अहमदाबाद : अमरनाथ यात्रेसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने अमरनाथ यात्रेत मंत्र व जयजयकार यांच्यावर घातलेल्या बंदीवर विश्व हिंदू परिषदेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. विश्व हिंदू परिषदेने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे त्यामध्ये हा आदेश तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशात केवळ हिंदूच्याच धार्मिक श्रद्धा व भावना यांनाच लक्ष्य केले जाते, हे तातडीने बंद व्हायला हवे. जगभरात निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या समस्येला फक्त हिंदू समाजालाच जबाबदार धरले जाते. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणे हा अशा संस्थांचा एक कलमी कार्यक्रम असतो व त्यामुळेच काहीही विचार न करता असे आदेश दिले जातात असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव डॉ. प्रवीण तोगडिया यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांना दुखावणे बंद करावे व अमरनाथ यात्रेवर जारी केलेला हा तुघलकी फतवा ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे.