शिल्पकथा - कांचिपुरमची भिक्षाटनशिवमूर्ती

    11-Dec-2017   
Total Views | 12


 
दक्षिण भारतातल्या उत्तुंग शिवमंदिरांमधून श्री शिव शंकरांच्या मूर्तींचे शिवागम ग्रंथांमधून वर्णिलेले अनेक अविष्कार मंदिरांच्या बाह्य भिंतींवर आणि स्तंभांवर कोरलेले असतात. शंकरांची पार्वतीशी विवाह करतानाची कल्याणसुंदरमूर्ती, अंधकासुराचा वध करतानाची अंधकासूरवध मूर्ती, नृत्यमग्न शिवतांडव मूर्ती, शिव-पार्वती सोबत कार्तिकेय असलेली सोमस्कंदमूर्ती, प्रकृती आणि पुरुष ही सृष्टीचे दोन वेगळी तरीही परस्परांना पूरक अशी तत्वे आहेत हे दर्शवणारी अर्धनारीनटेश्वराची मूर्ती, उग्र अशी भैरवमूर्ती, सौम्य अशी ध्यानमग्न दक्षिणामूर्ती शिवाची मूर्ती असे कितीतरी शिवमूर्तींचे नयनमनोहर अविष्कार आपल्याला दक्षिणेतल्या शिवमंदिरांमधून दिसतात.
 
चेन्नईजवळचे कांचीपुरम ह्या शहरात तर अक्षरशः पावलागणिक एक मंदिर आहे. पल्लव राजवंशाची कांचीपुरम ही राजधानी होती. साक्षात कालिदासासारख्या प्रतिभावंतांने ह्या नगराचे वर्णन 'नगरेषु कांची' असे केलेले आहे. कांचीपुरम मध्ये शिवाची, विष्णूची आणि देवीची मिळून हजारभर तरी लहान-मोठी मंदिरे असतील. त्यातले सगळ्यात पुरातन मंदिर म्हणजे 'कैलासनाथार कोविल'. सध्याच्या कांची शहराच्या एका कोपऱ्यात असलेले हे भव्य मंदिर इसवीसनाच्या सातव्या शतकात पल्लव राजा राजसिंह नरसिंहवर्मन दुसरा ह्याने बांधायला सुरवात केली. पुढे त्याचा मुलगा महेंद्रवर्मन तिसरा ह्याने हे मंदिर पूर्ण केले. दगडावर दगड रचून बांधलेले हे पल्लव शैलीतले पहिले मंदिर. ह्याआधी पल्लवांनी महाबलीपूरमची एकपाषाणी मंदिरे बांधली होती आणि कदाचित लाकडी मंदिरेही बांधली असावीत, पण काळाच्या ओघात ती लुप्त झाली. पण कांचिपुरमचे कैलासनाथ मंदिर मात्र आज इतक्या शतकांनंतरही दिमाखात उभे आहे. ह्या मंदिराचा पाया आणि बाहेरची दर्शनी भिंत ही कठीण अश्या ग्रॅनाईट दगडात बांधलेली आहे पण आतल्या मंदिरासाठी काहीसा मऊ असा वालुकाष्म दगड वापरलेला आहे. काळाच्या ओघात हा वालुकाष्म दगड काहीसा झिजून गेलाय आणि त्यामुळे बऱ्याच शिल्पांचे बारकावे आणि चेहेऱ्यावरचे भाव आता तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत, तरीही जे उरलंय ते इतकं भव्य आणि सुंदर आहे की हे मंदिर बघायला आलेली व्यक्ती भारावून गेल्याशिवाय रहावत नाही.
ह्या लेखाची ऑडिओ क्लिप येथे एेका -
 
 
 
