आयुष्यात स्वतःची प्रगती साधताना एक जबाबदार नागरिक या नात्याने देशाची प्रगती, हित कसे साधता येईल, याचा खरंतर विचार करणे गरजेचे असते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी असाचा काही सल्ला तमाम भारतीयांना दिला. ते म्हणाले की, ‘‘पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर देशाचा फार मोठा खर्च होत असून लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन वाचवावे. त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला हातभार लाभेल.’’ पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या आवाहनाचा गांभीर्याने विचार करायला हवा.
आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. एक ठराविक वर्ग सोडला तर अनेकजण खासगी वाहनांना पसंती देऊ लागले आहेत. खरंतर जवळचा किंवा लांबचा प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीने करायचा की खासगी वाहनांनी करायचा, हा तसा वैयक्तिक प्रश्न. पण तरीदेखील वाहनांची वाढती संख्या, आवाक्यावर बाहेर जाणारे प्रदूषण, पेट्रोलियमपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, खासगी वाहनांचा वापर थोडा कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी स्वतःचे वाहन असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. श्रीमंतांच्या घरासमोर लावण्यात येणार्या दुचाकी, चारचाकी वाहनांकडे कुतुहलाने पाहिले जायचे. त्या काळामध्ये सर्वसामान्यमंडळी प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला जास्त पसंती देत असत. बस, टॅक्सी, रेल्वे, एसटीचा मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी वापर केला जायचा. परंतु, बदलत्या काळाबरोबरच हे चित्र बदलले. आपलं स्वतःच वाहन खरेदी करण्याकडे अनेकांचा कल वाढू लागला. आपल्या खिशाला परवडेल अशी वाहने खरेदी करण्याकडे प्रमाण अलीकडच्या काळात वाढू लागले आहे. परिणामी, मुंबईबरोबरच इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दिवस-रात्र वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. जागोजागी उभ्या राहिलेल्या अधिकृत तसेच अनधिकृत इमारती, दुकाने, मॉल्स, फेरीवाल्यांनी सर्व जमिनी व्यापून टाकल्या आहेत. त्यातच दिवसेंदिवस वाढत जाणार्या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. मग अशावेळेस जरा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. आज आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे, तर मग या पर्यायाला प्राधान्याने पसंती द्यायलाच हवी.
यावर तोडगा काढायचा तरी कसा?
मुंबईतील वाढती लोकसंख्या, अनधिकृत बांधकामे, वाहतूक व्यवस्थेवर पडत असलेला ताण, पाण्याची टंचाई, वाढती गुन्हेगारी, रस्त्यावरील खड्डे, प्रदूषणयुक्त हवा या सगळया समस्या मुंबईकरांसाठी आता नव्या राहिलेल्या नाहीत. दिवसेंदिवस या समस्यांच्या यादीमध्ये भरच पडत चालली आहे. अर्थात, या समस्या सोडवण्यासाठी संबंधित खाते, यंत्रणा प्रयत्नशील असल्या तरी या समस्यांचा वाढलेला गुंता मोठा असल्याने त्यावर तोडगा काढताना प्रत्येक विभागाच्या नाकी नऊ येत आहेत. आजघडीला या समस्यांपैकी प्रदूषणाची समस्या सर्वाधिक भीषण रुप धारण करते आहे. कारण, याचा थेट संबंध हा मुंबईकरांच्या आरोग्याशी जोडला आहे. मुंबईकर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत असले तरी ही हवा मात्र प्रदूषित होत आहे. दिवाळीनंतर हवेतील प्रदूषणाची पातळी अधिक वाढली असल्याची बाब समोर आली आहे. या आठवड्यात हवेचा दर्जा २०३च्या निर्देशांकावरून २५७ वर पोहोचला आहे. हवेची गुणवत्ता मोजणार्या ‘सिस्टिम ऑफ एअर क्वॉलिटी वेदर फोरकास्टींग ऍण्ड रिसर्च’ अर्थात ’सफर’ या संस्थेने यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये हवेचा दर्जा १०१ ते २०० या निर्देशांकामध्ये हेलकावे खात राहिला आहे. थंड हवेच्या प्रभावामुळे हा परिणाम जाणवत आहे. या हवेमध्ये धुलीकणांचे प्रमाण अधिक आहे. तसेच त्याचा वेगही कमी-जास्त आहे. २०१ ते ३०० यामध्ये असणारा हवेचा निर्देशांक अतिशय खराब मानला जातो. त्यामुळे वातावरणात मोठा बदल होतो. वातावरणात झालेल्या या बदलाचा सर्वाधिक फटका हा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना जास्त बसतो. तसेच गरोदर महिला, लहान मुलांना यामुळे जास्त धोका निर्माण होऊ शकतो. लहान मुलांना नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या कॅल्शियमचाही अभाव येथे आढळून येतो. श्वास घेण्यामध्ये अडथळा निर्माण होते, चालताना धाप लागत असल्यामुळे कोवळ्या वयातच लहान मुलांना नेब्युलायझर, अस्थमा पंप वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, याचा जास्त प्रमाणात वापर करणे ही आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच, या धुळीच्या ऍलर्जीमुळे त्वचा व डोळ्यांवरही परिणाम होतो. प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिकेनेच मुंबईतील हवेच्या प्रदूषणाचा अहवाल सादर करताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हवेतील प्रदूषण कमी झाले असले तरी श्वसनासाठी ही हवा चांगली नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला होता ही बाब लक्षात ठेवायला हवी.
- सोनाली रासकर