मूर्तिपूजा हे हिंदू उपासना पद्धतीचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पण तसे पाहिले तर मूर्त प्रतीकांची उपासना सर्वच धर्मांमध्ये आहे. जैन व बुद्ध धर्मांमध्ये बुद्धाच्या व तीर्थांकरांच्या मूर्तींची उपासना होते. शीख धर्मात गुरूंची चित्रे व गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे प्रतीक जो ग्रंथ, त्याची उपासना केली जाते. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्ताचे प्रतीक म्हणून क्रुसाची उपासना तर होतेच पण ख्रिस्ताच्या आणि त्याच्या आईच्या म्हणजे मेरीच्या मूर्तींचीही पूजा होते. वेगवेगळ्या संतांच्या मूर्तींची पूजा होते. अगदी जे धर्म 'मूर्तिपूजक' म्हणून इतरांची हेटाळणी करतात ते धर्मही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मूर्त प्रतीकांची उपासना करतातच. मक्केला जाऊन काब्याला प्रदक्षिणा घालणे म्हणजे तरी दुसरे काय आहे?
हिंदुधर्मात मूर्तिपूजा महत्वाची मानली जाते, त्यामुळे साहजिकच आपल्याकडे मंदिर शिल्पे फार मोठ्या प्रमाणावर घडवली गेली. पण त्याचबरोबर हेही स्पष्ट केले गेले की निर्गुण, निराकार अशा ईश्वरतत्वाची उपासना सामन्यांसाठी अवघड आहे म्हणून सगुण, साकार अशा मूर्तींची आराधना भक्तांनी करावी. रामतापनीय उपनिषदात असं स्पष्ट म्हटलंय की
'चिन्मयस्याद्वितीयस्य, निष्कलस्याशरीरिण:
उपासकानां कार्यार्थ ब्रह्मणो रूपकल्पना'
(परब्रह्म हे चिन्मय, अद्वितीय, निष्कल आणि शरीरातीत आहे, पण उपासकांच्या कार्यासाठी त्याची रूप कल्पना केली गेली)
आज आपण बघणार आहोत ते अद्वितीय शिल्प कांचिपुरमच्या कैलासनाथ मंदिराच्या दर्शनी भागावर कोरलेले दक्षिणामूर्तीचे शिल्प आहे. श्री शंकर हे सर्व देवांचे अधिपती, आद्य योगी आणि संगीत, नृत्य इत्यादी अभिजात कलांचे प्रणेते. शिव म्हणजे मंगलमय आणि कल्याणकारी असे ईश्वरतत्व. प्रलयकाळात सृष्टीचा संहार करणारे शिव सृजनाला, नवनिर्मितीला वाट करून देतात. अमंगल, मलिन असे जुने काढून टाकल्याखेरीज नवीन निर्मिती होत नाही. म्हणूनच प्रलयकाळी तांडव करून श्री शंकर सृष्टीचा विनाश करतात आणि त्यातूनच नवीन सृष्टी जन्माला येते. शिव आगम ग्रंथानुसार शिवाचे कित्येक अवतार वर्णिलेले आहेत. दक्षिणेतल्या भव्य शिवमंदिरांमधून आपल्याला हे सर्व अवतार शिल्पांकित केलेले दिसून येतात.
जगाला ज्ञान देणारा आदी योगी असे शिवाचे सौम्य, कल्याणकारी स्वरूप म्हणजे दक्षिणामूर्ती. श्री शंकराच्या ह्या स्वरूपाची उपासना करताना भक्तांनी त्याच्याकडे मेधा म्हणजे बुद्धीच मागायची असते. भक्तांना अद्वैत तत्वज्ञानाचे ज्ञान देण्यासाठी श्री शिव शंकरांनी हे रूप धारण केले अशी कथा आपल्याकडे सांगितली जात ते. श्री दक्षिणामूर्तीचे शिल्प नेहमी मंदिराच्या दक्षिणेकडे कोरले जाते. कैलासनाथ मंदिराच्या दर्शनी भागात कोरलेली ही दक्षिणामूर्ती, शिवाचा शिल्पपट्ट म्हणजे पल्लव शिल्पकलेचा एक सर्वांगसुंदर अविष्कार आहे.
ज्ञानाचे प्रतीक असलेल्या वटवृक्षाखाली शिव एका पीठावर बसलेले आहेत. एक पाय दुसऱ्या पायावर दुमडून त्यांनी योगपट्ट बांधलेला आहे. चेहरा अत्यंत सौम्य आणि सुंदर आहे. शिवाच्या मुखावर जाणवेल असे शांत हास्य आहे. केसांचा जटामुकुट असलेली ही मूर्ती चतुर्भुज आहे. डाव्या बाजूच्या एका हातात अक्षमाला आहे तर दुसरा हात तुटलेला आहे. त्या हातात सहसा अमृतकलश असतो कारण ज्ञानाने अमरत्व प्राप्त होते. उजवीकडच्या एका हातात अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करणारा अग्नी आहे तर दुसरा हात ज्ञानमुद्रेत आहे. शंकरांच्या छातीवर यज्ञोपवित रुळते आहे. वासनांचे प्रतीक असणारा सर्प एका कोपऱ्यात वेटोळे घालून बसलेला आहे. शंकरांच्या पीठाखाली दोन कुरंग म्हणजे हरणे बसलेली आहेत. कटिवस्त्राची दोन्ही टोके खालपर्यंत रुळत आहेत.
शिल्पकाराने हे शिल्प मोठया खुबीने घडवलेले आहे. दुमडलेल्या पायाचा तळपाय बघा कसा अप्रतिम कोरलाय. तळपायाचे फुगवटे, अंगठ्यासहित इतर बोटांची गोलाई, टाचेचा किंचित उचललेला गोलाकार, मांसल भाग, सर्व काही जसेच्या तसे शिल्पांकित केले गेलेले आहे. शिव ज्या पीठावर बसले आहेत त्या पीठाला सावली देणाऱ्या वटवृक्षाचे खोड, त्याची घनदाट पाने, फांद्यांवर बसलेले पोपट सर्व काही अत्यंत नजाकतीने कोरले आहे. दक्षिणामूर्तीची मुखमुद्रा तर निव्वळ अप्रतिम! कोपऱ्यात यती-मुनी आहेत. दक्षिणामूर्ती शिव म्हणजे विद्या, कला, ज्ञानाचा अधिष्ठाता. म्हणून ज्ञानाचे उपासक ह्या मूर्तीची आराधना करतात. आदी शंकराचार्य ह्याच दक्षिणामूर्तीचे उपासक होते.
दक्षिणामूर्ती शिवाचे वीणाधर, व्याख्यान, योग्य आणि ज्ञान ह्या चार स्वरूपात अंकन होते असते. ही मूर्ती ज्ञान स्वरूपातली आहे. ही मूर्ती जिथे कोरली आहे, त्याच्या विरुद्ध बाजूच्या दार्शनिकेत ध्यानाला बसण्यासाठी म्हणून मोठे कोनाडे केलेले आहेत. त्यातल्या एखाद्या कोनाड्यात बसून दक्षिणामूर्ती शिवाकडे एकाग्रपणे लक्ष केंद्रित करून काही काळासाठी शांत बसणे हा खरोखरच एक शब्दातीत अनुभव आहे.
-शेफाली वैद्य