“आबा, आतापर्यंत तुम्ही सूर्याच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या. आता चंद्राच्या गोष्टी सांगा.”, सुमितने त्याची मागणी पेश केली.
“सुम्या, चंद्र म्हणलं की गद्य गोष्टी पेक्षा मनात काव्यच येत बघ!”, आबा म्हणाले.
“अगोबाई! आता कविता करणार की काय?”, दुर्गाबाई मिश्किलपणे म्हणाल्या.
“तसं नव्हे ग! चंद्राबद्दल वैज्ञानिक गोष्टींचा विचार करायचा म्हणलं तरी, आधी त्याचं सौम्य सौंदर्य, डोळ्यांना सुखावणारा प्रकाश, त्याचे रोज बदलणारे रूप हेच डोळ्यासमोर येते.”, आबा म्हणाले.
“आबा, मग आज त्याच्या रोजच्या वेगळ्या रूपाबद्दलच सांगा.”, सुमितने सुचवले.
“चालेल, ठीक आहे! तर आज आपण चंद्राच्या कला पाहू. पहिली गोष्ट अशी की - पृथ्वी सूर्या भोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. पण सध्या आपण फक्त चंद्राचे पृथ्वी भोवती फिरणे विचारात घेऊ.
“दुसरी गोष्ट अशी की, पृथ्वीवर जसा सूर्याचा प्रकाश पडतो, तसाच चंद्रावर पण सूर्याचा प्रकाश पडतो. पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या अर्ध्या भागावर दिवस आणि अर्ध्या भागावर रात्र असते.”, आबा म्हणाले.
“हे मात्र मला लहानपणापासूनच माहित आहे!”, सुमित कॉलर ताठ करत म्हणाला.
“आता बघ हं, चंद्र पृथ्वी भोवती फिरतांना आपल्याला कधी कधी त्याची पूर्ण अंधारातली बाजू दिसते, तर कधी त्याची पूर्ण उजेडाची बाजू दिसते.”
“म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा!”, आबांना मधेच तोडत सुमित म्हणाला.
“आणि कधी अर्धी उजेडाची, तर कधी अर्धी अंधाराची बाजू दिसते. ते म्हणजे?”, आबांनी विचारले.
“पौर्णिमा ते अमावस्या हा १५ दिवसांचा कालावधी आहे. त्या अर्थी, अर्धा चंद्र म्हणजे, ७ व्या किंवा ८ व्या दिवसाचा असणार.”, सुमितचा आडाखा.
“भले सुमित, बरोबर! आता, चंद्राच्या सूर्य सापेक्ष स्थानाप्रमाणे, पृथ्वीवरून दिसणारी चंद्रकोर पहा -
“अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राची कला वाढत जाते. हे १५ दिवस उजेडाचे, म्हणून पांढरे किंवा शुक्ल पक्ष. या १५ तिथींना एक ते पंधरा अशी नावे दिली आहेत. ती आहेत - प्रतिपदा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी ... त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्रकोर लहान होत जाते. हे १५ दिवस अंधाराचे, कमी प्रकाशाची, म्हणून काळे किंवा कृष्ण पक्ष. या तिथींची नावे सुद्धा – प्रतिपदा, द्वितीय ... चतुर्दशी आणि अमावस्या अशी आहेत. असा ३० तिथींचा एक महिना होतो.
“या दोन्ही पक्षात दिसणाऱ्या चंद्राच्या विविध कला बघ ...”, आबा म्हणाले.
“शंकरराव, शुक्ल पक्षातला चंद्र एखादा कुंभ पाण्याने भरत जावा तसा दिसतो.”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“वैदिक काळातील आकाश दर्शकांना सुद्धा असेच वाटले! त्यांनी काय केले होते? आकाशातील सूर्य - चंद्राच्या मार्गाचे समान भाग पडले होते. सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असलेल्या भागाला ‘इंद्र’ हे नाव दिले.”, आबा सांगत होते.
“म्हणजे देवांचा राजा, इंद्र?”, सुमितने खात्री करून घेतली.
“Righto! मध्यरात्रीला बरोबर डोक्यावर असतो तो आकाशाचा भाग म्हणजे इंद्र! त्यामुळे ‘देव कुठे आहे?’ या प्रश्नाला, बोट वर करून ‘आकाशात’ असे दाखवले जाते, ते या कारणासाठी! यज्ञात दिलेल्या आहुतीची वाफ अग्नी आकाशात देवांकडे घेऊन जातो ही रास्त कल्पना. आणि आहुतीच्या वासाने देव प्रसन्न होतात ही भावना.
“तर, इंद्राचे वर्णन करतांना वेदात म्हणले आहे – इंद्र हा सुवर्ण कांती असलेला युद्धाचा, शौर्याचा देव आहे. त्याला सुंदर मोठी दाढी आहे. त्याने वृत्र या विशाल सर्पाचा नाश करून, नद्यांचा मार्ग मोकळा केला. तो आपल्या वज्राने ढगांवर आघात करून पाऊस आणतो. आणि त्याला सोमरसपान करायला अतिशय आवडते. चाळीस तळी भरतील इतके सोमरस तो पिऊ शकतो!
“आता गंमत बघ हं! चंद्राचे एक नाव आहे ‘सोम’. दुर्गाबाई, तुम्ही आता म्हणालात की, शुक्ल पक्षातला चंद्र, घट भरत जावा असा दिसतो. वैदिक काळातील आकाश निरीक्षण करणाऱ्या ऋषींची कल्पना अशी की - शुक्ल पक्षातला चंद्र म्हणजे सोमरसाने भरत जाणारा घट. सोमरसाने पूर्ण भरलेला, पौर्णिमेचा चंद्र, आकाशात सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असतो. म्हणजे तो ‘इंद्रा’ जवळ असतो. हा सोमरसाने भरलेला घट इंद्र अत्यानंदाने ओठांना लावून गटागटा पितो! जिभल्या चाटत सोमरस पितांना इंद्राची दाढी वर खाली हलते. मग तो घट रिकामा होत होत अमावस्येला संपून जातो!”, आबा म्हणाले.
“शंकरराव, तुम्ही म्हणालात ते बरोबरच आहे! चंद्र म्हणले की माणूस कवीच होणार! या वैज्ञानिक संकल्पनेत सुद्धा ऋषींना काव्य दिसले! आणि इंद्राचे सोमरसपान त्यांना नाट्यमय रीतीने आकाशात घडतांना दिसले!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“दुर्गाबाई, मग या काव्यासाठी एक फक्कड चहा करा!”, आबा म्हणाले.
“आजी, आज माझ्या हाताचा अमृततुल्य चहा. आजच्या वाग्यद्न्यात चहाची सोमरस आहुती होऊन जाऊ दे!”, असे म्हणून सुमित स्वयंपाकघराकडे वळला.
References -
१. Vedic Astronomers – P V Holay
२. Surya and the Sun Cult – Shanti Lal Nagar
३. धर्म आणि तत्त्वज्ञान – श्री. भा. वर्णेकर
- दिपाली पाटवदकर