एका यज्ञाची गोष्ट

    29-Nov-2017   
Total Views | 22


“आबा, आज तुम्ही सूर्य आणि यज्ञाची गोष्ट सांगणार आहात ना?”, सुमितने आबांना आठवण करून दिली.

“मग, आधी तुला यज्ञांबद्दल सांगायला हवे. ऐक!”, आबांनी बाह्या सरसावून सांगायला सुरुवात केली, “वेदांमध्ये सांगितलेल्या यज्ञांपैकी काही यज्ञ करायचे सामर्थ्य फक्त राजांकडेच होते. जसे - वाजपेय, राजसूय, अश्वमेध आदी  यज्ञ. या यज्ञात अनेक ऋत्विज असत, सामगायन केले जात असे, सोमरसाची आहुती देत असत आणि काही यज्ञात पशुबळी सुद्धा दिला जात असे. यातील काही यज्ञ अनेक दिवस तर काही यज्ञ अनेक वर्ष चालत असत. या यज्ञांमधून रथांची शर्यत, पुराणकथांचे कथन, इतिहास व पुराणातील गोष्टींचे नाट्यरूप सादरीकरण आदी करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल असे. आसपासच्या गावातूनच नाही तर, जवळपासच्या राज्यातून सुद्धा लोकांचे लोंढे असे यज्ञ पाहायला येत असत.

“श्रौत यज्ञांपैकी ‘हविर्यज्ञ’ हे मात्र छोटेखानी यज्ञ होते. हे आजन्म, नियमितपणे व घरोघरी केले जात असत. या यज्ञात दुध, तूप, पुरोडाश, आदी हवी अर्पण करत असत.”, आबा सांगत होते.

“पुरोडाश म्हणजे काय असते?”, दुर्गाबाईंनी विचारले.

“पुरोडाश म्हणजे पिठ थापून भाजून केलेला पदार्थ. असा बिस्कीटासारखा. तर, ७ प्रकारचे हविर्यज्ञ सांगितले आहेत. आज आपण त्या मधले अग्निहोत्र, दर्शपूर्णमास आणि इतर काही यज्ञ पाहू.”, आबा म्हणाले.

“आबा, अग्निहोत्राबद्दल मी ऐकले आहे. या मध्ये सकाळ - संध्याकाळ सूर्याला आहुती देतात ना?”, सुमितने विचारले.

“To be precise, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केले जाते. सकाळी सूर्य व प्रजापतीला आणि संध्याकाळी अग्नी व प्रजापतीला आहुती दिली जाते. पूर्वी, ही आहुती घरात स्थापन केलेल्या व सदैव प्रज्वलित ठेवलेल्या अग्नीत देत असत. वर्षभर अग्निहोत्र करणं ही प्रवेश परीक्षा होती! जो या मध्ये पास झाला, तोच पुढचा यज्ञ करण्यास पात्र होत असे.

“पुढचा यज्ञ होता - दर्शपूर्णमास. हे दोन यज्ञ आहेत. दर्श यज्ञ अमावसेला आणि पूर्णमास पौर्णिमेला केला जात असे. या मध्ये आदल्या दिवशी यज्ञाची तयारी करून, प्रतिपदेला इंद्र व अग्नीला आहुती देत असत.     

“या पुढची पायरी होती चातुर्मास्य यज्ञाची. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंच्या सुरुवातीला, दर चार महिन्यांनी एकदा, चातुर्मास्य यज्ञ करायची पद्धत होती. वर्षातून ३ चातुर्मास्य यज्ञ त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेला केले जात असत.

“त्यानंतर अग्रायण हा यज्ञ वर्षातून दोनदा, एकदा वसंत ऋतूत आणि एकदा शरद ऋतूत करत असत. या यज्ञानंतर, घरात आलेले नवीन धान्य खाण्यासाठी वापरत असत.

“आणि शेवटचा - निरूढपशुबंध हा यज्ञ ज्यांच्या घरी गोधन आहे ते करत असत. गुरांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भरपूर गायी, बैल मिळावेत म्हणून हा यज्ञ करत असत. गायी – बैलांचे या दिवशी कौतुक करत असत. हा यज्ञ सुद्धा वर्षातून दोनदा – एकदा उत्तरायणाला आणि एकदा दक्षिणायनाला करत असत.”, आबा सांगत होते.

