आक्रस्ताळी प्रतिक्रियांचा गुजराती फटका!

    22-Dec-2017   
Total Views | 3

उना येथे गाईची कातडी काढण्यावरून दलित युवकांना मारहाण केली गेली होती. तो घटनाक्रमजिग्नेश मेवानीला आमदार करून थांबला आहे. मात्र हे चक्र इथेच संपणार नाही. दलित व डाव्यांच्या जोड्या जुळविण्याचे प्रयत्न करणारे लोक आता जिग्नेशचा ताबूत करून देशभर नाचवतील यात शंका नाही. आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांची परिणीती समाजकारणात कशी होते याचे हे उदाहरण ठरावे.
 
 
 
 
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि हिंदी सिनेसृष्टीतील नायिका अनुष्का शर्मा यांनी इटली येथे विवाहबद्ध होणे पसंत केले. माध्यमांनी गोड बातमी म्हणून ही बातमी दिली आणि नंतर मात्र स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणार्‍या काही मंडळींनी विराट कोहलीला समाजविरोधी, राष्ट्रविरोधी म्हणून हिणवायला सुरुवात केली आणि या विषयाला निराळेच वळण मिळाले. इतरांच्या राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणिवा तपासण्याचे व त्यांना प्रमाणपत्र देऊन स्वत:चे महत्त्व वाढविण्याचे प्रकार सध्या खूपच बोकाळले आहेत. या देशातील सव्वाशे कोटी जनतेने भाजपप्रणित सरकारला निवडून दिले. त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने या देशात माजविलेली बजबजपुरी. स्वत:ला या सरकारचे हितचिंतक म्हणविणार्‍यांनी देखील अशाच प्रकारे बजबजपुरी माजविली तर त्याची कोणत्या प्रकारची किंमत या सरकारला मोजावी लागेल, याचा लहानसा ट्रेलर गुजरातमध्ये पाहायला मिळाला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन्ही नेते भारतीय राजकारणातले सगळ्यात मुरब्बी नेते आहेत. कॉंग्रेसच्या विरोधात निवडणुका लढविण्याचा त्यांच्या इतका दांडगा अनुभव सध्या तरी या देशात कुणाचाही नाही. गुजरातची निवडणूक या दोन्ही नेत्यांनी आपल्या कष्ट आणि कौशल्याने जिंकली असली तरी कमी झालेल्या जागांमध्ये अनुसूचित जातीच्या मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. मतांची विभागणी अनेकदा राजकारणात पथ्यावर पडते परंतु ज्या प्रकारचे लोक राजकारणात निवडून येतात आणि ज्या प्रकारचे वातावरण ते निर्माण करतात त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
 
