नीच' ह्या शब्दाचा वापर ह्याआधी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची मुलगी प्रियांका गांधी ह्यांनीही नरेंद्र मोदींच्या बाबतीत केला होता. तळागाळातून वर येणाऱ्या नेत्यांना काँग्रेस पक्षात कधीही मान मिळत नाही. काँग्रेस पक्षाची सरंजामशाही मानसिकता अश्या वक्तव्यांमधून वेळोवेळी दिसत आलेली आहे. नरेंद्र मोदी ह्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांचा विशेष राग आहे कारण मोदी 'आऊटसाईडर' आहेत. कुठल्याही बड्या राजकीय धेंडांचा वरदहस्त त्यांच्यावर नव्हता. ते कुठल्याही राजकारणी कुटुंबातून आलेले नाहीत की त्यांचे दिल्लीतल्या दरबारी वर्तुळामध्ये कुणी बडे पाठीराखेही नाहीत. त्यात ते मागासवर्गीय आहेत. राहुल गांधी ह्यांच्यासारखे नरेंद्र मोदी तथाकथित 'जनेयू-धारी हिंदू' नाहीत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोदींसाठी कायमचा शेलक्या शब्दांचा वापर केलेला आहे. ह्याच मणीशंकर अय्यर ह्यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी म्हटले होते की 'मोदी ह्या जन्मात भारताचे पंतप्रधान होणार नाहीत. फारतर त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात तंबूबाहेर चहा विकावा'. त्याआधी मणिशंकर अय्यर ह्यांनी मोदींना उद्देशून 'साप आणि विंचू' हे ही शब्द वापरले होते. तसे हे अय्यर आपल्या शिवराळ भाषेसाठी प्रसिद्ध आहेतच. मागे एकदा दारूच्या नशेत त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंग ह्यांच्या अंगावर हात उगारला होता आणि वर म्हटले होते की 'तुमचा नेता मुलायम सिंग माझ्यासारखा दिसतो. माझा बाप कधी लखनौला गेला होता का हे विचारा मुलायम सिंग ह्यांना'. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता ह्यांनी एका मंदिराला मागे एक हत्ती भेट दिला होता तेव्हा ह्याच मणीशंकरांनी 'हत्ती कशाला दिला? स्वतःच जायचं होतं की जयललितांनी मंदिरात. हत्ती आणि त्यांच्यात काय फरक आहे?' असे असभ्य विधान केले होते. त्या विधानाने खवळून अण्णाद्रमुक पक्षाचे कार्यकर्ते मणिशंकर अय्यर ह्यांना मारायला निघाले होते तेव्हा ह्या महाशयांनी तामिळनाडू मधून सपशेल पळ काढला होता. हेच मणिशंकर अय्यर जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठात शिकत होते तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते आणि भारत-चीन युद्धाच्या वेळी त्यांनी चिनी सैनिकांसाठी फंड गोळा केला होता! हेच मणिशंकर अय्यर २०१५ मध्ये पाकिस्तान मध्ये जाऊन तिथल्या मीडियापाशी 'इन्हे (भाजप) हटाइये, हमें (काँग्रेस) लाईये' म्हणून तोंड वेंगाडत होते. हेच शिवराळ, असभ्य मणिशंकर अय्यर जाहीरपणे जिथेतिथे सांगत असतात की 'राजीव गांधी आणि सोनिया गांधी ह्यांची भाषणे मीच लिहायचो'. त्यांच्यावर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबनाची तोंडदेखली कारवाई करून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी टाळू शकत नाही.
राहुल गांधी आपल्या ट्विटमधून मारे म्हणतात की 'काँग्रेस पक्ष शिवराळ भाषेचे समर्थन करीत नाही', पण ह्याआधी त्यांनी किती काँग्रेस नेत्यांना मोदींच्या बद्दल असभ्य भाषा वापरल्याबद्दल माफी मागायला लावली होती? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि माजी मंत्री मनीष तिवारी ह्यांनी मोदींना उद्देश्यून 'चु' ह्या अक्षराने सुरु होणारी हिंदी भाषेतली अत्यंत घाणेरडी शिवी वापरली होती. नंतर गदारोळ झाल्यावर त्यांनी माफी तर मागितली नाहीच, वर हा शब्द हिंदीत 'मूर्ख' ह्या अर्थाने वापरला जातो असे लंगडे समर्थन दिले. ज्या गुजरात मध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे तिथल्या अर्जुन मोडवाडीया ह्या काँग्रेसच्या नेत्याने 'नरेंद्र मोदी हे रेबीज झालेले माकड आहे' असे उद्गार गेल्या निवडणूकीच्या वेळी एका प्रचार सभेत काढले होते आणि त्याबद्दल त्यांना निवडणूक आयोगाने खडसावलेही होते. काँग्रेस पक्षाने गुजरातचे प्रभारी नेमलेले बी के हरिप्रसाद ह्यांनी नरेंद्र मोदी ह्यांनी उद्देशून 'गंदी नाली का कीडा' असा असभ्य शब्दप्रयोग केला होता. काँग्रेस नेते रिझवान उस्मानी ह्या माणसाने तर 'मोदी ह्यांचा बाप कोण आहे' असा प्रश्न भर सभेत विचारण्याचे धाडस केले होते, तर काँग्रेसचे कर्नाटकातले नेते रोशन बेग ह्यांनी मोदींना उद्देशून एका जाहीर सभेत 'सन ऑफ अ बि*' ही शिवी दिली होती. ह्यापैकी कुठल्याही काँग्रेस नेत्याने असली भाषा वापरल्याबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही, माफी वगैरे मागणे तर दूरच राहिले.
खुद्द राहुल गांधी ह्यांच्या मातोश्री, आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी ह्यांनी नरेंद्र मोदी ह्यांना 'मौत के सौदागर' म्हटले होते तर राहुल गांधी ह्यांनी पाकिस्तान वर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्स विरोधात बोलताना मोदी 'खून की दलाली' करतात असा एखाद्या बी ग्रेड हिंदी सिनेमात शोभेल असा आरोप केला होता. 'भस्मासूर, रावण, पिसाळलेला कुत्रा, खेळ करून दाखवणारे माकड' ही सगळी शेलकी विशेषणे काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या संदर्भात वापरलेली आहेत आणि आजवर कुणीही माफी मागितलेली नाही. अर्थातच काँग्रेस नेत्यांनी वापरलेली असली बालिश, शिवराळ आणि असभ्य भाषा नरेंद्र मोदी ह्यांच्या पथ्यावरच पडलेली आहे. काँग्रेसचे हे 'बालिश बहू' वाचाळवीर म्हणजे नरेंद्र मोदींचे सगळ्यात मोठे छुपे शस्त्र आहे. हे जोपर्यंत काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी ह्यांना उमगत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी ह्यांचा वारू डौलात दौडतच राहणार!
- शेफाली वैद्य