भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी राज्याभिषेक ... !!

    18-Dec-2017   
Total Views | 6

 
कैसे समझोगे की कौन प्रतिभाशाली है?
प्रतिभा के लक्षण अनेक हैं, किन्तु, कभी जब
सभी गधे मिल एक व्यक्ति पर लात चलायें,
अजब नहीं, वह व्यक्ति महाप्रतिभाशाली हो।
 
‘प्रतिभा’, ‘नये सुभाषित’, कविता संग्रह १९५७
रामधारी सिंह ‘दिनकर’
 
 
रामधारी सिंह ‘दिनकर’ या द्रष्ट्या कवीने बरोब्बर ६० वर्षांपूर्वी लिहिलेली, मात्र चार ओळीतली, ही कविता ‘प्रतिभा’, म्हणजे नियतीची भविष्यवाणी म्हणावी काय असा प्रश्न वाचकाला नक्की पडावा असा हा योगायोग. हिंदीतील मान्यवर कविश्रेष्ठ ‘दिनकर’, वीर रसातील आधुनिक दीर्घ कवितांचे जनक म्हणून ख्यातकीर्त आहेत, त्यांचा असा उपहास वाचायला मिळणे फार विरळा योग.
 
 
नियती नावाची निर्गुण-निराकार शक्ती, कोणी स्वीकारो अथवा नाकारो, हिंदू धर्मबांधवांच्या निश्चित परिचयाची. त्या नियतीने नेमका १६ डिसेंबरचा दिवस एखाद्या घटनेसाठी का निवडावा हे कोडे, भल्याभल्या प्रकांड पंडितांना आणि उजव्या-डाव्या राजकीय विश्लेषकांना निश्चितच सुटण्यातले नाही. साधारण हजार-बाराशे वर्षांच्या इतिहासाचा मागोवा घेता, १६ डिसेंबर हा दिवस, नित्य नेमाने घडलेल्या दोन घटनांचा साक्षीदार ठरला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झालेली अनेक युद्ध या दिवशी संपुष्टात आली त्यात न्यायी योध्याचा विजय झाला आणि अनेक राजघराण्याच्या वारसदारांचा राज्याभिषेक नेमक्या याच दिवशी झाल्याची नोंद नियतीने इतिहासाच्या पानांमधे केली. बंगलादेशाच्या स्वातंत्र्य लढयात भारतीय सेनेने पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून, ९२००० पाकिस्तानी सैनिकाना युद्धबंदी केले ते याच १६ डिसेंबर १९७१ या दिवशी.
 
निव्वळ २२/२५ मंदिरात जाऊन देवदर्शनाने अथवा चर्चमध्ये जाऊन येशूची करुणा भाकल्याने, आपला मातृदत्त अथवा स्वीकृत धर्म लयाला जात नसतो आणि कितीही जाहिरात केली तरी तो लोकमानसात सिद्धही होत नसतो. वयाच्या पन्नासाव्या वर्षी, आपला स्वीकृत धर्म; मन, बुद्धी आणि भावना संवेदनेत पक्का मुरलेला असतो. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या फसव्यांसाठी आपली लोकश्रुती म्हणते... काशीस गेल्याचे आपण सांगतो पण मांजर मारल्याचे सांगत नाही. ‘मांजर मारल्याचे’ या दोन शब्दांच्या रूपकाचा संदर्भ आहे. व्यक्तीने अयोग्य कृती किंवा वर्तणूक करण्याशी. असे गैरवर्तन त्या व्यक्तीच्या मनाला खात असते म्हणून आणि लोक निंदा सहन होण्यासारखी नसते म्हणून मग लोकांच्या देखाव्यासाठी आणि स्वतः प्रायश्चित्त घेण्यासाठी ‘काशीला’ जावे लागते अर्थात आधुनिक काळात देवदर्शनाला जाण्याचे एखाद्याला सुचते...!
 
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १३२ वर्षे जपलेली-जोपासलेली संस्कृती, राहुल गांधी यांच्या दिल्लीत झालेल्या आजच्या अध्यक्षपद ग्रहण समारंभातसुद्धा नेहमीप्रमाणे कामी आली. मातोश्री अर्थात कॉंग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या निरोपाच्या भाषणात त्यांनी राहुल गांधींचे नाव जाहीर करताच सभास्थानी फटाके फुटले आणि त्या आवाजाचे विघ्नसंकट आल्याने “मला बोलता येत नाहीये... मी आता ओरडून बोलू का” असे निराश उद्गार त्यांना काढावे लागले. आजचा प्रसंग काय आहे, आपला नेता काय बोलतो आहे आणि आपण काय करतो आहोत याचा ताळमेळ कधीच न जमलेला हा पक्ष, गेल्या ६५ वर्षांत सामान्य जनतेचे भले करू शकला नाही, तो आजच्या बदलत्या काळात काही करू शकेल अशी शक्यता नाही.
 
