चौथ्या क्रांतीच्या सीमेवर...

    30-Nov-2017   
Total Views | 4



 

माणसाने जेव्हा शेती करायला प्रारंभ केला, त्यावेळी मानवी जीवनातील पहिली क्रांती झाली. त्यापूर्वी त्याला आपला चरितार्थ चालविण्यासाठी जंगलात भटकावे लागत असे. परंतु, शेतीमुळे त्याच्या जीवनाला स्थैर्य आले. जंगली श्वापदांपासून बचाव करण्याकरिता आणि परस्परांच्या सोईसाठी अनेक जणांनी एकत्र येऊन शेती करणे सोईचे झाले. ही स्थिर समाजजीवनाची पहिली पायरी होती. पिकांमुळे त्याचा वर्षभराचा उदरनिर्वाह झाल्यानंतर जो उर्वरित वेळ मिळे, त्यातून अनेक प्रकारच्या ज्ञानशाखांची निर्मिती झाली. केवळ शिकार करून जगण्याच्या त्यांच्या भटक्या अवस्थेत हे शक्य झाले नसते, म्हणून कृषी व्यवसाय ही मानवी जीवनातील पहिली सांस्कृतिक क्रांती होय.

 

माणसाने जेव्हा शहरे वसविण्यास सुरुवात केली, ती मानवी संस्कृतीतील दुसरी क्रांती म्हणता येईल. ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय शेतीच होता, तर शहरी भागातील सर्व उद्योग हे मानवनिर्मित संस्कृतीचे होते. यामध्ये विविध उत्पादने, व्यापार, नृत्यकला, साहित्य आदींचा विकास अशा अनेक बाबींचा समावेश होता. माणसाला जगण्यासाठी अन्नाधान्याची निर्मिती करणे, ही मूलभूत जैविक आवश्यकता होती. ती ग्रामीण कृषी व्यवस्थेत पूर्ण होत होती. परंतु, शहरी व्यवस्था ही मानवी बुद्धी आणि प्रतिभेतून निर्माण झालेली संस्कृती होती. परंतु, पुढील काळात ती जीवनाचा एवढा अभिन्न भाग बनून गेली की, अन्नाइतकीच सांस्कृतिक भूकही माणसाला तितकीच महत्त्वाची वाटू लागली. ज्या समाजात नागरी संस्कृती मोठ्या प्रमाणात विकसित झाली, ते समाज नव्या जगाचे केंद्र बनले.

 

या दुसर्‍या क्रांतीवर भारत, चीन आदी पौर्वात्य देशांचा वरचष्मा राहिला. सोळाव्या शतकात भारतावर मोगलांचे राज्य असले तरी इथली उत्पादने आणि व्यापार यांच्यावर पारंपरिक हिंदू जातीचे वर्चस्व होते. या व्यापारी जातींना मोगलांनी फारसा धक्का लावला नाही, याचे कारण त्यांच्या अर्थकारणावर मोगल सत्तांची श्रीमंती अवलंबून होती. सोळाव्या शतकात त्यावेळच्या जगात वार्षिक उत्पादनांच्या बाबतीत चीन पहिल्या क्रमांकावर होता, तर भारत दुसर्‍या क्रमांकावर होता. सतराव्या शतकात ही परिस्थिती बदलली आणि भारत पहिल्या क्रमांकावर गेला. काही अभ्यासकांच्या मते, या काळात भारताची एक तृतीयांश लोकसंख्या उत्पादन, व्यवस्थापन आणि सेवाक्षेत्रात कार्यरत होती. वस्त्र प्रवरण, पोलाद, जहाजबांधणी या क्षेत्रात भारताचे प्रभुत्व होते. युरोपमध्ये झालेली वैज्ञानिक क्रांती हा मानवी संस्कृतीच्या प्रगतीचा तिसरा महत्त्वाचा टप्पा. जे विविध वैज्ञानिक शोध लागले आणि त्याचा ऐहिक जीवनात वापर चालू झाला, तेव्हा जागतिक पटलावरचे चित्र आमूलाग्र बदलले. होकायंत्र व नकाशाच्या शोधामुळे नौकानयन सोपे झाले. छपाईच्या शोधामुळे ज्ञान प्रसारात सुलभता आली. दळणवळणाच्या व संपर्काच्या तंत्रज्ञानातून प्रगती झाल्यामुळे जलद हालचाल करणे शक्य झाले आणि वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे माणसाची उत्पादक शक्ती कल्पनातीत वाढली. या तिसर्‍या क्रांतीमुळे एक काळ जगात अग्रेसर असलेले भारत आणि चीन मागे पडले व युरोपीय देश झपाट्याने पुढे आले. युरोपमध्येसुद्धा प्रारंभीच्या काळात स्पेन, पोर्तुगाल या पूर्व युरोपीय देशांचा वरचष्मा होता. परंतु, ते वैज्ञानिक प्रगतीमध्ये मागे पडल्याने पुढील काळात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या पश्चिमयुरोपीय देशांचा वरचष्मा निर्माण झाला. इंग्लंडचे साम्राज्य तर जगभर पसरले.

