सुमित घरात आला तेच प्रश्न घेऊन, “आबा, प्रजापती = संवत्सर = वर्ष = यज्ञ हे तुम्ही मागच्या वेळी सांगितले. तर प्रजापती म्हणजे कोण? या देवाची प्रजा कोण? आणि तो कुणाचा नेता आहे?”
“अरे, आधी घरात तर ये!”, सुमितची उत्सुकता जाणून आबा म्हणाले, “ते सांगायचे, म्हणजे आधी प्रजापतीची गोष्ट सांगायला हवी!”, आबा म्हणाले.
“Yes! आबा, सांगा!”, पोटाशी उशी धरून सुमित गोष्ट ऐकायच्या तयारीत बसला.
“वेद आणि पुराणे यांमधून असे दिसते, की प्रजापती हा गणांचा शासक होता. मुख्य किंवा मुखिया होता. प्रजापतीला विश्वेदेव सुद्धा म्हटले आहे. ‘प्रजापती’ ही एकच व्यक्ती नसून, एक प्रकारची पद्वी असावी. कश्यप, वसिष्ठ, अगस्त्य, मनू, दक्ष यांना प्रजापती म्हटले गेले. या पैकी तुला दक्ष प्रजापतीची गोष्ट सांगतो.
“प्राचीन काळी दक्ष नावाचा एक राजा होता. त्याला अनेक मुली होत्या. यापैकी १३ मुली - अदिती, दिती, दनु, क्रोधा, विनता, इत्यादींचे लग्न त्याने कश्यप ऋषींशी लावले. पुढे अदितीची मुले ‘आदित्य’ म्हणून प्रसिद्धीस आली. दितीची मुले ‘दैत्य’, दनुची मुले ‘दानव’ म्हणून प्रसिद्धीस आली. आणखी कोणी ‘गंधर्व’, ‘अप्सरा’, ‘नाग’, आदि नावांनी ओळखली जाऊ लागली.
“प्रजोत्पत्ती करणारा तो प्रजापती, या प्रमाणाने, ही सर्व मंडळी दक्ष प्रजापतीची प्रजा होती. कालांतराने या प्रजेत २ मोठे गट तयार झाले – देव आणि असुर. या दोन गटांमधील संघर्ष अनेक कथांमधून डोकावतो. जसे समुद्रमंथनाच्या गोष्टीतून. तुला ती गोष्ट माहीत आहे ना?”, आबा सुमितला विचारले.
“हो माहीत आहे ना! अमृत मिळवण्यासाठी देव आणि असुरांनी एकदा समुद्राचे मंथन करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकी नागाची दोरी. घुसळण्यासाठी पर्वत क्षीरसागरात ठेवला, पण समुद्राची खोली जास्त असल्याने पर्वत त्यामध्ये बुडायला लागला. तेंव्हा विष्णूने कूर्मरूप धारण केले, आणि पर्वत आपल्या पाठीवर घेतला. मग असुरांनी वासुकीच्या फण्याची बाजू धरली. आणि देवांनी शेपटीची बाजू धरली. दोन्ही बाजूच्या मंडळींनी मंथन करण्यास सुरवात केली. एकदा असुरांनी दोरी आपल्याकडे ओढायची, एकदा देवांनी आपल्याकडे ओढायची.
“या मंथनातून हलाहल विष आले, जे शंकराने आपल्या कंठात धारण केले. त्या नंतर पारिजातक, कल्पवृक्ष, ऐरावत, उच्चैश्रवा, कामधेनु असे दिव्य वृक्ष व प्राणी आले. धन्वंतरी, लक्ष्मी व चंद्र हे पण समुद्रातून उत्पन्न झाले. सगळ्यात शेवटी ज्यासाठी मंथन सुरु केले, ते अमृत प्रकटले! ते कसे वाटायचे यावरून देव आणि असुरांमध्ये भरपूर वाद झाले. त्यावेळी, विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन असुरांना भुलवले आणि फक्त देवांना अमृत वाटले!”, सुमितने समुद्र मंथनाची गोष्ट सांगितली.
