पाच वर्षांतला फरक

    10-Dec-2017   
Total Views | 5

गेल्या २२ वर्षांत गुजरातमध्ये कुठलाच बदल झाला नाही की विकास झाला नाही, या भूमिकेतून कॉंग्रेस व राहुल गांधी यांनी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. वादासाठी राहुलचा हा आरोप मान्य करूयात. गुजरात बदलला नसेल, पण खुद्द कॉंग्रेस तरी नक्कीच बदलली आहे. कारण मागल्या सतरा वर्षांत प्रथमच गुजरातमध्ये दंगल वा मुस्लीम हा विषय कुठल्या कुठे बेपत्ता झाला आहे. आज अनेकांना एक गोष्ट आठवत नाही. अगदी आपल्याला सर्वात शहाणे समजणार्‍या पत्रकार वाहिन्यांनाही विस्मृतीचा झटका आलेला आहे. मागल्या विधानसभा निवडणुकीत हेच लोक एका मौलवीचे चित्रण लाखो वेळा सातत्याने प्रक्षेपित करीत होते. आज तो मौलवी आणि तशा मुस्लीम टोप्या घातलेले लोक कोणीही वाहिनी कटाक्षाने दाखवायचे टाळत आहे. हा महत्त्वपूर्ण बदल नाही काय? त्या निवडणुकीत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महिनाभर राज्यव्यापी सद्भावना यात्रा काढलेली होती. त्या यात्रेच्या एका सोहळ्यात एक मौलवी त्यांच्यापर्यंत व्यासपीठावर पोहोचला आणि त्याने मोदींना इस्लामी टोपी देऊ केली होती, पण मोदींनी नम्रपणे ती टोपी नाकारली होती. त्या सगळ्या प्रचारात मोदी कुठेही हिंदू-मुस्लीम शब्द बोलत नव्हते, तर फ़क्त साडेपाच कोटी गुजराती समाजाच्या विकासाच्या प्रगतीच्या गोष्टी बोलत होते. उलट प्रत्येक विरोधक व पत्रकार मोदींना केवळ मुस्लीम टोपी कशाला नाकारली, म्हणून एकच प्रश्न सातत्याने विचारत होता. तेव्हा गुजरातला विकासाची गरज नव्हती आणि तिथले सर्व प्रश्न केवळ मुस्लीम टोपी घालून सुटणार होते काय? नसेल तर तो प्रश्न लाखभर वेळा कशाला विचारला गेला होता आणि आज तोच प्रश्न वा विषय गायब कशाला झाला आहे? आज कोणी मुस्लीम वा टोपीविषयी कशाला बोलत नाही?
थोडक्यात बाकी काही बदल मोदी व भाजपच्या कारकिर्दीत झालेला नसेल, तरी एक मोठा मूलभूत फ़रक मागल्या पाच वर्षांत पडलेला आहे आणि तो म्हणजे मुस्लीम व्होटबँक नावाचे थोतांड निकालात निघालेले आहे. आज कोणी किती मुस्लिमांना उमेदवारी दिली असा प्रश्न भाजपला केलेला नाही, किंवा कॉंग्रेसनेही किती मुस्लीम उभे केलेत याची चर्चा कुठे कानावर आलेली नाही. पाच वर्षात एक मोठा बदल राजकीय विश्लेषणात व कॉंग्रेसच्या राजकीय आकलनात आलेला आहे आणि तो म्हणजे गुजरातमध्ये मुस्लीम लोकसंख्या ८-९ टक्के आहे, याचे तमाम सेक्युलर पुरोगाम्यांना पुरते विस्मरण होऊन गेलेले आहे. कुठल्या बातमीपत्रात मुस्लिमांचा उल्लेख येत नाही किंवा कुठल्या वाहिनीच्या निवडणूक बातम्यांमध्ये मुस्लीम टोप्या घातलेले पुरुष वा बुरखेधारी महिलांना कोणी दाखवत नाही. गुजरातच्या जुन्या दंगलीत बेघर झालेले लोक किंवा तिथे हिंदू मुस्लीम, अशी पडलेली दुफळी कोणाला आठवेनाशी झाली आहे. मोदी वा भाजपने हा किती मोठा बदल मागल्या पाच वर्षांत घडवून आणला आहे ना? एकूणच पुरोगामी व कॉंग्रेसी विचारसरणीत हा आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांना आता मुस्लिमांच्या न्यायाची वा हक्काची फिकीर राहिलेली नाही तर हिंदू मंदिरे व त्याला भेटी देण्याचे अगत्य पुरोगाम्यांना वाटू लागलेले आहे. त्या कालखंडात मोदींनी कुठल्या मंदिराला भेट दिली, तर त्याला हिंदुत्व चिकटविणारेच आता राहुलच्या मंदिर भेटीविषयी प्रश्न विचारत नाहीत. उलट राहुल व त्यांचे कुटुंबीय कसे शिवभक्त वगैरे आहेत, त्याची कौतुके सांगितली जात असतात. बदल असा क्रमाक्रमानेच होत असतो. हळूहळू देशाचा प्रश्न हिंदू-मुस्लिमांचा नसून कुठलीही धर्माची टोपी घातल्याने त्या धर्माच्या लोकांना न्याय मिळतो, असल्या भ्रमातून पुरोगामी बाहेर पडलेले असतील, तर त्याचे श्रेय मोदींना द्यावेच लागेल.
