भारतातली जुनी दगडी बांधणीची मंदिरे बघायला मला खूप आवडतं. कुठलीही आधुनिक यंत्रसामग्री हाताशी नसताना, केवळ छन्नी-हातोड्याच्या सहाय्याने भारतीय मूर्तिकारांनी, स्थापत्यतज्ञांनी दगडाला बोलतं केलं. अनुपमेय अशी शिल्पं घडवली. एका अखंड कातळातून तीन मजली मंदिर कोरून काढण्याइतकी ह्या अनाम कलाकारांची प्रतिभा, कल्पनाशक्ती उत्तुंग होती. आजही अगदी सातशे-आठशे वर्षांनंतर, उन्हा-पावसाचे, काळाचे, धर्मांध मुसलमानी आक्रमकांचे घाव सोसून ही मंदिरे तशीच ताठ उभी आहेत. विशेषतः दक्षिण भारतातली मंदिरे तर खूपच सुंदर आणि भव्य-दिव्य अशी आहेत. पांड्यांची मदुराई, चोल राजांनी बांधलेले तंजावूरचे पेरिय कोविल म्हणजे मोठे देऊळ, चालुक्यांची वातापी, काकतीय राजांनी उभी केलेली वारंगलची मंदिरे, विजयनगर साम्राज्याची अदभूत राजधानी हंपी. किती म्हणून नावे घ्यावीत?
ह्याच दक्षिणी हिंदू राजांच्या प्रभावळीतले एक उज्ज्वल नाव म्हणजे कर्नाटकातले होयसळ साम्राज्य. कावेरीच्या समृद्ध खोऱ्यातल्या ह्या होयसळ राजांनी कर्नाटकावर अकराव्या ते चौदाव्या शतकादरम्यान जवळजवळ साडेतीनशे वर्षे राज्य केले. ह्या काळात त्यांनी शेकडो मंदिरे बांधली, त्यातली ९२ मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. होयसळ स्थापत्य म्हटलं की, बेलूर आणि हळेबिडू ही दोन नावे सर्वप्रथम आपल्याला ऐकायला मिळतात. बेलूर ही होयसळ साम्राज्याचे पहिली राजधानी. तिथले चेन्नकेशव मंदिर आजही उपासनेत आहे. बेलूरला पाणी कमी पडायला लागलं म्हणून राजा विष्णूवर्धन ह्या होयसळ राजाने आपली राजधानी जवळच्याच हळेबिडू इथे हलवली. तिथे त्याने एक प्रचंड सरोवर बांधलं, त्याचा व्यास इतका प्रचंड होता की ते सरोवर लोकांना समुद्रासारखं भव्य वाटायचं. त्यामुळे हळेबिडूचं प्राचीन नाव होतं द्वारसमुद्र.
पुढे तेराव्या शतकात दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने आपलं सैन्य मलिक कफूरच्या अधिपत्याखाली दक्षिणेत पाठवलं. तेव्हा हिंदूदवेषाने आंधळ्या झालेल्या मलिक कफूरने द्वारसमुद्र पूर्णपणे उध्वस्त केलं आणि ते नगर आपली ओळखच विसरलं. समुद्राचं द्वार म्हणून ओळखली जाणारी होयसळांची भव्य नगरी झाली हळेबीडू, म्हणजे कन्नडमध्ये 'उध्वस्त शहर', आणि अजूनही आपण त्याच अपमानास्पद नावाने आज त्या शहराला ओळखतो. हळेबिडूमध्ये आज होयसळेश्वराचं भग्न मंदिर आणि काही जैन बसादी असे तुरळक अवशेष सोडले तर पूर्वीच्या दिगंत कीर्तीच्या खुणा सांगणारं फार काही उरलं नाहीये.
बेलूर-हळेबिडूची मंदिरे विख्यात आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक ह्या दोन मंदिरांना भेट देतात पण ह्याच होयसळ शिल्प परंपरेतलं एक खूप सुंदर मंदिर म्हैसूरजवळ सोमनाथपुरा येथे आहे. बेलूर-हळेबिडूच्या मंदिरांच्या तुलनेने हे मंदिर बरंच उपेक्षित आहे. कन्नडमध्ये अशी म्हण आहे की बेलूरचं चेन्नकेशव मंदिर आतून बघावं, हळेबीडूचं होयसळेश्वर मंदिर बाहेरून बघावं आणि सोमनाथपूरचं मंदिर मात्र आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी बघावं इतकं ते सुरेख आहे.
