हार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्या

    17-Dec-2017   
Total Views | 6




मी नवखा पत्रकार होतो तेव्हा ज्येष्ठांकडून अनेक गोष्टी ऐकत होतो आणि समजून घेत होतो. १९७० च्या आसपासची गोष्ट आहे. तेव्हा इंदिराजींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुकीची घोषणा केलेली होती. साहजिकच दैनिक मराठाच्या संपादकीय विभागात तेव्हा सतत निवडणुकांचीच चर्चा रंगलेली असायची. त्यात एका ज्येष्ठ सहकार्‍याने १९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकीतला किस्सा कथन केला होता. त्या आरंभीच्या काळामध्ये पुण्याचे थोर काँग्रेस नेते म्हणून काकासाहेब गाडगीळ ओळखले जात, तर त्यांचे तरुण सुपुत्र विठ्ठलराव गाडगीळ प्रजा समाजवादी पक्षाचे ऊर्जावान नेता होते. त्या काळात समाजवादी पक्षाचा दबदबा होता आणि बहुतांश कॉलेज जीवनातील तरुणांना त्या समाजवादी विचारांचे आकर्षण असायचे. स्वाभाविकच विठ्ठलराव गाडगीळ समाजवादी पक्षात दाखल झाले असल्यास आश्चर्य नव्हते. त्या निवडणुकीत आक्रमक भाषण करणारे म्हणून विठ्ठलरावांना अनेक सभांमध्ये आमंत्रण असायचे. तशीच एक सभा म्हणे पिंपरी चिंचवड भागात कुठेतरी होती आणि आपल्या आवेशपूर्ण भाषणात विठ्ठलरावांनी काँग्रेसचे पुरते वाभाडे काढलेले होते. आज ज्या आवेशात कुणीही भाजपावाला तावातावाने काँग्रेसवर टीकास्त्र सोडतो, तो नजरेसमोर आणला; तर विठ्ठलरावांचे भाषण ऐकल्यासारखे वाटेल. पुढे विठ्ठलरावच काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील तीच एक राजकीय प्रचलित परंपरा होती. समाजवादी पक्षाने चिखलातून मडकी तयार करायची आणि भाजायला काँग्रेसच्या भट्टीत पाठवायची, असाच शिरस्ता होता. सुपुत्राचे भाषण आदल्या दिवशी झाले, त्याच जागी दुसर्‍या दिवशी पिताश्री काकासाहेब गाडगीळांचे भाषण ठेवलेले होते. काकासाहेब अतिशय कुशाग्र बुद्धीचे व नेमस्त पुढारी होते. आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी अशी केली, की बाप कोण आहे, ते काही मिनिटातच श्रोत्यांना समजून गेले. त्यांचे शब्द काहीसे असे होते.

बंधू-भगिनींनो, कालही इथे प्रचारसभा होती आणि आजही निवडणुकीची प्रचारसभा आहे. कालही इथे गाडगीळ आले होते आणि आजही गाडगीळच बोलायला उभे आहेत. फरक इतकाच आहे, की काल नुसताच उत्साही उथळ उतावळा आवेश आलेला होता. आज इथे दूरगामी जीवनाकडे बघणारा सुबुद्ध विचार आलेला आहे. बाकी पुढल्या भाषणात काकासाहेब काय बोलले त्याला महत्त्व नाही. पण, आरंभीच्या एका वाक्यात त्यांनी जे काही सांगितले, त्याचा अर्थ मतदारांना वा श्रोत्यांना नेमका उमजला होता. ही तब्बल साठ वर्षांपूर्वीची गोष्ट इतक्यासाठी आठवली की, मागल्या दीड महिन्यात भारतीय माध्यमातून व चर्चांमधून हार्दिक, अल्पेश, जिग्नेश व राहुल गांधी यांच्या आवेशपूर्ण गर्दी खेचणार्‍या सभा व भाषणांची चर्चा खूपच रंगलेली होती. पण, शेवटच्या दहा दिवसांत तिथेच येऊन नरेंद्र मोदी यांच्यासारखा पोक्त व मुरब्बी नेता काय करून गेला, हे माध्यमांना अजून उलगडलेले नाही. म्हणून तर दीड महिना जो फुगा सर्व शक्ती पणाला लावून फुगवला, तो आपल्याच तोंडावर कशाला फुटला, त्याचे उत्तर गेले दोन दिवस माध्यमातले शहाणे शोधत आहेत. नोटाबंदी व जीएसटी यांच्याखेरीज राहुल गांधींनी उद्ध्वस्त करून टाकलेले विकासाचे गुजरात मॉडेल; निदान एक्झिट पोलमध्ये तरी जसेच्या तसे शाबूत असल्याचेच दिसते आहे. किमान अशा पोलमध्ये तरी त्या गुजरात मॉडेलच्या ठिकर्‍या ठिकर्‍या उडालेल्या बघायला ऐकायला मिळतील, अशी या तमाम राजकीय विश्लेषक संपादकांची अपेक्षा होती. पण, त्याचा मागमूसही एक्झिट पोल दाखवत नसेल, तर त्यांना साठ वर्षांपूर्वी काकासाहेब गाडगीळ काय म्हणाले, तेही समजू शकणार नाही. कुठल्याही गंभीर लढाईत वा संघर्षात उथळ उत्साही उतावळेपणा कामाचा नसतो. इतकाच त्यातला आशय असून गुजरातमध्ये धुमशान घालणार्‍या अननुभवी चौकडीला त्याचा थांगपत्ताही लागलेला नव्हता.