गेल्या २२ वर्षांत भाजपने काय केले किंवा गुजरातमध्ये काय झाले, असा प्रश्न विचारणार्‍यांना आपल्या आयुष्यात व विचारात किती बदल झाला आहे, त्याचेही भान नसेल तर त्यांची कीव करावी लागेल. कारण बदल गुजरातच्या मतदारांत वा भाजपमध्ये झालेला नाही. ते आपल्या जागी तसेच आहेत आणि शहाण्यासारखा विचार करू शकत आहेत. बदल झाला आहे, तो पुरोगामी म्हणविणार्‍या शहाण्यांमध्ये झालेला आहे. त्यांना हिंदू- मुस्लीमहा वादाचा विषय नसल्याचा साक्षात्कार प्रथमच झाला आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तसे हे लोक आज दंगलीचा विषय बाजूला ठेवून मोदींना विकासाविषयी प्रश्न विचारत असतात. पाच वर्षांपूर्वी मोदी सातत्याने विकास व प्रगतीच्या गोष्टी बोलत होते, तेव्हा यापैकी किती लोकांना विकासाचा तपशील ऐकून घेण्याचा संयमहोता? उलट भाजप वा मोदींनी किती विकासाच्या गोष्टी केल्या तरी हे पुरोगामी लोक कुठूनही विषय मुस्लीमव दंगलीकडे घेऊन यायचे. त्यांना असल्या प्रश्नांचे उत्तर तेव्हाही गुजरातच्या मतदाराने दिलेले होते आणि नंतर दीड वर्षांनी देशभरच्या मतदाराने चोख उत्तर देऊन चपराक हाणलेली होती. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यावर आता हे लोक मोदींना विकासाच्या विषयावर बोलायचा आग्रह धरत आहेत. मग मोदी कधी त्या विषयावर बोलत नव्हते? तुमची ऐकण्याची तयारी होती काय? असा प्रश्न कोणी केलाच तर मोदी यांना सुनावत होते, तुमची सुई २००२ मध्येच अडकून पडलेली आहे आणि गुजरात कधीच पुढे निघून आलेला आहे. मग मुद्दा असा येतो की, मोदींनी काय बोलावे किंवा काय विषयाचा ऊहापोह करायचा, हे मोदींंना स्वातंत्र्य नाही काय? विरोधकांना हव्या त्या विषयावर बोलण्याचीच सक्ती घटनेने व लोकशाहीने मोदींवर केलेली आहे काय? नसेल तर असली बाष्कळ बडबड तेव्हा कशाला चालली होती? आणि आज विकास कशाला आठवला आहे?
जगाचा इतिहास तपासला तर शहाण्यांनी कधी इतिहास घडवला नाही किंवा बदलला नाही. सामान्य लोकांनी व त्यांना प्रिय असलेल्या नेत्यांनी जे कर्तृत्व गाजवले त्यातून जगाचा चेहरामोहरा बदलत राहिला आहे. शहाण्यांना त्याचा साक्षात्कार होईपर्यंत जग आणखीनच बदलून गेलेले असते. इतिहासाचे विश्लेषण करणार्‍यांना कधी इतिहास घडत असताना त्याचे आकलन झाल्याचाही इतिहास नाही. वर्तमान समजून घेण्यापेक्षा कायमइतिहासात रमलेल्यांना वर्तमानाचे आकलन होत नाही. म्हणूनच त्यांना त्यात बदलत चाललेला इतिहास ओळखता येत नाही. मात्र सामान्य जनतेला तो बदल कळत असतो आणि त्यात सामान्य लोक उत्साहाने सहभागी होत असतात. त्या गडबडीत आपणही किती बदलून गेलो, तेही ज्यांना उशिरा उमजते, त्यांना शहाणे म्हणून मिरवण्याची हौस असते. म्हणूनच पाच वर्षांपूर्वी गुजरात कसा बदलत होता, ते ज्यांना उमगलेले नव्हते, त्यांना आजही गुजरात किती बदलून गेला आहे, ते अजून समजलेले नाही. आपल्यातला बदल त्यांना समजू शकलेला नाही. तसे नसते, तर त्यांनी विकासावर मोदी का बोलत नाहीत, असा खुळचट प्रश्न विचारला नसता. ’इंडिया टुडे’ वाहिनीचा कार्यकारी संपादक राहुल कन्वल आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, ’’इतर राज्यांपेक्षा गुजरातमध्ये निवडणुकांची बातमीदारी करणे सुखदायक असते. इथे रस्ते सुसज्ज आहेत, सर्वत्र अनेक सुविधा आहेत. धावपळ नाही, तारांबळ नाही.’’ इतक्या सुखासमाधानाने जर त्याला बातमीदारी करता येत असेल, तर विकासाचाच तो परिणामअसल्याचे त्याच्या डोक्यात का शिरत नाही? कारण तो तथाकथित बुद्धिमंत आहे आणि त्याला डोळ्यांना दिसणारे वा ज्ञानेंद्रियांना अनुभवणारे सत्य समजून घेता येत नाही, म्हणून तो बुद्धिमान असतो. ही देशातल्या पत्रकार, माध्यमे, जाणकार व विश्लेषकांची शोकांतिका होऊन बसली आहे.
 
भाऊ तोरसेकर 

भाऊ तोरसेकर

लेखक सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

तैमूर नगर परिसरातील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; बांगलादेशींची १०० हून अधिक घरे जमीनदोस्त!

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डीडीए प्रशासनाने पोलिस आणि इतर विभागांसह सोमवार, दि. ५ मे रोजी तैमूर नगर नाल्याभोवतीच्या अतिक्रमणांविरुद्ध मोठी कारवाई केली. नाल्याच्या नऊ मीटर परिसरात असलेल्या अनेक बेकायदेशीर इमारती आणि त्यांच्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी नाल्याजवळील जमिनीवर अतिक्रमण केले होते. आतापर्यंत, बेकायदेशीरपणे बांधलेली १०० हून अधिक घरे आणि दुग्धशाळा पाडण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिस ..

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

शासकीय कामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध : कृषी आयुक्त सुरज मांढरे

(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121