५० वर्षाच्या या गृहस्थाचे कौतुक, त्याच्या आईनेच करायचे ठरवले की काय होते आपल्याला माहित आहे. राजकारणात आल्यापासून माझ्या मुलाने फार भोगले आहे. त्याला हिंसेचा सामना करावा लागला आहे आणि वैयक्तिक टीका सहन करावी लागली आहे. आता हाच आपल्या पक्षाला योग्य नेतृत्व देईल असा भरोसा देत आईने अध्यक्षपदाची माळ याच्या गळ्यात घातली. एका चीन्धीला चार गांठी, माझ्या बापाची इस्टेट मोठी.... हेच - असेच पालुपद आपल्या अध्यक्षपद स्वीकारताना केलेल्या पहिल्या भाषणात नव्या अध्यक्षांनी त्यांच्या खूषमस्कऱ्यांना आणि भाडोत्री भाटांना ऐकवले. देशाची प्रगती, सुरक्षा, देशाभिमान याचा साधा उल्लेखही यांच्या पहिल्या भाषणात आला नाही. फसवणूक, भ्रष्टाचार, धार्मिक वैमनस्य, वांशिक तिरस्कार यांना खतपाणी घालून, इंग्रज सरकारच्या भेदनितीचा वापर करून यांच्या पक्षाने देशावर गेल्या ६५ वर्षांत राज्य केले आहे, यांनी बापजाद्यांच्या न केलेल्या कर्तुत्वाचे झेंडे उडवू नये.
 
We don’t fight hate with hate…!! मी प्रेमाचे राजकारण करणार आहे असे धडधडीतपणे सांगताना यांची जीभ आखडली नाही. अगदी काल-परवा पर्यंत, हिंदी-इंग्लिश अशा सर्व भाषातली शेलकी विशेषणे वापरून यांनी स्वतः आणि यांच्या बगलबच्चानी विद्यमान माननीय पंतप्रधानांची जमेल तितकी केलेली नालस्ती जनसामन्यांच्या आजही स्मरणात आहे. अशा व्यक्ती, ज्यांनी सामाजिक सभ्यतेचे भान सोडले आहे, राजकीय सौजन्य म्हणजे काय याचे धडे ज्यांना कधी मिळाले नाही असे कोणी, प्रेमाचे राजकारण करू शकतात यावर सर्वसामान्यांचा विश्वास नाही.
 
जीभ जिंकतो तो जग जिंकतो... ही लोकोक्ती सहज प्रचलित झालेली नाही. त्यामागे निश्चितपणे खूप सामाजिक अनुभव जमा आहे. सार्वजनिक क्षेत्रात अथवा राजकारणात व्यस्त असलेल्या कोणाचेही, उत्तम वक्तृत्व हे बलस्थान असते. असंबद्ध बोलणाऱ्या, स्वतःच्या जिभेवर ताबा नाही अशा व्यक्तीना मनोरंजनाचे साधन म्हणून जनता ऐकते आणि या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देते. तीच गोष्ट यांच्या पाळलेल्या भाटांची आणि खुषमस्कऱ्यांची ज्यांनी अन्य राजकीय प्रणाली स्वीकारणाऱ्या व्यक्ती आणि समजाप्रती सतत फक्त तीव्र द्वेष आणि तिरस्काराची पेरणी केली. यांच्या सार्वजनिक वर्तन आणि बोलण्यावरूनच, जनता यांची बुद्धिमत्ता आणि कुवत जाणून असते. आजच्या काळात आर्थिक आणि औद्योगिक प्रगती, देशाची सुरक्षा, नव्याने निर्माण होणारे प्रश्न यावर भाष्य न करता आजच्या राज्यकर्त्यांचे चरित्र आणि चारित्र्य हनन करणे इतकेच याना गुजरातमधील निवडणुकांच्या प्रचार सभांमधून करता आले आहे. जनसामन्यांच्या बुद्धीचा, मताचा आणि राजकीय पक्षाची राज्यकर्ते म्हणून निवड करण्याच्या अवलोकन शक्तीचा अंदाजच यांना कधी करता आला नाही.
 