“उत्तरायणला तर आजही गुरांचे कौतुक केले जाते. आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू येथे उत्तरायणाला माटू पोंगल, जल्लिकाटू सारखे गोधनाचे कौतुक करणारे उत्सव साजरे केले जातात.”, दुर्गाबाई म्हणाल्या.  

“या दिवशी गुरांचे कोडकौतुक करणे, ही कदाचित वैदिक काळापासून चालत आलेली प्रथा असू शकते!”, आबा म्हणाले. 

“आबा, ही सर्व यज्ञ सूर्य – चंद्राच्या आकाशातील स्थितीप्रमाणे केलेले दिसत आहेत!”, सुमित आश्चर्याने म्हणाला.

“बरोबर मेख ओळखलीस, सुमित! हे यज्ञ सत्र संपूर्ण वर्षाशी कसे निगडीत आहे बघ. दिवसाच्या सुरवातीला, रात्रीच्या सुरवातीला, कृष्ण पक्षाच्या सुरवातीला, शुक्ल पक्षाच्या सुरवातीला, महिन्याच्या सुरवातीला, ऋतूच्या सुरवातीला, उत्तरायणाच्या सुरवातीला, दक्षिणायनाच्या सुरवातीला, वर्षाच्या सुरवातीला आणि वर्षाच्या मध्याला एक एक यज्ञ सांगितला आहे. आजही यातील कैक घटना आपण सण म्हणून साजऱ्या करतो – जसे वसंताच्या सुरवातीला रंगोत्सव, थंडीच्या सुरुवातीला दीपोत्सव, वर्षाच्या सुरुवातीला ब्रह्मध्वजोत्सव (पाडवा), उत्तरायण, आणि इतर अनेक पौर्णिमा व अमावस्या सुद्धा.


 

“आकाशातील प्रत्येक milestone ची नोंद या यज्ञसंस्थेद्वारे द्वारे ठेवली जात होती. Equinox चा दिवस कोणता, Solstice कधी आहे, या दिवसांना सूर्य कोणत्या नक्षत्रात असतो, पौर्णिमेचा चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे अशा सर्व गोष्टींचे बारीक निरीक्षण केले गेले.”, आबा म्हणाले. 

“आबा, हे कसे वाटते सांगू का? पृथ्वीवरचे हे यज्ञ सत्र, आकाशातील चंद्र - सूर्याच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. सूर्य आणि चंद्राबरोबर २७ नक्षत्रातून प्रवास करण्यासारखे आहे!”, सुमित म्हणला.   

आबा मान डोलावून म्हणाले, “खरेय सुमित! हे एक जिवंत कॅलेंडर होते! ऋतुंना बांधलेले, ऋतूंचा track ठेवणारे कॅलेंडर होते. म्हणूनच यज्ञ करणाऱ्याला ‘ऋत्विज’ हे नाव मिळाले असावे. ऋग्वेदात संवत्सराला, म्हणजेच वर्षाला ‘यज्ञ’ म्हणले आहे. तसेच प्रजापतीला पण संवत्सर म्हटले आहे.”, आबा म्हणाले.

“म्हणजे प्रजापती = वर्ष! आबा, या प्रजापती देवाची प्रजा कोण होती?”, सुमितने प्रश्न उपस्थित केला.

“उत्तम प्रश्न विचारलास, सुमित! पुढच्या भेटीत आपण त्या बद्दल सविस्तर बोलू.”, आबा म्हणाले.

“तुम्हा दोघांचे यज्ञा बद्दल बोलून झाले असेल, तर आता यज्ञ करायला चला! थालीपीठाचा पुरोडाश आणि लोण्याचा हवी नाश्त्याच्या यज्ञासाठी तयार आहे!”, दुर्गाबाई गालातल्या गालात हसत म्हणाल्या.

References - 

१. The Orion – B. G. Tilak

२. Surya and the Sun Cult – Shanti Lal Nagar

३.  मराठी विश्वकोश

 

- दिपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121