 
जिग्नेश मेवानीचा राजकीय उदय हा अशाच प्रकारच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे. ११ जुलै २०१६ साली गिर सोमनाथ येथे चार दलित तरुणांना मृत गाईचे कातडे काढताना तथाकथित गोरक्षकांनी बेदम मारले. आपण मृत गाईचेच कातडे काढीत होतो, हे सांगूतही तुम्ही गोहत्या केल्याचे सांगत या तथाकथित गोरक्षकांनी त्यांना उना शहरात नेले आणि तिथेही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. प्रसंग इथेच संपला नाही. या मारहाणीचे व्हिडिओ तयार करण्यात आले आणि ते मुक्त माध्यमांवर पसरविण्यात आले. याचा परिणाम म्हणून गुजरातमधील वातावरण ढवळून निघाले. दोन महिने निरनिराळ्या ठिकाणी मोर्चे सभा सुरूच होते. १५ ऑगस्टला या सार्‍याचा परिणाम म्हणून जिग्नेश मेवानीच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा गुजरातमध्ये निघाला आणि गुरांची कातडी कमाविण्याचा पारंपरिक व्यवसाय सोडून देण्याचे आवाहन त्याने तिथे उपस्थितांना केले आणि त्यांच्या उत्थानासाठी शेतीयोग्य जमीन देण्याची मागणीदेखील केली. या सार्‍याचा परिणाम म्हणून एक ठाम असे जनमत जिग्नेशच्या पाठीमागे उभे झाले. जेएनयु प्रणित डाव्या विचारांच्या जिग्नेश मेवानीला ही चांगली संधी मिळाली आणि त्याने स्वत:च्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या डाव्या बंधूंनी निवडणुकीत त्याला चांगलीच मदत केली. जिग्नेश निवडून येणे आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांचाच परिणाम आहे. जिग्नेश मेवानी निवडून येण्यामुळे पुढील काळात अनुसूचित जाती विशेषत: दलित आणि पुन्हा दलित युवकांचे राजकारण बदलताना दिसेल. भाजप किंवा कॉंग्रेस यांच्या वळचणीला न जाता निवडून आलेला जिग्नेश आता दलित युवकांचा आयकॉन असेल. डावे विचार आणि विद्रोही विचारांचे दलित युवक यांची जोडी जुळविण्याचे अनेक प्रयोग देशात यशस्वीरित्या राबविले जात आहेत. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांसारखे नेते तर यासाठी कंबर करून कामाला लागले आहेत. यातून निर्माण होणारी अस्वस्थता, बाटलीत उतरविण्यात मिळणारे यश अस्वस्थ करणारे आहे. फुटीरवाद, नक्षलवाद, हिंदूद्वेषाचे राजकारण असे अनेक गंभीर धोके यात आहेत. जिग्नेशचा स्वत:चा राजकीय आवाका किती हा प्रश्नच असला तरी या देशातील डावी चळवळ त्याचा ताबूत करून देशभर नाचविणार यात शंका नाही. वस्तुत: त्यांना दलित, दलितांचे निरनिराळे प्रश्न यांच्याशी काहीच देणेघेणे नाही. मात्र जिग्नेशला मिळालेले राजकीय यश मिणमिणत पेटणार्‍या डाव्यांसाठी इंधन ठरेल. कन्हैय्या कुमार सध्या देशभर तेच काम करीत फिरत आहे. यात आता जिग्नेश मेवानीची भर पडेल. दलित तरुण, तरुणींचा या सार्‍यांना मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. त्यातून राजकीय परिवर्तन किती होऊ शकते हा प्रश्न असला तरी सामाजिक स्वास्थ्य नक्कीच बिघडविले जाईल, यात शंका नाही. रा. स्व. संघ व संघप्रणित संस्थांना लक्ष्य करून या मंडळींचे कामचालते. स्वत:ला हिंदुत्ववादी व संस्कृतीचे रक्षक म्हणविणारे लोक जे काही आचरट उद्योग पुढच्या काळात करीत राहतील, त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत.
या देशात तीनच मुख्य राजकीय प्रवाह आहेत. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करायची संधी मिळालेली कॉंग्रेस, मार्क्सच्या विचारांच्या लोकप्रियतेवर आरूढ झालेले डावे आणि रा. स्व. संघप्रणित भाजप. अन्य लहानमोठ्या सर्वच राजकीय प्रवाहांना या तिघांच्या अवतीभवतीच आपली राजकीय समिकरणे जुळवावी लागतात. एक चौथा व नव्याने निर्माण होणारा प्रवाह हा सामाजिक अस्थिरतेतून जन्माला येत असल्याचे जाणवत आहे. स्वातंत्र्यलढ्याने या देशाला आपल्या राजकीय नेत्यांची पहिली फळी दिली. आणीबाणीने दुसरी तर रामजन्मभूमी आंदोलनाने या देशात तिसरी राजकीय फळी निर्माण केली. सत्तेच्या राजकारणाला एक नैसर्गिक जडत्व असते. समाजातल्या मुक्त ऊर्जेला या जडत्वाचा जाच होतो. त्यातूनच मग अण्णा हजारेंसारखी आंदोलने निर्माण होतात व स्वत:ची अशी राजकीय जागा निर्माण करतात. अरविंद केजरीवालसारख्या व्यक्तीने या अस्वस्थतेतून येणार्‍या राजकीय वातावरणाचा फायदा घेतच दिल्लीची सत्ता काबीज केली. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, संवाद माध्यमांच्या रुंदावणार्‍या कक्षा यामुळे लहान राज्यांमध्ये राजकीय परिवर्तन घडवून आणणे अशक्य नाही, हे दिल्ली पाहिल्यावर लक्षात येते. या देशाने संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षांत ती बर्‍यापैकी रुजलीदेखील आहे. खान पान, सांस्कृतिक मूल्ये यात थोड्याबहुत प्रमाणात भिन्नता असूनही भारतीयत्वाच्या नात्याने लोक परस्परांशी जोडलेलेच आहेत. कुठल्याही प्रकारचे अनावश्यक नियंत्रण झुगारून देण्याचा आपला स्थायीभाव आहे. प्रक्षिप्त प्रतिक्रिया देण्याच्या हिंदू समाजाच्या सवयीपासून दूर नेऊन अनुशासन व आत्मविश्वासाचा संस्कार डॉ. हेडगेवारांनी दिला. हा विचार इतका सर्वसमावेशक होता की, सोबतच्या दोन विचारधारा अस्तंगत व्हायला लागल्या असल्या तरी डॉक्टरांचा विचार प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वर्धिष्णूच होताना दिसतो. सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी ठामउभे राहाणे, त्यासाठी प्रसंगी मैदानात उतरणे व अन्य विचारांच्या प्रभावाचा भयगंडाने सतत द्वेष करीत राहणे या दोन निराळ्या गोष्टी आहेत. स्थानिक स्तरावर त्यातून वाहवा मिळविता आली तरी देशस्तरावर त्याचे गंभीर परिणामच भोगावे लागतील.
- किरण शेलार

किरण शेलार

एम सी जे पर्यंत शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतचे संपादक. मूळ मुंबईकर आणि बालपणापासून रा. स्व. संघाशी संबंधित. सा. विवेक व तरुण भारत समूहात विपुल लिखाण. वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य. राष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक व धोरणविषयक अभ्यास व लिखाण.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121