महाभारतातील कौरव-पांडव युद्धात पांडवांचा विजय का झाला आणि कौरवांचा पराभव का झाला, याचे वेगवेगळ्या लोकांनी विश्लेषण केले आहे. या चर्चेत पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी वेगळ्या प्रकारचा मुद्दा मांडला आहे. कौरव पक्षामध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण यांसारखे अनेक धुरंधर योद्धे कौरवांच्या बाजूने होते, पण व्यक्तिगत अस्मितेच्या प्रश्नामुळे हे सर्व योद्धे एकाच वेळी युद्धाला कधीच उभे राहिले नाहीत. युद्धापूर्वी झालेल्या सभेत सेनापतीपदाची सूत्रे हाती घेताच भिष्मांनी कर्णाला अर्धरथीपदाचा दर्जा दिला. महारथी असलेल्या कर्णाचा अभिमान त्यामुळे दुखावला गेला व भीष्म युद्धभूमीवर असेपर्यंत आपण लढाई करणार नाही, असे कर्णाने जाहीर केले. शिखंडी समोर आल्यानंतर सेनापती म्हणून युद्ध जिंकणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, याचा विसर पडून भीष्मानी आपले धनुष्य खाली ठेवले आणि अर्जुनाला त्यांचा पराभव करता आला. द्रोणाचार्यांनाही जेव्हा ’अश्वत्थामा मेला,’ अशी बातमी कळली तेव्हा त्यांनाही आपल्या सेनापतीपदाच्या जबाबदारीचा विसर पडला आणि ते शस्त्रविहीन अवस्थेत असताना धृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला.
अंतिम युद्धाच्या आधी इंद्राने कर्णाकडे याचकाच्या रूपाने येऊन कवचकुंडलांची मागणी केली. आपण कवचकुंडले दिल्यानंतर आपले अभेद्य संरक्षक कवच नाहीसे होईल, याची पुरेपूर कल्पना असतानाही कोणाही याचकाला विन्मुख हाती परत पाठवायचे नाही, या आपल्या प्रतिज्ञेचे पालन करण्याकरिता कर्णाने कवचकुंडलांचे दान दिले. या सर्व रथीमहारथींनी कौरवपक्षाच्या हितापेक्षा आपल्या प्रतिज्ञांना, अस्मितांना अधिक महत्त्व दिले. याचा परिणाम कौरवांच्या पराभवात झाला.
याउलट पांडवांकडे सर्व प्रमुख योद्ध्यांनी आपल्या पक्षाच्या हितासाठी आपल्या प्रतिज्ञापालनाला गौण स्थान दिले. स्वत: श्रीकृष्णानेच ’न धरी शस्त्र करी मी’ अशी प्रतिज्ञा केली होती, परंतु जेव्हा भीष्मापुढे टिकणे अर्जुनाला अशक्य झाले, तेव्हा रथाचे चाक हातात घेऊन त्याने आपला प्रतिज्ञाभंग केला. ’कोणाच्याही आडून शस्त्र चालवणार नाही,’ ही प्रतिज्ञा बाजूला ठेवून अर्जुनाने शिखंडीच्या आडून भीष्माचार्यांवर बाणांचा वर्षाव केला. सत्यवचनाबद्दल प्रसिद्ध असलेल्या युधिष्ठिराने अश्वत्थामा नावाच्या हत्तीची हत्या केल्यानंतर ’अश्वत्थामा मेला,’ ही बातमी द्रोणाचार्यांना सांगण्याचे काम केले. युधिष्ठिराने ती बातमी सांगितली. म्हणूनच द्रोणाचार्यांचा त्यावर विश्वास बसला. पांडवांच्या पक्षात मानापमानाचे, प्रतिज्ञाभंगाचे अनेक प्रकार झाले. प्रत्येक प्रसंगी श्रीकृष्णाने सर्व योद्ध्यांना त्यांच्या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली. पांडवांचा विजय हा अशा सामूहिक जबाबदारीच्या जाणिवेतून झाला होता.
ज्या समाजात सामूहिक हितापेक्षा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, अस्मिता, अहंकार वाढतात त्या समाजात कितीही कर्तृत्ववान व्यक्ती जन्माला आल्या तरी त्यांची समाज म्हणून प्रगती होत नाही. त्याकरिता समूहभावनेत राहण्याचे अनुशासन अंगी बाणून घ्यावे लागते. अनुशासनहीन व्यक्तिगत स्वातंत्र्याचे कौतुक करणारा एक गट अस्तित्वात असतोच. अशा वागण्याला तर्कशुद्ध आधारही देता येऊ शकतो. परंतु, जेव्हा सामूहिकरित्या एखादे उद्दिष्ट गाठायचे असते त्यावेळी अशा प्रकारचे व्यक्तिगत शौर्य पराभवाकडे नेणारे असते. इतिहासातील अनेक प्रसंग याला साक्षी आहेत.
शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केल्यानंतर अनेक किल्ले औरंगजेबाच्या हवाली केले. हे सर्व किल्ले जिंकताना शिवाजी महाराजांना आपले अनेक सहकारी गमवावे लागले होते. ’त्यांच्या रक्ताची किंमत मोजून जिंकलेले किल्ले महाराजांनी आपला जीव वाचविण्याकरिता औरंगजेबाला देऊन टाकले,’ असा आरोप कोणालाही करणे शक्य होते. महाराजांसमोर स्वराज्यनिर्मितीचे जे व्यापक ध्येय होते त्यासाठी याप्रसंगी त्यांना आपले एक पाऊल मागे घ्यावे लागले. महाराजांवर सहकार्यांचा विश्वास असल्यानेच हिंदू सिंहासनाची स्थापना होणे शक्य झाले. याउलट पानिपतच्या युद्धात तोफदळाचा प्रामुख्याने वापर करण्याचे ठरले होते. तोफदळाच्या आधारे हल्ला करताना आपल्या अंगी कितीही शौर्य असले तरी जोपर्यंत तोफांचे दळ आपले काम पूर्ण करत नाही, तोपर्यंत प्रत्येक विराला संयम पाळणे भाग असते. पानिपतच्या लढाईच्या आदल्या दिवशी या डावपेचाचे महत्त्व तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान लोधी याने सांगण्याचा प्रयत्न केला पण अशा प्रकारच्या सामूहिक डावपेचांच्या लढाईची सवय मराठी सैनिकांना नव्हती.
१८५७ च्या युद्धातील पराभवाचे प्रमुख कारणही ठरलेल्या दिवसाच्या आधी झालेल्या उठावात होते. आपल्या रोजच्या जीवनातही कोणतेही काम सामूहिकरित्या यशस्वी व्हायचे असेल तर त्याकरता एखादी गोष्ट मला बरोबर वाटते म्हणून करणे यापेक्षा ती करणे सामूहिक हिताचे ठरेल की नाही हा विचार करणे हिताचे असते. इस्त्रायल स्वतंत्र झाल्यानंतर त्याला अनेक ठिकाणांहून मदत आली तशी जर्मनीतूनही आली. त्या मदतीला कट्टरपंथी ज्यूंनी विरोध केला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उभारणी करण्याकरता जिथून मदत मिळेल तिथून ती घेणे आवश्यक होते. त्यामुळे अशा अतिरेकी गटांना बाजूला ठेवून मिळेल ती मदत घेऊन इस्त्रायलला आपली उभारणी करावी लागली. अनेकदा उत्साहातून व्यक्तिगत शौर्य हे अधिक महत्त्वाचे आहे, असे वाटू लागते. सामूहिक हिताचा विचार करणे म्हणजे आपल्या जीवनतत्त्वाशी केलेली तडजोड आहे, अशी भावना निर्माण होते. त्यात हौतात्म्याचा अभिमानही असतो परंतु, त्यातून दीर्घकालीन यश मिळत नाही. सर्वच विकसीत समाजांमध्ये कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीच्या प्रभावातून घटना घडू नयेत म्हणून अनेक प्रकारची नियंत्रणे आणलेली असतात. याचे कारणही हेच असते.
ज्या समाजात वा संस्थांमध्ये आंतरिक चर्चांना पुरेसा वाव असतो, परंतु कृती करताना मात्र सामूहिक हिताचा विचार करूनच कृती केली जाते त्याच संस्था वा समाज आपले सामूहिक कर्तृत्व सिद्ध करू शकतात. याकरता महाभारतातील श्रीकृष्णाप्रमाणे सामूहिक हिताची सैदव आठवण करून देणार्या व्यक्ती निर्णय घेण्याच्या प्रमुख स्थानी असाव्या लागतात; नाहीतर व्यक्तिगत आवडीनिवडी अस्मिता, अहंकार, आपलेच मुद्दे महत्त्वाचे वाटण्याचा अभिनिवेश अशा वेगवेगळ्या कारणांतून बेबंदशाही माजायला किंवा अराजक निर्माण व्हायला वेळ लागत नाही. या रोगापासून बचाव करता न आल्याने अनेक नि:स्वार्थ लोकांच्या संघटनाही मोडीत निघाल्या आहेत. स्वार्थी लोकांना निदान स्वार्थाचे तरी बंधन असते. नि:स्वार्थी लोकांना तेही नसते. त्यामुळे सामूहिक हिताचा विवेक बाळगला नाही तर त्यांच्या अहंकाराला आणि त्यातून निर्माण होणार्या विध्वंसक शक्तींना मर्यादा राहत नाही.
- दिलीप करंबेळकर