हे मंदिर होयसळ राजा नरसिंहराज तिसरा ह्याच्या कारकिर्दीत सोमनाथ दंडनायक नावाच्या त्याच्या सेनापतीने १२६८ मध्ये बांधवून घेतलं अश्या अर्थाचा एक प्रचंड शिलालेख मंदिराच्या भव्य प्राकारात ठेवलेला आहे. हा शिलालेख संस्कृत आणि अभिजात कन्नड अश्या दोन्ही भाषांमध्ये आहे. सोमनाथपुराच्या मंदीराचं पहिलं दर्शन होताच आपल्या मनात पहिल्यांदा ठसते ती ह्या मंदिराची प्रमाणबद्धता! इतका प्रचंड आकार आणि दर्शनी भागात दिसणारी शिल्पांची रेलचेल असूनसुद्धा मंदिर कुठेच डोळ्यांवर आघात करत नाही. होयसळ मंदिरांची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे होयसळ मंदिरांची जगती म्हणजे जोतं नक्षत्राकार असतं, आणि प्रदक्षिणापथ मंदिराच्या बाहेर असतो. एका मंदिरात एकाहून अनेक शिखरं आणि गर्भगृहं असू शकतात पण नृत्यमंडप मात्र सहसा एकच असतो व तो लेथवर फिरवून गोल गुळगुळीत केलेल्या अनेक खांबांनी तोलून धरलेला असतो. मंदिराच्या शिखरांच्या संख्येवरून मंदिराची ओळख ठरते. एकच शिखर आणि एक गर्भगृह असेल तर ते एककूट मंदिर, दोन शिखरं असतील तर ते द्वीकूट, तीन असतील तर त्रिकूट, चार असतील तर चतुष्कूट आणि पाच असतील तर ते पंचकूट मंदिर असं संबोधलं जातं. सोमनाथपुराच्या मंदिराला तीन शिखरं असल्यामुळे हे त्रिकूट मंदिर आहे.
ह्या मंदिराच्या दर्शनी भागावर उत्कृष्ट शिल्पांची नुसती रेलचेल आहे. त्यातलं हे नृत्यलक्ष्मीचं सुंदर शिल्प मला खूप आवडतं. मुळात श्रीलक्ष्मीची लक्ष्मी-नारायण किंवा गजलक्ष्मी ह्या स्वरूपात अंकन केलेली शिल्पे खूप ठिकाणी आढळतात, पण नृत्यमग्न लक्ष्मी त्यामानाने दुर्मिळ. मुळातले सहा हात असलेली ही मूर्ती अतिशय सुडौल आणि सुभग अशी आहे. मूर्तीचा एक हात भग्न झालेला आहे, पण उरलेल्या पाच हातांची ठेवण दृष्ट लागावी इतकी सुंदर आहे. एक हात नृत्यमुद्रेत आहे, त्या हाताच्या बोटांचा आणि बोटातल्या अंगठ्यांचा डौल बघतच रहावा. बाकीच्या तीन हातात शंख, चक्र आणि पदम ही श्रीविष्णूची लांछने आहेत. एका हातात मक्यासारखे दिसणारे धान्याचे कणीस आहे. लक्ष्मी ही भरभराटीची, ऐश्वर्याची देवता, म्हणून तिच्या हातात हे कणीस असावे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते हे कणीस मक्याचेच आहे आणि तेराव्या शतकात देखील आपल्याकडे मक्याची लागवड होत होती ह्याचा तो भक्कम पुरावा आहे. मूर्तीच्या पोटऱ्यांचा घाट, पायातले अलंकार, कटिवस्त्राचा घोळ सगळेच इतके जिवंत उतरले आहे की बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटावे.
आपल्याकडे सामान्यतः शिल्पकार आपली नावे कुठे मागे ठेवीत नाहीत. 'इदं न मम' ह्या भावनेनेच भारतात मंदिर शिल्पे घडवली जात असत पण सोमनाथपूरच्या ह्या मंदिरात मात्र शिल्पकारांनी आपली नावे शिल्पांखाली लिहून ठेवली आहेत. महान शिल्पी मलितम्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांचं हे थोर कसब पाहायला तरी सोमनाथपूरला जायलाच हवं.
- शेफाली वैद्य