अर्थात सवाल हार्दिक, अल्पेश वा जिग्नेश यांच्या अपुर्‍या अनुभवाचा नव्हता वा नाही. ते नवे तरुण आहेत आणि लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी मस्ती अंगात असताना त्यांनी असेच वागले पाहिजे. पण, अशा मस्तीत पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या राहुलनी किती झोकून द्यावे? राहुल बोलतात म्हणून पत्रकार संपादकानी किती वहावत जावे, याला मर्यादा असली पाहिजे. गल्लीतल्या चार पोरांनी उठून सचिन किंवा विराटला कसोटी सामन्यात धूळ चारण्याची भाषा करायला हरकत नसते. पण, ज्यांचे आयुष्य क्रीडा समालोचन करण्यात खर्ची पडलेले असते, त्यांनी अशा शेफारलेल्या पोरांच्या आव्हानावर जुगार किती खेळावा, याला नक्कीच मर्यादा असते. ती मर्यादा माध्यमांनी, अभ्यासकांनी व जाणत्यांनी गुजरात निवडणुकीत ओलांडली. म्हणून आता त्यांच्या तोंडावरच त्यांनी फुगवलेला फुगा फुटलेला आहे. फुग्यात हवा भरली की तो फुगतो आणि त्याच्या खर्‍या आकारापेक्षाही मोठा दिसू शकतो, हे जगाला मान्य आहे. पण, त्या फुग्यात पोकळी असते आणि इवलीशी वास्तवाची टाचणी लागली तरी फुगा फुटण्याची कायम शक्यता असते. किंबहुना फुगा फुगवणार्‍यांनीही तो आवाक्याबाहेर गेल्यास आपल्याच तोंडावर फुटू नये याची काळजी घ्यायची असते. त्याचे भान शहाण्या पत्रकारांनी किती सोडले आहे, त्याची साक्ष यानिमित्ताने मिळाली. उठलासुटला प्रत्येक शहाणा हार्दिक पटेल कसा मोदी व भाजपाला लोळवणार, त्याची ग्वाही देत होता. पण, त्यापैकी कोणालाच अलीकडे क्रिकेटच्या संघात अवतीर्ण झालेला आणखी एक हार्दिक अजिबात आठवला नाही, त्याचे नाव हार्दिक पंड्या असे आहे. तो प्रचलित नियम वा प्रथेनुसार क्रिकेट खेळत नाही. मुळात संघात गोलंदाज म्हणून दाखल झालेला हार्दिक पंड्या मधल्या फळीत फलंदाजीला जातो आणि असा काही धुमाकूळ घालतो, की खेळाची व सामन्याची दिशाच बदलून टाकतो.

हार्दिक पंड्या हा फलंदाजीला आला, मग समोरच्या संघातील भल्या भल्या गोलंदाजांना भीती वाटते. कारण हा फलंदाज कसाही बॅट फिरवत असतो. कुठल्याही चेंडूवर तो पुढे येऊन वा मागे जाऊन फटका हाणतो. कुठल्याही अभिजात क्रिकेट शैलीत बसणार नाही अशी त्याची फलंदाजी आहे. पण, त्याने चार पाच षटकांत घातलेल्या गोंधळामुळे संघाच्या खात्यात धावांची मोक्याच्या क्षणी भर पडते आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला धावांचा दर वा गती यांचे समीकरण विस्कटून जाते. आजच्या भारतीय राजकारणात नरेंद्र मोदी हा असाच एक खेळाडू आहे. तो कुठल्या शब्दावर, विषयावर किंवा आरोपावर कसा उलटा फटका हाणणार, याचाही विचार विरोधकांना आधीपासून करता येत नाही. सामना खेळायचा असतो तसाच जिंकायचाही असतो. त्यामुळे नुसत्या आवेश वा उत्साहाने काहीही होऊ शकत नाही. तर विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचे आणि त्यासाठी आपल्या विकेट जाण्याची फिकीर न करता समोरच्या गोलंदाज व क्षेत्ररक्षकांना पुरते नामोहरम करून टाकायचे; ही हार्दिक पंड्याची शैली आहे. नरेंद्र मोदी यांची निवडणुकीच्या आखाड्यातली शैली त्यापेक्षा तसूभर वेगळी नाही. पण, राजकीय अभ्यासक मोदींनी शिष्टाचार पाळला नाही म्हणून बोलतात आणि क्रिकेटचे समालोचक हार्दिक पंड्याने चुकीचा फटका मारला म्हणतात. मुद्दा खात्यात धावा जमण्याचा असतो, तसाच निवडणुकीत जागा जिंकण्याचा असतो. पण, हार्दिक पटेलच्या आरक्षण आंदोलनाच्या गर्दीत हरवलेल्या अभ्यासक विश्लेषकांना राजकारणात अवतरलेल्या हार्दिक पंड्याची दखल घ्यावी असेही वाटले नाही. मग त्याच राजकीय हार्दिक पंड्याने हाणलेला एखादा चेंडू षटकार येऊन त्यांच्या नाकावर आदळला तर चूक कोणाची? दोन गाडगीळातला फरक ज्यांना ओळखता येत नाही, त्यांची स्थिती कायम अशीच होत आलेली आहे.

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121