“भले सुमित! छान! आता सांग बरे, प्रजापतीची प्रजा कोण?”, आबांनी प्रश्न विचारला.
“अर्थातच देव आणि असुर!”, सुमित म्हणाला.
“सुमित, ही कथा मनोरंजनासाठी छानच आहे. पण ती एक रूपक आहे. Astronomy च्या संकल्पना सोप्या करून सांगायची एक पद्धत. या कथे मधून उत्तरायण व दक्षिणायन स्पष्ट करून सांगितले आहे, कसे ते बघ - यामध्ये क्षीरसागर म्हणजे Milky Way, आपली आकाशगंगा! तर मंदार पर्वत म्हणजे Equinox, संपात बिंदू! वासुकीचा दोर असुरांच्या बाजूला ओढला, की दक्षिणायान. यावेळी सूर्य नदी ओलांडून दक्षिणेला गेलेला असे. हे झाले थंडीचे दिवस. आणि वासुकीचा दोर देवांच्या बाजूला ओढला की उत्तरायण. उन्हाचे दिवस. असुरांच्या ओळीत, सर्वात शेवटचा असुर म्हणजे वर्षातली सर्वात मोठी रात्र. देवांच्या ओळीत, सर्वात शेवटचा देव म्हणजे वर्षातला सर्वात मोठा दिवस. तर मंदार पर्वत म्हणजे सम दिवस व रात्र असलेले वर्षातील दोन दिवस.”, आबा म्हणाले.
“ओह! या मंथना मध्ये आलटून पालटून एकदा देवांची सरशी होणार आणि एकदा असुरांची. उत्तरायणानंतर दक्षिणायन आणि दक्षिणायनानंतर उत्तरायण अविरतपणे चालू राहते तसे, संपूर्ण वर्ष म्हणजे देव आणि असुरांची रस्सीखेच!”, सुमित म्हणाला.
“बरोबर! आता सांग बरे, प्रजापतीची प्रजा कोण?”, आबांनी प्रश्न विचारला.
“देव आणि असुर तर वर्षाचे उन्हाळ्याचे आणि थंडीचे दिवस आहेत. आणि प्रजापती म्हणजे वर्ष. अर्थातच वर्षाचे ३६५ दिवस ही त्याची प्रजा!”, सुमितने निष्कर्ष काढला.
“Perfect! भरपूर प्रकाश देणारे, उब देणारे, शक्ती देणारे, अमृत देणारे, उत्तरायणातील दिवस – हे देव. यालाच वेदात देवलोक किंवा देवयान म्हणले आहे. आणि कमी प्रकाश असलेले, उदासपणा देणारे, थंडीचे दिवस, म्हणजे असुर. याला वेदात पितृलोक, किंवा पितृयान.
“यज्ञसत्र हे एक जिवंत ‘कॅलेंडर’ असल्याने, ते दिवस, महिने, ऋतू, आयन आणि वर्ष मोजायचे साधन होते. प्रत्येक दिवशी, सूर्योदयाला अग्निहोत्र करतांना, सूर्य हा दिनकर म्हणून त्याला हवी, आणि प्रजापती म्हणजे वर्ष म्हणून त्याला हवी द्यायची पद्धत रूढ झाली असावी.
“तर सुमित, ही मंथनाची गोष्ट पुराण काळातील झाली. पुढच्या वेळी तुला प्रजापतीची वैदिक काळातील गोष्ट सांगेन!”, आबा म्हणाले.
References -
1. The Orion – B. G. Tilak
2. Surya and the Sun Cult – Shanti Lal Nagar
3. मराठी विश्वकोश
टीप:
- काही जण असेही मानतात की ‘देव’ आणि ‘असुर’ हे विशेष दिवस होते, जे चांद्र व सौर कॅलेंडर synchronize करण्यासाठी वापरत.
- दिपाली पाटवदकर