सुमित घरात आला, तसं दुर्गाबाईंनी त्याच्या हातात प्रसादाचा लाडू ठेवला.
“कसला प्रसाद आहे आजी?”, सुमितने विचारले.
“अरे, काल दत्त जयंती निमित्त संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होता. त्याचा प्रसाद आहे.”, दुर्गाबाई म्हणल्या.
“मस्त आहे!”, सुमित लाडू खात म्हणाला, “आबा, आज तुम्ही वेदातली प्रजापतीची गोष्ट सांगणार ना?”
“सुम्या, आधी तुला मागचे काय काय आठवतंय ते सांग, म्हणजे तिथून पुढे गोष्ट सुरु करु.”, आबा म्हणाले.
“आबा, आतापर्यंत आपण असे पहिले की –
⦁ प्रजापती = वर्ष
⦁ वर्षातील ३६५ दिवस = प्रजापतीची प्रजा
⦁ प्रजापती = वर्षभर ठराविक दिवसांना केलेले यज्ञ.
हे यज्ञ दिवसाच्या, महिन्याच्या, ऋतूच्या आणि वर्षाच्या सुरुवातीला केले जात असत. “, सुमितने सांगितले.
“शाब्बास सुमित! आता तुला पुढची गोष्ट सांगतो. म्हणजे खरेतर मागची गोष्ट! वैदिक काळातली. त्या काळात विद्वानांना, कवींना आकाशातील चित्र कसे दिसले ते या गोष्टीत रंगवले आहे. ती गोष्ट अशी आहे की -
“प्रजापतीने मृगाचे रूप घेतले, आणि तो आकाशात झेपावला. या मृगाला मोठी शिंगे आहेत, त्याच्या पाठीवर पांढरे ठिपके आहेत, तो वाऱ्यासारखा चपळ आहे, मोठा डौलदार आहे, रुबाबदार आहे आणि अतिशय भव्य आहे! या मृगाच्या मागे एक शिकारी लागला आहे. हा शिकारी आहे – रुद्र! रुद्र, अर्थात शंकर! या उग्र शिकारी रूपातील शंकराच्या हातात पिनाकिन धनुष्य आहे! त्याच्या बरोबर दोन शिकारी कुत्रे आहेत. या अक्राळ विक्राळ कुत्र्यांना चार चार डोळे आहेत. हे श्वान प्रजापतीचा माग काढत निघतात. वसंत संपात बिंदुजवळ मृग रूपातील प्रजापती रुद्राच्या दृष्टीस पडतो. त्यासरशी रुद्र एक सुसाट बाण सोडतो. हा बाण वाऱ्याच्या वेगाने मृगाच्या शरीरात शिरतो ... आणि मृगरूप प्रजापती मरतो!”
“ओह नो!! प्रजापती मरतो? अशी कशी गोष्ट? मग यज्ञ, वर्ष कसे चालणार?”, सुमितने विचारले.
“अरे, वसंत संपातला जुने वर्ष संपले ना! म्हणून प्रजापतीला मारले. मग नवीन वर्ष सुरु! तुला लक्षात येईल आजही आपण गुढी पाडव्याला, म्हणजे वसंत संपातच्या जवळच्या प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु करतो. आणि नवीन वर्षाला कॅलेंडरचे काय करतो?”, आबांनी विचारले.
“जुने कॅलेंडर रद्दीत टाकून नवीन कॅलेंडर भिंतीवर लावतो!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“तेच सांगितले आहे या गोष्टीत! जुने वर्ष संपले, आता नवीन सुरु!”, आबा म्हणाले.
“बापरे! ‘नवीन कॅलेंडर लावा’ हे सांगायची शिवाची पद्धत भारीच आहे!”, सुमित म्हणाला.
“मग? असा काळावर राज्य करणाऱ्या रुद्राला उगीच नाही ‘महाकालेश्वर’ म्हटलंय! काळाचा ईश्वर आहे तो!”, आबा ऐटीत म्हणाले.
“आबा, हे सगळ वर्णन आकाशातील मृगनक्षत्राचे आहे ना?”, सुमितने विचारले.
“अगदी बरोबर सुमित! काय सुंदर कल्पना रंगवल्या आहेत बघ. चित्र कसे आहे पहा –
“ही अशी आकाशगंगा वाहते. या नदीला वेदात ‘रसा’ म्हणले आहे. तिच्या एका काठावर एक भव्य मृग आहे. त्याच्या मागे आकाशातील सर्वात तेजस्वी तारा, व्याध किंवा Sirius आहे. अर्थात रुद्र! रुद्राने तीन चांदण्यांचा बाण मृगाला मारला आहे. नदीच्या अलीकडे एक मोठे कुत्रे आणि पलीकडे एक लहान कुत्रे आहे.
“कधी काळी, मृगशीर्ष नक्षत्रा जवळ वसंत संपात बिंदू होता. अर्थात त्याच्या एका बाजूला उत्तरायण / देवलोक आणि एका बाजूला दक्षिणायन / पितृलोक. देवलोकाचा अधिपती इंद्र. तर पितृलोकाचा अधिपती यम. या दोन्ही लोकांच्या मध्ये रसा नदी. इथे जणू काही एक द्वार आहे, एका लोकातून दुसऱ्या लोकात जायला. सहजच या द्वारात रक्षणासाठी दोन भयंकर कुत्रे ठेवली आहेत. महाश्वान आणि लघुश्वान अर्थात Canis Major आणि Canis Minor हे तारका समूह.”, आबा म्हणाले.
“बापरे! ‘कुत्र्यापासून सावध रहा!’ अशी पाटी लावायला हवी तिथे!”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“आहेच तिथे असा सावधानतेचा इशारा! कसे आहे? मृत्यु पश्चात या द्वारातूनच आत्मा यमाकडे पितृलोकात जातो असा समज आहे. त्यामुळे या द्वारावर सावधानतेचा इशारा दिला आहे - सावधान! कसा वागला आहेस जन्मभर? पुण्य केलं असेल, तर रसा नदी ओलांडायला नाव मिळेल! पुण्य गाठीशी नसेल तर, जा रसातळात! ही नाव आहे ‘नौ:’ अथवा Argo Navis नावाचा नावेच्या आकाराचा तारका समूह.”, आबा म्हणाले.
“Oh! I see! दक्षिणेचा अर्थात पितृलोकाचा अधिपती यम. आत्मा तिकडे जातो. पण आबा, रुद्राचे वास्तव्य स्मशानात असते असे म्हणले जाते. ते का?”, सुमितने विचारले.
“आकाशातील पितृलोकाच्या दाराशी व्याध उभा आहे. तसे पृथ्वीवरील यमलोकाच्या द्वारात म्हणजे स्मशानात पण रुद्र हवा ना! म्हणून रुद्र त्याच्या भूतगणांसोबत स्मशानात असतो, असे मानले जात असावे!”, आबा सांगत होते.
“आबा, ही गोष्ट एखाद्या fantasy movie मधली वाटते! भव्य आणि दिव्य तर आहेच! पण त्याहून अधिक म्हणजे आकाशातील निरीक्षणाला धरून केलेले वर्णन आहे!”, सुमित आश्चर्याने म्हणाला.
“शंकरराव, पण एक प्रश्न आहे. आपण मृगशीर्ष नक्षत्रातली पौर्णिमा, दत्त जयंती म्हणून साजरी करतो. त्याच्या मागे काय कारण आहे?”, दुर्गाबाईंनी विचारले.
“कसे आहे, दत्त हा देव वैदिक काळाच्या नंतरचा असला तरी मृगशीर्ष नक्षत्राशी निगडीत आहे. कसे पहा - एक म्हणजे ब्रह्माला प्रजापती म्हणले आहे. दुसरे असे की, गीतेत भगवान विष्णु स्वत:ला ‘महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे’ असे म्हणतात. आणि तीन, रुद्र या नक्षत्रात आहेच. असे ब्रह्मा – विष्णु – महेशाचे अस्तित्व मृगशीर्ष नक्षत्रात पाहायला मिळते. त्यामुळे कदाचित मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जात असावी.”, आबा म्हणाले.
References -
१. The Orion – B. G. Tilak
२. Antiquity of the Hindu Calender- Kishore S Kumar
३. मराठी विश्वकोश
- दिपाली पाटवदकर