 
आज आपण जे शिल्प बघणार आहोत ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर आहे. हे शिल्प आहे भिक्षाटन शिवमूर्तीचे. कूर्म पुराणात अशी कहाणी सांगितलेली आहे आहे की दारुकावनात काही ऋषी यज्ञादी कर्मकांडात मग्न होते. पण स्वतःच्या ज्ञानाची त्यांना इतकी गुर्मी चढलेली होती की भक्ती आणि सांख्य ही तत्वज्ञाने जणू ते विसरूनच गेले होते. त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून साक्षात श्री शिवशंकरानी भिक्षा मागून पोट भरणाऱ्या भटक्या साधूचं रूप घेतलं आणि ते दारुकावनात आले. सुंदर जटाभार, घुंगुर लावलेली काठी आणि प्रमाणबद्ध शरीर असलेल्या ह्या सुंदर साधूला बघून दारुकावनातल्या ऋषीपत्नी त्याच्यावर मोहित झाल्या आणि आपापले कामधाम सोडून त्याच्यापुढे हात जोडून उभ्या राहिल्या. आपल्या सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा गर्व असलेल्या ऋषींना साहजिकच ह्याचा राग आला आणि ते संतापून ह्या भिक्षाटन करणाऱ्या योग्याला शिव्या द्यायला लागले, त्याच्या पाठी त्याला मारायला धावले. पण त्यांच्या शापांचा आणि माराचा श्री शंकरावर काहीच परिणाम होईना. शंकरांच्या तोंडावरचे मंद हास्य काही जाईना. शेवटी श्रीशंकरांनी आपले खरे स्वरूप ऋषींना दाखवले आणि त्यांची चुक त्यांना उमगून ते शिवाची आराधना करायला लागले.
 
 
कैलासनाथ मंदिरातला हा भिक्षाटन शिवाचा शिल्पपट्ट अतिशय सुंदर आहे. शिवाच्या मस्तकावर कमरेपर्यंत रुळणारा कुरळा जटाभर आहे. एका खांद्यावर त्यांनी गुराख्यासारखी घुंगराची काठी धरलेली आहे. एक पाय चालण्याच्या अविर्भावात उचललेला आहे. दोन्ही पायात नक्षीदार खडावा आहेत. खांद्यावर यज्ञोपवित आहे. कमरेला लज्जारक्षणापुरते कटिवस्त्र आहे, आणि चेहऱ्यावर अर्धस्फुट असे मंद स्मित आहे. त्यांच्या पुढे ऋषीपत्नी हात जोडून भक्तिभावाने त्यांना शरण आलेल्या आहेत तर वरच्या कोपऱ्यात संतापून श्री शंकरांवर हात उगारणाऱ्या ऋषींच्या चेहेऱ्यावरचा क्रोध स्पष्ट दिसतोय. जवळजवळ दहा फूट उंचीची ही भव्य भिक्षाटन शिवमूर्ती आहे. शिवांच्या चालण्यातला डौल, त्यांचे बांधेसूद शरीर, चेहऱ्याचा देखणेपणा सर्व काही अतिशय सुंदर रीतीने शिल्पकाराने दाखवलेले आहे. हे शिल्प एका जागी थिजलेले वाटतच नाही. असं वाटतं की कुठल्याही क्षणी शिव दुसरे पाऊल उचलून चालायला लागतील. अतिशय देखणे असे हे शिल्प घडवणाऱ्या अनामिक शिल्पकाराच्या अलौकिक प्रतिभेचा सन्मान करायला तरी हे शिल्प बघायला कांचीपुरमला जावंच लागेल.
- शेफाली वैद्य

शेफाली वैद्य

सोशल मीडियावर विविध विषयांवर अभ्यासपूर्ण तरीही रंजक शैलीत लेखन करणाऱ्या मोजक्या लोकप्रिय लेखिकांमध्ये शेफाली वैद्य ह्यांचे नाव गणले जाते. शेफाली वैद्य यांनी पुणे विद्यापीठातून संज्ञापनशास्त्र आणि पत्रकारिता ह्या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्या मिडिया क्षेत्रात सतत कार्यरत आहेत. दूरचित्रवाणी, सोशल मिडिया, डॉक्युमेंटरी, आंतरजाल इत्यादी विविध क्षेत्रांत त्यांनी काम केलंय. त्या मराठी, इंग्रजी आणि कोंकणी अशा तिन्ही भाषांतून सातत्याने लेखन करीत असतात.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121