 

विसाव्या शतकाच्या अखेरीस संपर्क तंत्रज्ञानाने जी क्रांती झाली, तो चौथ्या क्रांतीचा प्रारंभबिंदू आहे. माहितीच्या दृष्टीने शहर आणि खेडी यांच्यातील फरक संपुष्टात आला आहे. जगातील एका व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीशी संपर्क साधणे सहज सुलभ झाले आहे. एवढ्यापुरताच हा फरक मर्यादित नसून सर्व सामाजिक, व्यावसायिक, राजकीय संस्थांची पुनर्रचना यातून घडत आहे. विकसित देशात बँकेत पाऊलही न टाकता वर्षानुवर्षे बँकेचे व्यवहार करणारे अनेकजण आहेत. व्यवसायासाठीसुद्धा एकमेकांना भेटण्याची आवश्यकता राहिली नाही. यातून अनेक नवे उद्योग उभे राहिले आहेत. यात माहिती एकत्र करून तिचे वर्गीकरण करून त्याचा उपयोग करण्याचे विविध मार्ग विकसित झाले आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. ही चौथी क्रांती संपर्क तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही, तर जैव तंत्रज्ञान, अब्जांश तंत्रज्ञान , रोबोटिक्स अशा अनेक नव्या तंत्रज्ञानांचा परिणामआगामी काही काळात होणार आहे. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तिसरी क्रांती घडत असताना आपल्याला त्याची सुतरामकल्पना आली नव्हती. परंतु, चौथी क्रांती घडविण्यात अनेक भारतीयांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

 

तिसर्‍या क्रांतीमुळे आपल्या समाजव्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम झाला. एकेकाळचा समृद्ध देश कंगाल बनला. या बदलाचे परिणाम किती व्यापक होते, याचे एकच उदाहरण पुरेसे आहे. लोकमान्य टिळकांनी आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले?’ या लेखात आगगाडीमुळे केवळ गंगा नदीवरील तीस हजारांहून अधिक नावाड्यांचा रोजगार बुडाला याचे उदाहरण दिले आहे. खेडेगावातील बलुतेदारांचे व्यवसाय या तिसर्‍या क्रांतीमुळे नष्ट झाले आणि ग्रामीण बेरोजगार शहराची वाट चालू लागले. शहरांच्या बकालीकरणाचे कारण आपल्याला तिसर्‍या क्रांतीचे परिणामनीट हाताळता आले नाहीत, यात आहे.

 

जर एक देश म्हणून चौथ्या क्रांतीच्या परिणामांचा आपण समग्र आणि नीट विचार केला नाही, तर भविष्यकाळात पुन्हा जुन्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. आजच्या अनेक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांचे स्वरूप आर्थिक परिस्थितीत आहे. ती परिस्थिती बदलण्याची क्षमता चौथ्या क्रांतीत आहे. त्यासाठी वाघावर बसण्याचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखविण्याची गरज आहे.

-  दिलीप करंबेळकर

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121