
खरंतर शिक्षणामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडतेच, पण त्याचबरोबरच शिक्षणामुळे विचारसरणीमध्ये देखील खूप बदल होत असतात. त्यातच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्याकडे अनेक पालकांचा कल असतो. अर्थात, त्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा मोजण्याची तयारी पालकवर्ग दर्शवतात. सर्वसाधारणपणे मुल दोन-अडीच वर्षांचे झाले की, त्याला प्ले ग्रुपमध्ये टाकण्याची तयारी केली जाते. प्ले ग्रुपमध्ये थोडीफार अक्षरांची तोंडओळख करून दिली जाते. पण, त्याचबरोबर आपल्या वयाच्या सवंगड्यांसोबत अभ्यासाबरोबरच मज्जा-मस्ती करण्याची मुलांना मुभा मिळत असते. आज शहरामध्ये असे अनेक प्ले ग्रुप उदयास आले आहेत. आपल्या आर्थिक कुवतीनुसार बहुतांशी पालक आपल्या मुलांना प्ले ग्रुपमध्ये पाठवतात. पण, आपल्या समाजात असाही एक वर्ग असतो, ज्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असते. मग अशा वेळेस शिक्षण घेण्याइतपत खिशात पैसे नसल्याने त्यांना प्ले ग्रुप हा प्रकारच माहीत नसतो. शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये पैशाच्या अभावी अनेक लहान मुलांना बालवाडीपासून वंचित राहावे लागते. समाजातील ही परिस्थिती बदलण्यासाठी अभियांत्रिकेचे शिक्षण घेतलेल्या कनार्टकमधल्या उमेश मल्होत्रा यांनी पुढाकारा घेतला आणि त्यातूनच ’हिप्पोकॅम्पस’ या शिक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली.
‘हिप्पोकॅम्पस’ या संस्थेमध्ये कमी दरामध्ये मुलांना बालवाडीचे शिक्षण दिले जाते. या संस्थेचे संस्थापक असलेल्या उमेश मल्होत्रा यांचे शिक्षण मद्रास येथील आयटीआयमधून झाले. खरंतर उच्चशिक्षित असलेले उमेश यांची आर्थिक परिस्थिती बालपणापासूनच श्रीमंत असल्याने त्यांनी आरामदायी जीवनशैलीमध्ये दिवस काढले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरीदेखील केली. परंतु, हे सर्व सुरू असताना अशा काही घटना घडत गेल्या की, त्यातून त्यांना आपल्याकडे शिक्षण क्षेत्रामध्ये असलेली उदासिनता लक्षात आली. ‘हिप्पोकॅम्पस’ या शाळेत ५२०० विद्यार्थी शिक्षण घेत असून ३५० शिक्षक या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. सध्या देशभरात या संस्थेच्या १५० शाखा आहेत. खरंतर ‘हिप्पोकॅम्पस’ ही संस्था सुरू केल्यानंतर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे एक मोठे आव्हान त्यांना पूर्ण करावे लागले होते. अर्थात, ही संस्था स्थापन करताना त्यांना अनेक छोटे-मोठे अडथळे आले होते. परंतु, शिक्षण घेणे हे किती महत्त्वाचे आहे, हे पालकांना पटवून देताना त्यांची मानसिकता बदलण्यासाठी खूप कालावधी लागला. तसेच शिक्षणासाठी पूरक असे वातावरणच लहानपणापासून या मुलांच्या अवतीभोवती नसल्याने शिक्षणाविषयी गोडी कशी निर्माण करता येईल, यावर जास्त भर देण्यात आला. अभ्यासबरोबरच चित्रकला तसेच छोटे-मोठे खेळ या शिक्षणसंस्थेमध्ये रंगत असतात. मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना समजतील अशा छान छान गोष्टी सांगितल्या जातात. मुलांना घडविण्यासाठी शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे या संस्थेमध्ये शिक्षकांची भरती करताना त्यांची एक परीक्षा घेतली जाते. ते शिक्षक मुलांना कशाप्रकारे हाताळू शकतील, याचा अंदाज काही लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांमधून घेतला जातो आणि त्यानंतर त्यांची निवड केली जाते. खेड्यापाड्यात राहणार्या मुलांमध्येही अनेक सुप्त गुण दडलेले असतात. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना अवगत असलेल्या गुणांना योग्य वाट मिळवून दिली, तर त्यांची प्रगती निश्चितच होऊ शकते, असे उमेश मल्होत्रा सांगतात.
- सोनाली रासकर