दुर्गा हृदा तां भजे|
कुद्धौ शान्तियुतौ कृतौ
हरिहरौ कृत्वाऽधिहस्ते यया।।
शांतायै च नमो नमो नहि परं
यस्या ममाऽलंबनम|
शांताया खलु किकरोऽस्मि
रमतां तत्पादयोर्मे मना।।
पर्यटनासाठी जसे गोवा प्रसिद्ध आहे, तसेच पुरातन मंदिरांसाठीही गोवा प्रामुख्याने ओळखले जाते. असेच गोमांतकांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्य जाणार्या देवी श्री शांतादुर्गेचे मंदिरही फार प्रसिद्ध आहे. शांतादुर्गा देवीचे मूळ मंदिर केळोशी या गावी वसलेले होते. मात्र, गोव्यात झालेल्या पोर्तुगिजांच्या शिरकावानंतर त्यांनी हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात सुरुवात केली. म्हणूनच १५६४ साली पोर्तुगिजांपासून संरक्षण करण्यासाठी श्री शांतादुर्गा देवीचे मूळ मंदिर स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर १७३० साली गोव्यातील कवळे या गावी शांतादुर्गा देवीच्या नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. श्री शांतादुर्गा देवी म्हणजेच आदिमाया देवी दुर्गेचेच एक रूप. तिच्या शांतादुर्गा या नावामागे एक कथा प्रचलित आहे. एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णु यांच्यामध्ये एक भयानक युद्ध झाले. त्यावेळी त्यांच्यातील हे युद्ध थांबविण्यासाठी ब्रह्मदेवांनी आदिमाया दुर्गादेवीकडे प्रार्थना केली. तेव्हा देवीने भगवान शीव आणि भगवान विष्णू यांच्यातील युद्ध संपवून सलोखा आणला आणि विश्वात शांतता प्रस्थापित झाली. देवी आदिमायेच्या याच रूपाला शांतादुर्गा म्हणून ओळखले जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या श्री शांतादुर्गा देवीच्या सुबक मूर्तीला चार बाजूंनी असलेले चार हात आणि त्याच ठिकाणी असलेल्या भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या छोट्या छोट्या आकाराच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. देवी श्री शांतादुर्गेची पूजा करताना भगवान शिव यांचीदेखील पूजा केली जाते. देवीची मूर्ती असलेल्या गर्भगृहात एका काळ्या दगडातून कोरलेले शिवलिंगदेखील ठेवण्यात आले आहे. देवीचा अभिषेक करताना दोन्ही देवतांना अभिषेक करण्याची प्रथा या ठिकाणी प्रचलित आहे.
इ.स. १८९८ साली मंदिरात असलेली शांतादुर्गा देवीची मूळ मूर्ती पठाणांकडून चोरण्यात आली होती. त्यानंतर लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे यांनी शांतादुर्गा देवीची नवी मूर्ती घडवली आणि फाल्गुन शुक्ल दशमी, शके १८२३ म्हणजेच १९ मार्च १९०२ साली देवीच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हीच देवीची मूर्ती आजही आपल्याला या शांतादुर्गा देवस्थानात पाहायला मिळते. नव्या मूर्तीची स्थापना केल्यापासून श्री शांतादुर्गा आणि श्री भवानीशंकर यांच्या मूर्त्यांची उपासना कवळे मठाच्या श्री गौडपादाचार्यांद्वारे केली जाते. तसेच देवीचे सर्व उत्सव आणि दैनंदिन पूजादेखील या ठिकाणी करण्यात येतात. सतत होणार्या अभिषेकामुळे या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाची काही ठिकाणी झीज होऊ लागली होती. त्यामुळे देवीचा प्रसाद कौल घेतल्यानंतर शिल्पकार रामचंद्र सुंदर यांना नवे शिवलिंग घडविण्यास सांगण्यात आले. २७ नोव्हेंबर १९६५ साली म्हणजेच मागशीर्ष शुक्ल पंचमी १८८७ रोजी वेद आणि मंत्रांच्या उच्चारात नव्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सूर्याची किरणे आणि देवीची मूर्ती : श्री शांतादुर्गा देवीच्या या पुरातन मंदिरात आरतीच्या वेळी देवीच्या चेहर्यावर सूर्याची किरणे पाडली जातात. त्यावेळी देवीचं रूप पाहण्यासाठी अक्षरश: भाविकांची गर्दी होते. यासाठी मंदिराच्या पायर्यांच्या बाजूला आरसा ठेवला जातो आणि सूर्याची किरणे देवीच्या चेहर्यावर परावर्तित केली जातात. जवळपास १०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरून ही सूर्यकिरणे देवीच्या चेहर्यापर्यंत परावर्तित होणे, ही एक अनोखीच बाब म्हणावी लागेल. सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीवर पडल्यानंतर देवीची मूर्तीच अधिक मनमोहक वाटू लागते. या ठिकाणी देवीदेवतांप्रमाणेच मूळपुरुषालाही मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात येते. शांतादुर्गा मंदिराच्या शेजारीच कौशिक गोत्राचे मूळपुरुष लोमशर्मा यांचे एक मंदिर उभारण्यात आले आहे.
- जयदीप दाभोळकर