गुजरातेतील वास्तव्य आणि गुजराती भाषा दुसरी मायबोली असल्याने, पक्का व्यवहारी असलेल्या गुजराती समाजाचा माझा उत्तम परिचय. 'कैची चिका दूधचवी । जरी दावे पांढरे ।।' तुको0बांच्या या उक्तीनुसार, म्हशींचा चीक आणि दूध, दोन्ही रंगाने पांढरे असले तरी त्यातील भेद, धवलक्रांतीतील अग्रणी गुजराती समाजाला निश्चित समजतो. 'नमो' आणि 'रागा' या दोघांपैकी नक्की कोण हवंय ते गुजरतेतील या पक्क्या व्यवहारी समाजाने मतपेटीतून दाखवून दिलेच आहे...!
 
पांच-पंचवीस वाचाळ खूषमस्करे, माध्यमातील विकत घेतलेले भाट आणि अन्य राजकीय पक्षांचे मतलबी झेंडे खांद्यावर घेतलेले भ्रष्टाचारी समविचारी यांच्या जीवावर अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातल्यावर, यांची गत, या म्हणीतल्या उंदरासारखी झाली आहे. उंदराला सापडली चिंधी, म्हणे बाजाराला जायचे कधी... सतत चिंध्या कुरतडणाऱ्या या लबाड उंदराला आज एक रंगीत चिंधी सापडली आहे आणि आता त्याचे नवे कपडे शिवून घायचे मनसुबे तो रचतो आहे, त्याला ती चिंधी घेऊन बाजारात शिंप्याकडे जायचे आहे. बापजाद्यांच्या नावाने कोणीतरी असंसदीय मार्गाने यांच्या गळ्यात नव्याने घातलेले हे अध्यक्षपद म्हणजे अगदी या चिंधी सारखेच असावे.
 
आपल्या मातोश्रींनी ज्यांचे वर्णन ‘मौत का सौदागर’ असे केले, त्या विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांची आणि त्यांच्या फक्त तीन वर्षांत निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय दबदब्याची धास्ती राहुल यांनी निश्चितपणे घेतली आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, पहाल तिथे, जाल तिथे, फक्त नरेंद्र मोदी यांची सावली यांना वाकुल्या दाखवते आहे. कारण अध्यक्षपद स्विकारताना केलेल्या भाषणात ’मात्र मोदी’ याशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा आलेला दिसत नाही.
 
प्रश्न असा आहे की, कोण कोणाचे कळसुत्री भाऊली आहे. अध्यक्ष स्वतः पक्षाची सूत्र हलवतात की तेच भाऊली आहेत, कुठल्या अदृश्य षड्यंत्राचे...!!
 
कविश्रेष्ठ रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या त्या शेवटच्या दोन ओळी...
सभी गधे मिल एक व्यक्ति पर लात चलायें,
अजब नहीं, वह व्यक्ति महाप्रतिभाशाली हो। ...
 
पूर्ण ताकदीने आणि फसव्या श्रद्धेने काँग्रेसजन सिद्ध करत आहेत, करत रहातील. आपण त्याचे साक्षीदार राहावे, इतकेच महत्वाचे...!!
- अरुण फडके

अरूण फडके

गेली ३५ वर्षे इमारत दुरूस्ती व्यवसाय - या विषयातील अनेक यंत्र-तंत्रांचे विशेषज्ञ, नाट्यक्षेत्रातील नामवंत विश्वस्तनिधींचे विश्वस्त, मोठ्या उत्सवी कार्यक्रमांचे अनुभवी संघटक (Event designer),  फ्रीमेसनरी या प्राचीन जागतिक संघटनेचे सदस्य आणि संघटनेच्या भारतातील इतिहासाचे अभ्यासक आणि एक इंटरनॅशनल कॉफी टेबल बूक प्रकाशित, (सिंबॉल–सिंबॉलिझम--अॅलिगरी) चिन्ह-चिन्हसंकेत-चिन्हार्थ या विषयाचे अभ्यासक.

अग्रलेख
जरुर वाचा
भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

भारतात प्रत्यार्पणाच्या चर्चा, तहव्वूर राणा नेमका आहे कोण? २६/११ च्या हल्ल्यात त्याची काय भूमिका होती? सविस्तर वाचा...

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केला, त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणास हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र तहव्वूर राणाकडून प्रत्यार्पण टाळण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. त्याने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121